खरिपातील बाजरीचं उत्पादन

    दिनांक :24-Jul-2019
 
खरिपातील प्रमुख अन्नधान्य पिकांच्या उत्पादनात बाजरीचा समावेश होतो. परंतु अजुनही या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र मर्यादित राहिलं आहे. वास्तविक वाढती मागणी आणि वाजवी दर यामुळे या पिकाचं उत्पादन किफायतशीर ठरणार आहे. त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी बाजरीच्या उत्पादनाचं तंत्र समजून घ्यावं. 

 
 
अधिक उत्पादनासाठी बाजरीची पेरणी 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान करावी. पाऊस उशीरा झाल्यास बाजरीची पेरणी 30 जूनपर्यंत करायला हवी. विशेष म्हणजे या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्यानं ते कोरडवाहून क्षेत्रातही उत्तम येतं. या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन फायदेशीर ठरते. हलक्या जमिनीत हे पीक घ्यायचं असल्यास सरी-वरंबा पध्दतीचा अवलंब करावा.
 
जमिनीच्या मगदुराप्रमाणे तसंच हवामान आणि पाऊस यांचा विचार करून लागवडीसाठी बाजरीच्या वाणांची निवड करावी. हलक्या जमिनीत तसंच कमी आणि अनियमित पावसाच्या क्षेत्रात बाजरीच्या सुधारित वाणांची लागवड फायदेशीर ठरते. पेरणीसाठी हेक्टरी तीन ते चार किलो चांगलं बियाणं वापरावं. बीजप्रक्रिया केलेलं प्रमाणित बियाणं वापरल्यास अधिक उपयुक्त ठरतं. बाजरीची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. आणि दोन रोपातील अंतर 15 सें. मी. ठेवावं. त्याच बरोबर बाजरीची पेरणी तीन ते चार सें. मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये. बाजरीला मातीपरिक्षणानुसार रासायनिक खतं द्यावी. या पिकातील तणांचा वेळीच बंदोबस्त करावा. विशेषत: पेरणीनंतर सुरूवातीचे 30 दिवस शेत तणविरहीत ठेवणं गरजेचं आहे.
 
बाजरी पिकावर केसाळ अळी, खोडकिडा किंवा खोडमाशी, अरगट यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यामुळे उत्पादनात 50 ते 60 टक्के घट होऊ शकते. त्यामुळे वेळच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. हलक्या जमिनीत बाजरीमध्ये मटकीचं आंतरपीक घेता येतं. तर मध्यम जमिनीत बाजरीत तुरीचं आंतरपीक घेता येतं. यासाठी दोन ओळीत 30 सें.मी.चं अंतर ठेवावं. अशा रितीने योग्य व्यवस्थापनाद्वारे बाजरीचं उत्तम उत्पादन प्राप्त करता येतं.