शिवसेनेचा गडचिरोतील विधानसभेच्या तीन जागांवर दावा

    दिनांक :24-Jul-2019
कुरखेडा,
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभेच्या सहा पैकी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या तीन विधानसभा क्षेत्रावर शिवसेनेचा दावा कायम असून तशी मागणी शिवसेना पक्ष नेतृत्वाकडे करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी आज कुरखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली. 
 
 
जिल्ह्यात शिवसेनेत यापूर्वी असलेली मरगळ दूर झाली असून नव्या जोमाने पक्षाचे संघटनकार्य सुरू आहे,  मोठ्या संख्येने युवा वर्ग शिवसेनेत दाखल होत आहेत. याचा प्रत्यय आज कुरखेडा येथे दिसून आला असून कुरखेडा तालुका प्रमुख राहुल घोगरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पाचशेच्यावर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढे गाव तिथे शिवसेनेची शाखा असणार असल्याची माहिती यावेळी पोतदार यांनी दिली.
 
माजी आमदार डॉ मडावी यांचा दावा ठरला फोल
या मेळाव्यात कुरखेडा तालुक्यातील भाजपाचे पाचशे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी यांनी केलेला दावा मात्र फोल ठरला प्रवेश घेणार्यामध्ये भाजपाचा तालुक्यातील एकही मोठा नेता किंवा पदाधिकारी नसल्याचे दिसून आले.