आमच्या सांस्कृतिक जाणिवांचे काय?

    दिनांक :24-Jul-2019
यथार्थ  
 श्याम पेठकर 
 
‘पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, शासन आणि सोनी टीव्ही यांनी पुलंच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनयस्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक केंद्रावर परीक्षक या नात्याने काम करत असताना लक्षात आले की-
 
अनेक तरुणांना पु. ल. कोण होते, हे मुळीच माहीत नाही. काहींनी अन्य देशपांडे नावाच्या लेखकांच्या लेखनावर एकपात्री तयार केले. एकाने गडकर्‍यांचा ‘तळीराम’ पुलंचा म्हणून सादर केला. एकाने पुलंची नसलेली कविता एकपात्री म्हणून त्यांच्या नावावर सादर केली. पुलंचे एकही पुस्तक न वाचलेले अनेक जण निघाले. पाच मिनिटांसाठी 20,000 रु. आणि 15,000 रु. अशी भक्कम बक्षिसे असूनही एकही प्रवेशिका न आल्यामुळे नंदुरबार केंद्रावरील स्पधार्च रद्द करण्यात आली.
 

 
 
महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची ही परिस्थिती. इतरांचे काय?
-प्रा. अनिल सोनार  यांची फेसबुकवर ही पोस्ट वाचण्यात आली. त्यानंतर एका सुहृदाने नागपुरातही अशीच स्पर्धा असल्याचे व्हॉटस्‌ॲप केले. नागपुरातही यापेक्षा काही वेगळे होईल, असे वाटत नाही. आता नव्या पिढीला अनिल सोनार हे कोण आहेत, हेही नक्कीच सांगावे लागेल. आता नव्या पिढीला दोष देऊन आम्ही अत्यंत कृत्रिम असा सांस्कृतिक भाव दाखवून मोकळे होणार नक्कीच. ते फारच सोपे असते. आता या स्पर्धेसाठी आलेली मुले- मुली आमचीच होती, असणार आणि आहेत. त्यांना दोष देणे म्हणजे चार बोटे स्वत:कडेही वळतात, हे समजून घ्यायला हवे. ती तर नवी पिढी आहे. त्यांच्यापर्यंत तुम्ही काय पोहोचविले? त्यांच्या पालकांची काही जबाबदारी नाही का? अन्‌ असेल हे मोठ्या मनाने ते मान्य करत असतील, तर त्या सांस्कृतिक जबाबदारीचे वहन करण्यात ती मंडळी चुकली, असे वाटत नाही का?
 
मुलं वाचतच नाही हो... असा छानपैकी त्रागा करणार्‍या प्रौढांच्या पिढीने किती वाचन केले आहे आणि आता करतात? नवी पिढी वाचत नाही, असा कृत्‌कोपी त्रागा करणार्‍यांनी गेल्या काही वर्षांत किती पुस्तके वाचली आहेत? मराठीतले नव्या पिढीतले लेखक त्यांना माहिती आहे? जाऊ द्या, जुन्या पिढीतले तरी माहिती आहेत का? क्रमिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे मुलांचा पुस्तकांशी काही संबंध आढळल्यास अस्वस्थ होणार्‍या माय-बापांची ही पिढी आहे. उलट, कौतुकाने ही मंडळी सांगतात की, आमच्या मुलांना अवांतर (फालतू) वाचनात काहीच रस नाही. त्यांना तितका वेळही नसतो. मुळात आपल्या मुलांना या वाचनाचा त्यांच्या पुढच्या आयुष्यात काही फायदा होणारच नाही, हे पालकांच्या पिढीनेच ठरवून टाकले आहे. पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज वगैरे माहिती नसले; तर इंजिनीअर किंवा डॉक्टर होण्यासाठीच जन्माला घातलेल्या पिढीच्या पॅकेजवर काहीही परिणाम होणार नसतो. परदेशात गेल्यावर तर त्यांना या लेखकांचा अन्‌ पुस्तकांचा त्यांच्या करीअरमध्ये काहीही फायदा होणार नसतो अन्‌ तोटा तर अजीबातच होणार नसतो.
 
इंजिनीअर किंवा डॉक्टर आणि फारच फार एमबीए होणार्‍या नव्या पिढीला अभ्यासाच्या पलीकडे खरेच वेळ नसतो का? समाजमाध्यमांवर त्यांचा किती वेळ जातो? मोबाईलला ते किती वेळ ‘डेडिकेट’ करतात? नेटफ्लिक्सवर मालिका पाहतातच ना? आजकाल केवळ मुलंच नाही, तर मुलीही कट्‌ट्यावर चकाट्या पिटतच नाहीत का? तरीही ते वाचन करत नाहीत, याचे आम्ही समर्थनच करतो. कारण मुळात आम्हीच वाचन करत नाही. खूपसारी वाचणारी मंडळी होती आणि आमच्या तरण्या वयात पुल हयात होते म्हणून आम्हाला किमान ते लेखक म्हणून माहिती आहेत, पण त्यांचे एकही पुस्तक न वाचताही आम्ही आमच्या मुलांना उच्च शिक्षण देऊच शकतो आहोत ना? आमच्याकडे गाडी आहे, वेल फर्निश्ड फ्लॅट आहे... म्हणजे आम्ही खूपच यशस्वी आहोत आणि या यशात कुठल्याच लेखक, कवयित्री, कलावंतांचा कसलाच सहभाग नाही!
 
आमच्या सांस्कृतिक जाणिवा बोथट झालेल्या आहेत, असेही नाही. मुळात त्या नाहीतच. मोहरमपासून दहीहंडीपर्यंत सगळे यथासांग पार पाडले अन्‌ लग्न करताना कुंडली पाहूनच ते केले म्हणजे आम्ही सुसंस्कृत आहोत, असाच आमचा एकुणात भाव आहे. देशाच्या बजेटमध्ये सांस्कृतिक क्षेत्रासाठी काय तरतूद आहे, याची कुणालाही काळजी नसते. ग्रंथालयांची अनुदाने रखडलेली असतात. कलावंतांना पेन्शन, अनुदान वगैरे दिले जाते. तशी तरतूद आहे, मात्र तो सोपस्कार झाला आहे. त्यात कलावंतच नसलेल्या आपल्या जवळच्या मंडळींचे किंवा मग कार्यकर्त्याचे भले केले जाते. माझे मित्र, रंगकर्मी दीपक करंजीकर केंद्र शासनाच्या त्या कमेटीवर आहेत. इतर सांस्कृतिक श्रीमंत देशांप्रमाणे आमच्याकडे आमच्या देशात किती कलावंत आहेत, कसल्या कलेत ते पारंगत आहेत किंवा साधना करतात तळमळीने, याची यादीच नाही. ती तयार केली जावी, असा प्रस्ताव त्यांनी सरकारला दिला आहे.
 
आमच्याकडे गुंडांची यादी आहे. तमक्या वस्तीचा दादा म्हणून माध्यमेही चमचमीत बातम्यांसाठी त्यांना प्रसिद्धी देत असतात. कलावंतांची फारशी दखल घेतली जात नाही, कारण ते माहितीच नसतात. त्यांच्या कर्तृत्वातून आर्थिक किंवा राजकीय शक्ती निर्माण होत नाही, मग त्यांची दखल कोण घेणार? आणि तरीही आम्ही सुसंस्कृत म्हणवून घेत असतो. ‘चार पैसे मिळतात का बासरी वाजवून?’ किंवा ‘कविता विकली जाते का तुझी?’ असेच विचारले जाते.
 
गेल्या दोन-तीन वर्षांत राज्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत कलावंत ओरड करत आहेत. मागे अभिनेते गिरीश ओक हे नाटकाच्या दौर्‍यावर गेले असताना, ते नाटकाचा प्रयोग करत असताना सरकारी विश्रामगृहावर एका राजकीय नेत्याला की अधिकार्‍याला तो कक्ष देण्यासाठी त्यांचे, ओक यांचे सामान ते तिथे नसताना व्हरांड्यात काढून ठेवण्यात आले होते. इतक्या थंडीत मी रात्र कुठे काढू, हा त्यांचा प्रश्न अधिकार्‍यांच्या लेखी तुच्छ होता. एकतर नाट्यगृहातील अव्यवस्था आणि हे असे... सुबोध भावेपासून अनेक व्यवसायी कलावंतांनी आतावर नाट्यगृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून पाहिले आहे. परवा भारत जाधव यांनीही असाच वैताग केला. त्यांची ती चलचित्रफीत माध्यमांवर नांदली दिवसभर, मात्र त्याचा परिणाम काही होणार नाही... नाट्यगृहे चांगली असावी, ही सरकारची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाचीच जबाबदारी आहे, हे मान्य. मात्र, ती तशी असावीत ही किमान सामान्य म्हणवणार्‍या आणि सभ्य, सुसंस्कृत म्हणवून घेणार्‍या नागरिकांची मागणी असावी की नाही? त्यासाठी जनतेनेही कधी दबाव आणावा की नाही? कलावंतांचा संताप होतो तसा तो रसिकांचाही व्हावा की नाही? तो होत नाही.
 
आम्हाला प्रश्नच पडणे बंद झाले आहे. 
आधुनिक बाजारव्यवस्थेला प्रश्न पडण्याइतकी स्वतंत्र प्रज्ञा असलेली माणसे नकोच आहेत आणि आमच्या सार्वजनिक जीवनाच्या सर्वच अंगात बाजारव्यवस्थेची ही बधिरीकरणाची प्रक्रिया प्रस्थापित झालेली आहे. सर्वच क्षेत्रांत प्रश्न पडणारी माणसे संपविली जातात आणि माणसे संपविणे ही आमची संस्कृती नसल्याने, मग आम्ही प्रश्न न पडणारीच माणसे घडवीत असतो. आमची अवस्था यंत्रमानवांसारखी झालेली आहे. आम्हाला फीड केले जाते, आमचे प्रोग्रािंमग केले जाते तसेच आम्ही वागत असतो. त्यामुळे आम्हाला कुठले प्रश्न पडले पाहिजेत, तेही व्यवस्था ठरवीत असते आणि मग त्याची त्यांना हवी असलेली तयार उत्तरेही तेच देत असतात. प्रश्नच पडत नाहीत त्यामुळे आम्ही अस्वस्थही होत नाही. कुठल्या प्रश्नांवर आम्ही अस्वस्थ व्हावे, तेही व्यवस्था ठरवीत असते. सुसंस्कृत माणसांना प्रश्न पडतात, कारण सुसंस्कृत असणे म्हणजे स्वतंत्र प्रज्ञा असणे. सृजन म्हणजे मनातले प्रश्न कलेच्या द्वारा सुसंस्कृत पद्धतीने विचारण्याचे बुद्धी असणे आणि असे प्रश्न विचारले गेले की, त्यांचे स्वागत करून त्यांचे निराकरण करणारी व्यवस्थाही मग सुसंस्कृत असते. खरेच आम्ही सुसंस्कृत आहोत का?