सैनिक- उद्यासाठी आज देणारा!

    दिनांक :25-Jul-2019
सर्वेश फडणवीस
 
 
26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. 20 वर्षांपूर्वी याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. 1999 च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकार्‍यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. 1999 च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. कारगिल व द्रास परिसरातील अति उंच दुर्गम जागी हे ठिकाण आहे. 
 
 
खरंतर सैनिक ही एक वृत्ती आहे. त्यामागे शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्यागाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच बर्फातील 40 अंशसेल्सिअस तापमान असो किंवा वाळवंटातील 50 अंशसेल्सिअस आमचा भारतीय सैनिक हा कार्यतत्परच आहे. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर असो, शत्रूच्या समोर जाणं असो अथवा निसर्गाच्या तांडवात सर्वसामान्य जनतेचा देवदूत बनून मदतीला धावून जाणं असो आमचा सैनिक देशाच्या प्रत्येक संकटाला धाडसाने समोर जातो. प्रसिद्धी आणि पैसा या प्रलोभनापासून दुर राहून सैनिक आपलं काम निस्पृह, निरपेक्षतेनं, एकदिलाने आणि एकसुराने करत असतो.
 
सैनिकाला मृत्यू प्रत्यक्ष दिसत असतानाही पुढे पाऊल टाकणं यासारखं धैर्य नाही आणि या धैर्याला तो हसतमुखाने समोर जातो. ही त्यागाची परिसीमा गाठण्याचे प्रशिक्षण त्याला इथं येण्याआधीच मिळत असते.
 
आजचा तरुण हा देशभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दिवस बाजूला ठेवले तर बाकी दिवसाना आपलं देशप्रेम हे खरंच जागृत असतं का. हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आज प्रत्येक जाणकार, सद्सद्विवेकबुद्धी साबूत असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी तरुणाने वाहणार्‍या वार्‍याच्या दिशेने न जाता त्या वार्‍याचा रोख बदलवून नव्या दिशेला जाणं अत्यंत जरुरी आहे. आज वेळ आली आहे, आपल्याला अंतर्मुख होण्याची ज्यांनी-ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या झालेल्या युद्धात शत्रूचा निःपात करण्यासाठी स्वतःच्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखांना तिलांजली दिली; त्यांच्या त्यागाला आपण खरंच लायक आहोत का?
 
सैन्यदलाबद्दल नितांत आदर, अभिमान, श्रद्धा, विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा, ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही, आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. मातृभूमीचा ऋण फेडणारा सैनिक हाच खरा आयकॉन व्हावा हीच काळाची गरज आहे. सैनिकांचा सन्मान करणे, त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्या प्रति पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहे ही आपली जबाबदारी आहे. 26 जुलैच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यात प्राणार्पण झालेल्या आणि आजवर देशसेवेसाठी बलिदान देणार्‍या प्रत्येक सैनिकाला वंदन करूया.
 
शौर्य दक्षम युद्धाय ।
बलिदान परम्‌ धर्म: ।।
या न्यायाने आमचा सैनिक कार्य करतो आहे.
नागालँडमधील कोहिमा येथील भव्य युद्धस्मारकामध्ये एका योद्ध्याच्या स्मारकावर कोरलेले शब्द प्रत्येकाने आज आपल्या हृदयातही कोरून ठेवायला हवेत.
माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना...
आणि सांगा, तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला.
जयहिंद !!