सरकारी योजनेत सकारात्मक बदल आवश्यक : सतीश गुप्त

    दिनांक :24-Jul-2019
  
चिखली,
शासनाने मागील वर्षी सुरु केलेल्या “अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ” योजनेमध्ये काही सकारात्मक बदल आवश्यक असल्याचे निवेदन चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी राज्य शासनाला केले आहे. महाराष्ट्र शासनासोबत करारबद्ध होणारी चिखली अर्बन बँक महाराष्ट्रातील पहिली बँक आहे. सहकारी बँकांमार्फत राबविल्या गेल्यास शासनाचा निधी बँकेकडे ठेव स्वरुपात राहून त्याआधारे बँक गरजू लोकांना माफक दरात अर्थ सहाय्य करून राज्याच्या प्रगतीला हातभार लावू शकते यासाठी राज्य सरकार कडून सकारात्मक विचार व्हावा असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

 
 
चिखली अर्बन बँकेने करारबद्ध होऊन न थांबता या योजनेंतर्गत महाराष्ट्रातून सर्वाधिक ५६८ कर्ज प्रकरणे करून राज्यातील तरुण तरुणी बेरोजगारांना अर्थसहाय्य करून या योजनेचा लाभ मिळवून देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अर्थ सहाय्य केलेल्या या ५६८ प्रकरणांमध्ये थकीत कर्जाचे प्रमाण नगण्य आहे, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

या योजनेमध्ये काम करताना बँकेने दारोदारी जाऊन या योजनेचा प्रचार व प्रसार सुरु केला व योजना खूप मोठ्या महात्वांकाक्षेने राबविली होती व राबवीत आहे. परंतु नोव्हेंबर २०१८ मध्ये शासनाने या योजनेमध्ये बदल करून हि योजना केवळ मराठा समाजापुर्ती मर्यादित केली.त्यामुळे इतर समाजातील किंवा इतर जातीच्या तरुण तरुणींना या योजनेचा लाभ घेणे शक्य नाही. याउलट केवळ मराठा समाजापुर्ती मर्यादित केलेली असताना देखील मराठा समाजात जे होतकरू तरुण तरुणी कुणबी जातीमध्ये मोडतात त्यांना देखील या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या योजनेमध्ये सकारत्मक बदल झाल्यास हि योजना आणखी प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकते. या योजनेसमान इतर समाजातील घटकांसाठी अशीच एखादी कल्याणकारी योजना तयार करावी किंवा याच योजनेला पूर्ववत स्वरुपात परत आणून वंचित असलेल्या होतकरू तरुण तरुणींना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. या योजनेमध्ये बदल किंवा नवीन योजना या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणल्यास फार मोठा दिलासा तरुण तरुणींना मिळू शकतो यात तिळमात्र शंका नाही.

चिखली अर्बन बँक हि विदर्भाच्या ग्रामीण भागात काम करणारी बँक आहे त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांना चालना देण्याचे काम बँक मोठ्या प्रमाणावर करू शकते . शासना च्या विविध योजना ह्या राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत राबविल्या जातात त्यामुळे शासनाचा निधी हा मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीयीकृत बँकांकडे जमा असतो ह्या योजना चिखली अर्बन बँक सारख्या सहकारी बँकांमार्फत राबविल्या गेल्यास शासनाचा निधी बँकेकडे ठेव स्वरुपात राहून त्याआधारे बँक गरजू लोकांना माफक दरात अर्थ सहाय्य करून राज्याच्या प्रगतीला हातभार लावू शकते या साठी देखील राज्य सरकार कडून सकारात्मक विचार व्हावा असे निवेदन चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ना. चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री , ना. सुधीर मुनगुंटीवार अर्थ मंत्री , ना. नरेंद्र पाटील ,अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांना दिले आहे.