दुधाळ जनावरांची निवड कशी करावी?

    दिनांक :24-Jul-2019
डॉ. गणेश उत्तमराव काळुसे 

 

 • दुधाळ जनावरांची निवड करताना त्यांचे बाह्यस्वरूप, दुग्धोत्पादन आणि प्रजननक्षमता विचारात घ्यावी. जनावर विकत घेताना अगर निवडताना तिचे दूध 2-3 वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी. केवळ मोठ्या आकाराची कास याबाबतीत गृहीत धरू नये.
 • जनावर पान्हावयास किती वेळ लागतो, ती आंबोणशिवाय धार देते किंवा नाही? तिला ठरावीक गवळ्याची सवय आहे काय? या गोष्टींचीही खात्री करून घ्यावी.
 • तापट स्वभावाचे जनावर, उत्तेजीत झाले की पान्हा चोरतात म्हणून शांत स्वभावाची जनावरे निवडावी. धारेच्या वेळी लाथा मारणारी, कापड, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारे जनावर घेणे टाळावे.
 • धारेला (पिळण्यासाठी) हलके असणारे जनावर निवडावे. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळे दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दूध काढून पाहावे.
 • जनावर विकत घेताना शक्यतो दुसर्‍या वेतातील गाय निवडावी.
 • जातिवंत दुधाळ जनावर तरतरीत आणि निरोगी दिसतात. त्यांचे डोळे पाणीदार असतात. सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते. शरीराचा आकार वरून, समोरून आणि बाजूकडून निरीक्षण केले असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतो.
 • जनावर समोरून पाहिले असता दोन पायांतील अंतर अधिक असावे. छाती भरदार असावी.
 • वरून पाहिले असता कमरेची हाडे दूरवर असावीत.
 • बाजूने पाहिले असता शेपटीवरील दोन हाडे आणि कास यामध्ये अधिक अंतर असावे.
 • जनावर लठ्ठ नसावे, लांब आणि सडपातळ असावे.
 • पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा.
 • पाठीला बक असणार्‍या गाई शक्यतो टाळाव्यात.
 • जनावरांच्या खुरांचा रंग काळा असावा.
 • वाढलेल्या नख्या किंवा खुरसडा याबाबतीत बारईकाईने चौकसपणे बघावे.
 • गाय विकत घेताना ती चालवून-फिरवून पाहावी.
 • कास हा दुभत्या जनावरांचा महत्त्वाचा अवयव आहे. कासेची शरीराची बांधणी घट्ट असावी.
 • धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते.
 • सड फुगलेले दिसतात.
 • दूध काढल्यानंतर कासेचा आकार पूर्ववत लहान होणारा असावा.
 • त्वचा मऊ असावी. कासेवर अनेक फाटे असणारं शिरांचं जाळं असावं. शिरा जड असाव्यात.
 • चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत.
 • ज्या जनावरांची दूध उत्पादनाची, प्रजननक्षमतेची आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध आहे अशाच गाईंची निवड करावी.