तारक मेहता मालिकेत होणार बदल

    दिनांक :26-Jul-2019
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.
 

 
 
 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला दयाबेन आणि सोनू या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत नाहीयेत. या मालिकेत दयाबेनची भूमिका दिशा वाकानी साकारत होती तर सोनूच्या भूमिकेत निधी भानुशाली होती. दिशाने तिच्या गरोदरपणात ही मालिका सोडली. दिशाला काही महिन्यांपूर्वी मुलगी झाली असून ती तिची सगळा वेळ तिच्या मुलीसोबत घालवत आहे. प्रेक्षकांची ही लाडकी दिशा कधी परतणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण त्याचसोबत या मालिकेत सोनूची व्यक्तिरेखा पुन्हा प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार यासाठी देखील प्रेक्षक आतुर झाले आहेत. सोनूच्या भूमिकेत असलेल्या निधीने काही महिन्यांपूर्वी पुढील शिक्षणासाठी या मालिकेला रामराम ठोकला होता.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सोनूच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेण्यात आले असून जीनल जैन आणि पलक सिडवानी यांच्यापैकी एखादी अभिनेत्री या भूमिकेत दिसू शकेल. पलकने काही जाहिरातींमध्ये काम केले असले तरी ती कधीच कोणत्या मालिकेत झळकली नाहीये तर जीनलने पवित्र रिश्ता, ये वादा रहा, प्यार के पापड या मालिकांमध्ये काम केले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सोनूची भूमिका निधीच्या आधी झील मेहता साकारत होती. तिने २०१२ मध्ये ही मालिका सोडल्यावर निधीची या मालिकेत एंट्री झाली. काहीच दिवसांत तिने प्रेक्षकांचे मन जिंकले.