ट्विटरच्या बदलावर ‘बिग बी’ नाराज

    दिनांक :25-Jul-2019
कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अग्रस्थानी येणारं नाव म्हणजे अमिताभ बच्चन. आपल्या अभिनय आणि संवाद कौशल्याचा वापर करत अमिताभ यांनी कलाविश्वामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. कलाविश्वामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रीय असलेले बिग बी सोशल मीडियावरही तितकेच अॅक्टीव्ह आहेत. अमिताभ अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातून त्यांची मत मांडत असतात. यावेळी देखील त्यांनी असंच केलं आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरचं रुपडं बदललं असून या संदर्भात बिग बींनी एक ट्विट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या ट्विटची चर्चा आहे.
 
 
काही दिवसापूर्वी ट्विटरच्या रचनेत काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल काही युजर्सला आवडले आहेत. तर काहींना मात्र ते पटलेले नाहीत. या साऱ्यामध्ये बिग बींनी देखील ट्विटरचा हा नवा बदल स्वीकारत जुनं ट्विटरच योग्य होत असं म्हटलं आहे. “अरे, यार या ट्विटरने पुन्हा आपला चेहरा बदलला. पहिलंच ठीक होतं. मात्र काही हरकत नाही. बदला जीवनाची परिभाषा. जेवढ्या लवकर समजून घ्यायल तेवढं चांगलं”, असं ट्विट अमिताभ यांनी केलं आहे.
 
 
दरम्यान, ट्विटरचं हे नवं रुपडं बिग बी यांना फारसं रुचलेलं दिसत नाही. मात्र त्यांनी हा नवा बदल स्वीकारला आहे. तसंच चाहत्यांनादेखील हा बदल स्वीकारण्याचं एकप्रकारे आवाहन केलं आहे. सध्या बिग बी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. ते लवकरच ‘झुंड’, ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत.