आंबेडकरांमुळे पुनीत झालेल्या 28 स्थळांना सरकारचा परीसस्पर्श!

    दिनांक :25-Jul-2019
 विकासाकरिता 33 कोटींचा निधी
 
नागपूर, 
दीनदुबळ्या गरिबांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे शिक्षण घेतले, आपला अमूल्य वेळ घालवला, कित्येकांच्या आयुष्याला कलाटणी दिली अशा राज्यातील 28 ऐतिहासिक स्थळांना महाराष्ट्र सरकारने परीसस्पर्श केला आहे. यासाठी 33 कोटी 78 लाख 6 हजार 247 रुपयांचा निधी विकासाकरिता उपलब्ध झाला आहे, अशी माहिती कास्ट्राईबचे अध्यक्ष आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या ठिकाणांच्या विकासाकरिता तयार समितीचे सदस्य कृष्णा इंगळे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
 
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे याअनुषंगाने 1 नोव्हेंबर 2011 मध्ये समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, मधल्या काळात कॉंग्रेस सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच त्यांनी यात बारकाईने लक्ष घालून महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. त्या आधारावर त्यांनी पटापट निर्णय घेत संबंधित वास्तूंचा विकास व्हावा म्हणून निधीला मंजुरी प्रदान केली. याअनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणार्‍या पातुर्डा येथील मातीचा बुद्धविहार व परिसराचे नूतनीकरण केले जाईल. याकरिता 99 लाख 92 हजार रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय आरग ता. मिरज, जि. सांगली, चंद्रपूरची दीक्षाभूमी, मेव्हणा राजा, भीमघाट गोंदियाचा बुद्धविहार, सांगलीतील वाटेगाव, पूर्णा बुद्धविहार, हरेगाव, तळेगाव दाभाडे, दीक्षाभूमी वडसा, माणगाव, धम्मकुटी कोल्हापूर, महाड चवदार तळे, कसबे तडवळे, सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव, काळकाई कोंंड, वणंद, कापडगाव, आंबेटेंबे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, क्रांतिस्तंभ महाड, हरिजन सेवा संघ पुणे, सवाद बौद्धवाडी आदी स्थळांचा विकासकार्यात समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.