वझीर-ए-आझमांची अमेरिका वारी!

    दिनांक :25-Jul-2019
तोंडदेखली का असेना, पण ट्रम्पसाहेबांची मुलाखत मिळावी म्हणून सौदी अरेबियाच्या आडून घालावे लागलेले साकडे काय, भलामोठा गाजावाजा करून दौरा ठरवला, तर अमेरिकेत वाट्याला आलेले थंड स्वागत काय, विमानातून उतरल्यावर तळातून बाहेर पडेपर्यंत पैसे भरण्याची तयारी दर्शवूनही विशेष वाहनाची व्यवस्था साफ नाकारण्याचा उद्दामपणा काय, सारेच अजब! अफलातून! पण, अवमानाचे ओझे डोक्यावरून वाहतानाही साहेबांची चाल कशी झपकेबाज आहे. तोच तोरा, तीच मुजोरी, फुटाण्याचे दुकान असूनही बादशहाची तीच शान कायम ठेवण्यात पाकिस्तानच्या दस्तुरखुद्द पंतप्रधानांना करावी लागत असलेली कसरत, क्षणाक्षणाला पदरी पडत असलेल्या अपमानाचे घोट पिऊनही मान ताठ ठेवण्यासाठी चाललेल्या त्यांच्या धडपडीचे कौतुक करावे तेवढे कमीच! इम्रान खानसाहेबांचा अमेरिका दौरा, तिथल्या राष्ट्राध्यक्षांशी झालेली त्यांची भेट, दोघांनीही दहशतवादापासून तर काश्मीरपर्यंतच्या विविध मुद्यांवर केलेली निरर्थक चर्चा, केलेली वादग्रस्त विधाने... यातील कुठलीच बाब अपेक्षांना छेद देणारी नाही. सारेकाही अपेक्षेनुसार घडते आहे. हो! पाकिस्तान काय किंवा उर्वरित जग काय, कुणालाच इम्रान खान यांच्या या दौर्‍यात यापेक्षा काही वेगळे घडणे अपेक्षित नव्हते. नाही. खानांचे आगमन झाल्याबरोबर ट्रम्प उठून उभे राहतील अन्‌ दोघंही एकमेकांना आलिंगन देत गळाभेट घेतील याची दाट शक्यता नव्हतीच कधी.
 
पाकिस्तानी पंतप्रधानांचे वॉशिंग्टनच्या विमानतळावर आगमन झाले. खरंतर कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांचा दौरा म्हटलं की, प्रोटोकॉलचा भलामोठा ढिगारा उपसावा लागतो. अधिकार्‍यांची धावपळ सुरू होते. कोण सलामी देतोय्‌, कोण हारतुरे घेऊन उभा राहतोय्‌, कुणी बिगुल वाजवतोय्‌, कुणी हस्तांदोलन करायला सरसावतोय्‌... पण कसचं काय? इथे तर काळं कुत्रं नाही स्वागताला! आधी दाखल झालेले पाकिस्तानचेच परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी उभे राहिले हारतुरे घेऊन, अमेरिकेच्या धरतीवर पाकिस्तानी पंतप्रधानांचे स्वागत करायला. खरंतर अवमानाची मालिका इथूनच सुरू झाली होती. विमानापासून बसने प्रवास करून त्यांना तळाबाहेर पडावे लागले. तेथेही वाहन नव्हते हो. इम्रानला चक्क मेट्रोपर्यंत बसून पाकिस्तानी राजदूताच्या घरापर्यंत जावे लागले. अपमानाचा स्तर याहून खालचा तो कोणता असणार होता? बरं, भिकारड्या पाकिस्तानची लाचारी अन्‌ अगतिकता इतकी की, झाल्या प्रकाराबाबत साधा निषेध नोंदवायलाही जागा नाही कुठेच, तोंड दाबून बुक्क्यांचा मार चालला आहे नुसता. 
 
 
पण, गंमत पाहा कशी! अमेरिकेने जराशीही भीक घालू नये एवढी दयनीय अवस्था स्वत:च्या देशाची असताना, त्याबाबत बोलायचे सोडून, ते बेनं काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करू लागलं अमेरिकेशी. कालपर्यंत, दहशतवादाशी आमचा काडीचाही संबंध नाही, असे छातीठोकपणे सांगणार्‍या या देशाचे अन्‌ त्यांच्या दाव्याचे वाभाडेही अमेरिकेने त्यांच्यादेखत बेमालूमपणे काढले. अल्‌ कायदा नामक दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्या ओसामा बिन लादेन हा, अमेरिकेने पाकिस्तानात शिरून ठेचलेला दहशतवादी असला, तरी त्याला मारण्यासाठी पाकिस्तानची मदत कशी महत्त्वाची ठरली होती, याचा पाढा सार्‍या विश्वापुढे वाचताना, आपण यापूर्वीच्या आपल्याच विधानांना छेद देत आहोत, याचेही भान आयुष्यभर क्रिकेटच्या मैदानात रमलेल्या खानसाहेबांना राहिले नाही अन्‌ मग लादेनला आपल्या देशाने थारा दिला होता, हे वास्तवही त्यांना धड दडवून ठेवता आले नाही. पाकिस्तान हा दहशतवादाला आश्रय देणारा देश आहे, हे सत्य यापूर्वीही कित्येकदा उघड झाले आहे. पण, आपण तसे करीत नसल्याची मुजोर खात्री ते उच्चरवात जगाला द्यायचे. उरी अन्‌ पुलवामाच्या घटनेला उत्तर देताना भारताने पाकहद्दीतली दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली, तरी तसे काही घडलेच नसल्याचा दावाही ते त्याच माजोरेपणाने करीत राहिले. आता अमेरिकेच्या धरतीवर पाय ठेवताच तोल सुटला अन्‌ नाही ते बरळत ‘कबुलीजवाब’ देत सुटलेत पाकिस्तानचे ‘वझीर-ए-आझम.’
 
आजघडीला ज्या देशाच्या साक्षरतेचा दर फक्त 58 टक्क्यांवर आहे, जिथली आर्थिक स्थिती सावरण्याच्या पलीकडे गेली आहे, स्वत:च्या देशाचे विशेष विमान सोडून अमेरिकेपर्यंतचा प्रवास कतार एअरवेजने करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घ्यावा, इतपत अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे, जिथला विकासाचा दर दिवसागणिक खालावतो आहे, जिथे महिलांच्या प्रगतीचा आलेख अद्याप उंचावू शकलेला नाही, त्या देशाच्या पंतप्रधानांनी कॉलर टाईट करून जगाला विकासाचे धडे द्यावेत, इतरांच्या समस्यांबाबत तिसर्‍याच देशाच्या प्रमुखाशी चर्चा करावी, यासारखा विनोद नाही. पण, इम्रान खानांनी परवा तो विनोद घडवला खरा! खरंतर एका देशाचा पंतप्रधान दौर्‍यावर आलेला असताना अमेरिकेच्या अगदी खालच्या फळीतील अधिकार्‍यानेही स्वागताला उपस्थित राहू नये, या वर्तनातून जे सांगायचे ते त्या देशाने सार्‍या जगाला जाहीरपणे सांगून झाले असतानाही पाकिस्तानची खोड काही केल्या जात नाही. अजनूही दहशतवादाबद्दल अन्‌ काश्मीरच्या मुद्यावर त्याचा उद्दामपणा कायम आहे तो आहेच.
 
इम्रान खान यांच्या या दौर्‍याचे कवित्व अद्याप संपलेले नाही. पुढील कित्येक दिवस ते संपण्याची शक्यताही नाही. त्यातील किश्शांचेही चर्वितचर्वण सुरू आहे. न्यू जर्सीत इम्रानच्या स्वागतासाठी लागलेल्या पोस्टर्समध्ये लोकांनी त्यांना ‘फुकटात’ जेऊ-खाऊ घालण्याची ऑफर दिली आहे. या दौर्‍यादरम्यान िंसध आणि बलुचिस्तानमधील लोकांनी जागोजागी निदर्शने चालवलीत. मानवाधिकाराच्या तिथे उडालेल्या िंचधड्यांची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम खुद्द तिथले भुक्तभोगी करताहेत. वझीर-ए-आझमांनी या संदर्भात केलेल्या दाव्यांची िंकमत आपसूकच शून्यावर येऊन ठेपली आहे. दस्तुरखुद्द वझीर-ए-आझम उपस्थित असताना अमेरिकेने पाकिस्तानातील आयएसआय आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांची व्हाईट हाऊसमधील उपस्थिती अनिवार्य करून त्या चर्चेला महत्त्व प्राप्त करून दिले आहे, की इम्रान खान यांची इभ्रत मातीमोल ठरवली, हे ज्याचे त्याने ठरवावे. खानसाहेबांनी तर जरूर ठरवावे! त्याही उपर पाक प्रमुखांनी अफगाण आणि एकूणच दक्षिण आशियातील शांततेच्या मुद्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा करावी, हे असले आश्चर्यजनक अन्‌ विनोदी किस्से भविष्यातही चर्चेत राहतीलच. पण, पाकड्यांचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध यानिमित्ताने जगजाहीर झालेत, त्याचे अपश्रेय पूर्णपणे डोनाल्ड ट्रम्प आणि अर्थातच पाकिस्तानच्या विद्यमान वझीर-ए-आझम यांचे असणार आहे! शेवटी, या थराचे विनोद घडविण्याचे किमयागारही तर तेच आहेत...