विदर्भातील पहिल्या सैनिकी शाळेत मुनगंटीवारांना ‘गार्ड ऑफ ऑनर’

    दिनांक :26-Jul-2019
भविष्याचा सैन्यदल प्रमुख चंद्रपूर शाळेचा व्हावा
मुनगंटीवार यांचा कारगील दिन आशावाद
लेफ्टनंट जनरल निंभोरकरांचीही उपस्थिती
चंद्रपूर,
देशातील सर्वाधिक अद्ययावत, प्रशिक्षणाच्या सर्व सैन्य सुविधांनीयुक्त, रुबाबदार आणि भव्यदिव्य अशा विदर्भातल्या पहिल्या सैनिकी शाळेतील पहिल्याच तुकडीच्या अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या सैनिकी गणवेषातील विद्यार्थ्यांनी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. प्रसंग होता, कारगील विजय दिनाचा.
26 जुलै 1999 कारगीलचे युद्ध जिंकण्याचा दिवस. अल्पावधित मात्र अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने उभारलेल्या आणि लवकरच पंतप्रधान नरेंद मोदी किंवा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटित होऊ घातलेल्या या सैनिकी शाळेत हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील पहिल्या तुकडीला संबोधित करताना मुनगंटीवार यांनी, भविष्यात या शाळेचा विद्यार्थी आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्सचा प्रमुख व्हावा आणि त्याने गर्वाने चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे नाव सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
 
या सैनिकी शाळेत भारतातील अद्ययावत असे सैनिकी संग्रहालय आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू या ठिकाणी असलेल्या संग्रहालयापेक्षाही हे अधिक उत्तम आहे. ताडोबात पर्यटनाला येणार्‍या नागरिकांसाठी या शाळेला भेट देणे एक पर्वणी ठरणार असून, निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचा परिसर बघता येऊ शकतो. दर्शनी भागात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणार्‍या शहीद वीरांचा बोलता इतिहास दर्शविणारे पुतळे उभारले आहेत. कारगील युद्ध, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकाचे त्रीमितीय माहितीपटही पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर आदी सर्व लढाऊ साहित्य येथे ठेवण्यात आले असून, दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे तयार करण्यात आली आहे. येथील मैदान हे ऑलिम्पिक खेळाच्या दर्जाची आहे.
अशा या शाळेत एव्हाना केंद्रीय नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, 90 विद्यार्थ्यांच्या, सहाव्या वर्गाच्या पहिल्या तुकडीच्या अभ्यासक्रमाला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी कारगील विजय दिनानिमित्त या शाळेत देशभक्तीने ओतप्रोत कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमाला ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये मुख्य भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि ज्यांनी अथक पाठपुरावा व विक्रमी वेळेत 123 एकरामधील ही शाळा चंद्रपूरकरांना लोकार्पित केली, असे सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोबतच एअर व्हाईस मार्शल बी. मणिकंटन, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, विभागीय मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सैनिकी शाळेचे प्राचार्य स्कॉर्डन लिडर नरेशकुमार, उपप्राचार्य लेप्ट कमांडर अनमोल आदींचीही उपस्थिती होती.
या शाळेतील अमर जवान ज्योतीवर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. उपस्थित सर्व 90 विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना सलामी दिली. हा क्षण पालकमंत्र्यांना गौरवान्वित करणारा होता. त्यानंतर सैनिकी शाळेचे गीत, एअर फोर्स दलाच्या बँडचे संचालन व शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक लक्षवेधी होते.
मुनगंटीवार म्हणाले, देशातील 712 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाघ असणारा जिल्हा चंद्रपूर आहे. त्यामुळे या सैनिकी शाळेतून निघालेला प्रत्येक विद्यार्थी या देशाचा नावलौकिक वाढविणारा विद्यार्थी असेल. ही सैनिकी शाळा विक्रमी 14 महिन्यात तयार झाली आहे. त्यांनी केवळ ही सैनिकी शाळा उभारली नाही, तर देश मजबूत करण्यासाठी काम केले आहे. चंद्रपूरची सैनिकी शाळा हे आपले एक स्वप्न असून, खरा आनंद जेव्हा हा या शाळेतला विद्यार्थी वीस-पंचवीस वर्षांनंतर देशाच्या आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये महत्त्वाच्यापदावर असेल आणि तो अधिकारी जेव्हा सांगेल की होय, मी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा विद्यार्थी आहे, तेव्हा मला मनस्वी समाधान होईल, असेही ते म्हणाले.