आत्मविश्वास

    दिनांक :25-Jul-2019
मुकेश जुनघरे
9049339068
 
माणसात असलेला आत्मविश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. आत्मविश्वासाशिवाय माणूस कुठलेही कार्य करण्यास असक्षम आहे. माणूस जशी कल्पना करीत असतो, तसा तो वागण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ती कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतो, त्या प्रयत्नाने तो राजा सुद्धा बनू शकतो. परंतु त्याचाच एक नकारात्मक टप्पा म्हणजे अतिआत्मविश्वास! खरे सांगायचे झाले तर अतिआत्मविश्वास माणसाला शून्य बनवितो. जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की माणूस त्याच्या मनात निश्चित करीत आहे की माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे, काहीही अशक्य नाही. हे सत्य आहे, परंतु अशक्य गोष्टी शक्य करणे ते सुद्धा माणसावर अवलंबून आहे. आत्मविश्वासविना माणूस अशक्य गोष्टी शक्य करू शकत नाही, तथापि कधी कधी माणसाची मन:स्थिती आत्मविश्वासाला अतिआत्मविश्वासात रुपांतरीत करते, म्हणूनच माणसाचे मनावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. सांगायचे झाले तर अतिआत्मविश्वास माणसाला निराश करतो. 
 
 
आत्मविश्वासाचे उदाहरण द्यायचे झाले तर, रतन टाटा आणि मुकेश अंबानी यांना त्यांच्या कामावर विश्वास होता, म्हणूनच ते सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांची ओळख म्हणजे त्यांचा आत्मविश्वास होय. त्यांच्या आत्मविश्वासाने त्यांनी मोठे साम्राज्य उभे केले आणि म्हणूनच पृथ्वीवर अशी कुठलीही व्यक्ती नाही, ज्यांना त्यांच्या सामर्थ्याबद्दल माहिती नाही. म्हणूनच माणसाने आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करायला हवा, फक्त प्रयत्न करीत असताना, अतिआत्मविश्वास न बाळगता सकारात्मक राहणे योग्य.