ट्रम्प यांचे काश्मीरप्रकरणी नसते उद्योग!

    दिनांक :24-Jul-2019
काश्मीरप्रकरणी आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, या, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून प्रचंड खळबळ उडणे स्वाभाविक आहे. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना या मुद्यावरून मोदी सरकारला घेरण्याची आयतीच संधी मिळाली, संसदेतही विरोधी पक्षांनी गदारोळ केला. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेसारख्या महाशक्तीचे अध्यक्ष असले, तरी त्यांचा एकूणच इतिहास हा वादग्रस्त राहिला आहे. ट्रम्प बोलतात ते खरेच बोलतात, असे नाही. किंबहुना ट्रम्प जे बोलतात, त्यात खोटेपणा जास्त असतो. अमेरिकेत आतापर्यंत अनेक राष्ट्राध्यक्ष होऊन गेले, पण ट्रम्प यांच्यासारखा खोटारडा आणि बाईलवेडा राष्ट्राध्यक्ष या आधी कधीच झाला नाही. डॉ. मनमोहनिंसग यांना ‘ॲन ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ म्हटले जाते, तसेच ट्रम्प यांना ‘ॲन ॲक्सिडेंटल प्रेसिडेंट’ असे म्हटले पाहिजे. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर जगालाच नाही, तर अमेरिकेतील लोकांनाही धक्का बसला. अमेरिकेचा अध्यक्ष होण्याची कोणतीच पात्रता आणि क्षमता आपल्यात नाही, हे ट्रम्प यांनीच वेळोवेळी आपल्या वागणुकीतून दाखवून दिले आहे. काहीतरी वेडवाकडे बोलून जगात खळबळ उडवायची आणि प्र्रसिद्धीच्या झोतात राहायची ट्रम्प यांची सवय आहे. आपल्या या सवयीमुळे त्यांनी अनेकवेळा अमेरिकेलाच नाही, तर जगातील अनेक देशांना तसेच नेत्यांना अडचणीत आणले आहे.

 
 
याच मालिकेत त्यांनी काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केले आहे. काश्मीर समस्या सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केली, असे ताजे विधान करून ट्रम्प यांनी खळबळ उडवली. मात्र, हे विधान मोदी यांनी केव्हा आणि कुठे केले, हे त्यांनी सांगितले नाही. नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि राजकारण ज्यांना माहीत आहे, ते अशा कोणत्याही वेडपट दाव्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग तो दावा कुणीही केलेला असो. अनेक अमेरिकन खासदारांनीही, मोदी असे बोलूच शकत नाहीत, असे छातीठोकपणे सांगितले असताना, भारतातील खासदार मात्र त्यावर विश्वास ठेवतात, याला काय म्हणायचे? दारू प्यालेली एखादी व्यक्ती जसे काहीही बरळत असते, त्यावर कुणी विश्वास ठेवत नाही, तशी गत ट्रम्प यांनी आपली करून घेतली आहे. ज्या ट्रम्प यांना अमेरिकेतील प्रश्न सोडवता येत नाहीत, त्यांनी काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा विनोद म्हणावा लागेल! त्यामुळेच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत ट्रम्प यांच्या दाव्याचा ठामपणे इन्कार केला. शिमला आणि लाहोर कराराप्रमाणे काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्याच्या भारताच्या भूमिकेचाही पुनरुच्चार करत, या प्रकरणी कोणत्याही तिसर्‍या पक्षाची मध्यस्थी भारताला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुळात ही भारताची आजची भूमिका नाही, तर जुनी भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारनेही काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यासाठी पावले उचलली होती. त्यामुळे काश्मीरप्रकरणी कोणत्याही तिसर्‍या देशाची मध्यस्थी भारताने कधीच मान्य केली नाही आणि मान्य करणारही नाही. काश्मीरप्रश्न स्वबळावर सोडवण्याची आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची धमक आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारमध्ये नसली, तरी मोदी सरकारमध्ये मात्र निश्चित आहे. त्यामुळे द्विपक्षीय चर्चेतून भारत योग्य वेळी काश्मीरप्रश्न सोडवेल, यात शंका नाही!
 
ट्रम्प यांच्या विधानाची पडताळणी न करता तसेच त्यांची विश्वसनीयता न पाहता कॉंग्रेस, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांनी, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची आपली हौस भागवून घेतली. मोदी यांनी ट्रम्प यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केली असेल, तर ती देशासोबतची गद्दारी असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. देशांतर्गत राजकारणात पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे समजण्यासारखे आहे, मात्र ज्या वेळी बाहेरच्या देशाचा कुणी आपल्या देशात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा शंभर अधिक पाच याप्रमाणे सवार्र्ंनी एकत्र येत त्यांचा प्रतिवाद करायला पाहिजे. मात्र, राहुल गांधी यांनी आपल्याला नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प अधिक जवळचे आहेत आणि आपला मोदी यांच्यापेक्षा ट्रम्प यांच्यावर जास्त विश्वास आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, जे योग्य नाही. अध्यक्ष म्हणून अमेरिकेची प्रतिष्ठा जपणे ही डोनाल्ड ट्रम्प यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, आपल्या वागणुकीने ट्रम्प ती वारंवार धुळीस मिळवत असतात. ट्रम्प यांनी खोटे बोलण्यासोबत महिलांसोबतच्या लफड्यांचाही विक्रम केला आहे. ज्या देशाचा अध्यक्ष इतका खोटारडा आणि लफडेल आहे, या देशाचे भवितव्य काय राहील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळेच अमेरिकेचे महाशक्ती म्हणून जगातील स्थान आणि महत्त्व कमी होत आहे. ट्रम्प यांनी खोटे बोलण्याचा विक्रम केला असल्याचे अमेरिकेतील दैनिकांनीच म्हटले आहे. ट्रम्प यांना अमेरिकेचे अध्यक्ष होऊन 869 दिवस झाले, या काळात ते 10,796 वेळा खोटे बोलले. म्हणजे रोज सरासरी 12 वेळा खोटे बोलले. म्हणजे ज्या माणसाला रोज खोटे बोलल्याशिवाय चैन पडत नाही, जेवण जात नाही आणि झोपही लागत नाही, त्याच्या काश्मीरविषयक विधानावर विश्वास ठेवणे म्हणजे आपली बौद्धिक दिवाळखोरी निघाल्याचे मान्य करण्यासारखे आहे. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे जागतिक राजकारणातील अमेरिकेचे महत्त्व कमी होत चालले आहे.
 
 
जे थोडेफार महत्त्व शिल्लक आहे, ते ट्रम्प आपल्या बोलण्याने आणि वागण्याने गमवत आहेत. त्यामुळेच जागतिक राजकारणात आपले महत्त्व अजूनही कायम आहे, अनेक देश आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपली मदत मागतात, हे दाखवण्यासाठी ट्रम्प यांनी काश्मीरविषयक विधान केले असावे, असा संशय घ्यायला जागा आहे. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जागतिक शांततेत आपले योगदान देत, शांततेचा नोबल पुरस्कार मिळवला आहे. ट्रम्प यांना आता नोबल पुरस्काराची स्वप्ने पडू लागली असावी. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरप्रश्न चुटकीसरशी सोडवून नोबल पुरस्कार आपण मिळवू, असे ट्रम्प यांना वाटत असावे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्रम्प यांच्या ओंजळीने पाणी पिऊ शकतील, पण भारताचे पंतप्रधान कधीच देशहिताचा बळी देत ट्रम्प यांच्या ओंजळीने पाणी पिणार नाहीत, याबाबत कोट्यवधी भारतीयांच्या मनात कोणतीच शंका नाही! उलट, मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे, देशाकडे वाकडी नजर करून पाहण्याची कुणाची हिंमत नाही, याची देशवासीयांना खात्री आहे. अमेरिकेतील जनतेचा ट्रम्प यांच्यावर विश्वास उडाला असला, तरी भारतातील जनतेचा मोदी यांच्यावरील विश्वास कायम आहे, नव्हे, वाढला असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी आपले जागतिक महत्त्व वाढवण्यासाठी अशा उचापती करू नये, त्याने त्यांचे महत्त्व वाढणार नाही, उलट कमी होणार आहे, याचे भान ठेवावे. पाकिस्तानसोबत चर्चा करून वा वेळ पडली तर अन्य मार्गानेही काश्मीरप्रश्न सोडवण्याची धमक मोदींमध्ये आहे. काश्मीरप्रश्नात नाक खुपसण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला, तर त्यांचे नाक कापले जाईल आणि हात घालण्याचा प्रयत्न केला तर हात पोळून निघतील, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे!