वैद्याची आज्ञा शिरसावंद्य!

    दिनांक :26-Jul-2019
वैद्य सुचित्रा कुळकर्णी
 
घारपुरे काकांचं वय 75 वर्षे! सामाजिक जीवनात सक्रिय. आणिबाणीत तुरुंगवास भोगलेले. तरी उत्साही, दक्ष आणि कार्यरत व्यक्तिमत्त्व. काका माझ्याकडे औषधाला यायला लागायच्या आधीच त्यांना काही मोठे शारीरिक आजार जडले होते. पण म्हणून त्यांच्या उमेदीत, फिरण्यात काहीच फरक पडला नाही. ते मला नेहमी सांगायचे- ‘‘मी आजाराला घाबरत नाही. माझ्या तक्रारींचा पाढा कोणाहीसमोर वाचायला मला आवडत नाही. फक्त होता होईतो शेवटपर्यंत स्वावलंबीपणे जगता यावं म्हणून तुम्हाला अगदी बारीकसारीक तक्रारी पण सांगतो.’’
 
काकांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मी जी सूचना देईन त्याचं ते काटेकोरपणे पालन करायचे. अभ्यंग करा म्हटलं-लगेच सुरू. आवळ्याचा आणि ताज्या हळदीचा रस घ्या म्हटलं तर ते चिरणं, मिक्सरमधून काढणं, गाळणं सगळे उद्योग ते स्वतः करायचे. घरी कोणाला त्रास द्यायला मला आवडत नाही, म्हणायचे. शेका म्हटलं, शेकायचे. कोबीचा रस घ्या म्हटलं तर चांगला दोन महिने घेतला. त्यासाठी कोबी वाफाळण्यापासूनचे उद्योग चिकाटीनं केले. कंटाळा नावाची गोष्ट नाही. मीच सांगताना कचरायचे. पण ते म्हणायचे, सांगा ना, कसं, कधी करायचं ते मी बघतो. याचा फायदा अर्थात त्यांनाच व्हायचा. 
 
 
कुठलाही आजार लवकर बारा व्हायचा असेल तर वैद्याच्या अंगी जसे काही गुण असणं आवश्यक आहे, तसेच रुग्णाच्याही अंगी असायला हवेत. त्याला एक गुण म्हणजे वैद्याला वश असणं म्हणजे वैद्य जे सांगेल ते श्रद्धेनं ऐकणं. (फक्त रुग्णच नाही, तर रुग्णाचा आचारी देखील वैद्याला वश असावा असं म्हटलं आहे.) मला तरी आजपर्यंत घारपुरे काकांच्या इतका आज्ञाधारक रुग्ण बघायला मिळाला नाही. कुठलाही पथ्य, घरगुती उपाय, व्यायाम, योग-असा सल्ला दिला की रुग्णांची कुरकुर चालू होते. वेळ नाही. जमणार नाही. वेगळा स्वयंपाक कोण करणार? घर लहान आहे, अशी ढीगभर कारणं सांगितली जातात. जसं काही हे सगळं माझ्यासाठीच करायचं आहे.
 
एका रुग्णानं तर एकदा धमाल केली. पाठीच्या दुखण्यासाठी त्यांना थोडे सोपे व्यायाम करायला सांगितले. समजावून सांगितले आणि लिहून देखील दिले.
‘‘कधी करायचे हे व्यायाम?’’ त्यांनी भोळेपणानं विचारलं.
‘‘अर्थात सकाळी!’’
‘‘सकाळी कधी? आंघोळीच्या आधी की नंतर?’’ पुढचा प्रश्न.
‘‘आधी. पोट साफ झालं की लगेच.’’
‘‘आणि पोट नाही साफ झालं तर?’’
‘‘तरी करायचे.’’ मी
‘‘पण मला सकाळी वेळ नाही मिळणार व्यायाम करायला.’’ ‘‘मग? हे आधीच सांगायचं ना! म्हणजे आधीचे दोन प्रश्न असेच विचारले?’’
‘‘पंधरा मिनिट लवकर उठा.’’
‘‘झोप पूर्ण नाही होत हो! रात्री झोपायला उशीर होतो ना!’’
‘‘का?’’
‘‘मी येतो उशिरा. मग जेवण, थोडा टीव्ही, गप्पा..’’
‘‘अहो मग टीव्ही कमी करा.’’
‘‘तेवढी तरी करमणूक नको का? मी काय म्हणतो, संध्याकाळी केला तर चालेल?’’ बाहेर दुसरे रुग्ण ताटकळत बसलेले आणि यांचे प्रश्न काही संपेचनात. दहा मिनिटांनी माझ्याच लक्षात आलं. मग मात्र जरा कडक आवाजात म्हटलं, ‘‘हे बघा, बरं होण्यासाठी तुम्हाला व्यायाम आवश्यक आहे हा सल्ला मी दिला आहे. तो अंमलात कसा आणायचा, हे तुम्ही ठरवायचं. ते देखील मी सांगणं अपेक्षित असेल तर टाईम मॅनेजमेंटची वेगळी कन्सल्टिंग फी द्यावी लागेल. आणि जो पर्याय मी सुचवतेय्‌ त्या प्रत्येकाला तुम्ही नुसती कुठलीही फालतू कारणं सांगून नकारच देताय!’’ (पैशाचा विषय निघताच सगळे प्रश्न आपोआप सुटले हे वेगळं सांगायला नकोच.) मात्र हा रुग्ण वैद्याचा सल्ला ऐकायच्या मनःस्थितीत अजिबात नव्हता हे तेव्हाच स्पष्ट झालं.
मसाज करायचा असेल तर सर्दी, ताप, कणकण-अशी कुठलीही लक्षणं असता कामा नये. अशी लक्षणं असताना मसाज केला तर लक्षणं वाढू शकतात. असं रुग्णांना कितीही निक्षून सांगितलं, तरी मसाज चुकायला नको म्हणून ते अश्या गोष्टी दडवतात. मग दुसर्‍या दिवशी पार आडवं व्हायची वेळ आली की म्हणतात, असं कसं झालं?
 
बाहेरचं काही खाऊ नका, थंड पेयं नको, दोन दिवस पूर्ण विश्रांती घ्या, जागरण नको, दिवसभरात औषधाचे किमान तीन डोस पोटात जायला हवेतच, उपास असला तरी औषधं घ्या, अशा सूचना कितीही जीव तोडून दिल्या; तरी तो त्या न ऐकणारा एक मोठा वर्ग असतो. नंतर मात्र औषधानं काहीच बरं वाटलं नाही हो. असं म्हणून वैद्याला पेचात टाकायला तयार! याउलट जे रुग्ण वैद्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करतात, ते त्याचे फायदे चाखतात.
 
मना आतुरा पथ्यपन्थेची जावे।
तरी धन्वंतरी पाविजेतो स्वभावे।।
वैद्या निंद्य ते सर्व सोडून द्यावे।
वैद्या वंद्य ते सर्व भावे करावे ।।