शांताबाईंचे ‘संस्मरणे...’

    दिनांक :26-Jul-2019
अर्चना संजय मुळ्ये
 
ऊवारी पातळ, डोईवर पदर, कपाळी भलमोठं कुंकू ल्यायलेल्या. भारदस्त पण शांत, निगर्वी मराठमोळं रूप म्हणजे शांताबाई! अगदी आपल्या आज्जीची सहजच आठवण करून देणारं व्यक्तिमत्त्व!
 
‘शांता शेळके’ म्हणताच काही गाणी चटकन डोळ्यांसमोर येतात. ती म्हणजे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, जय शारदे वागेश्वरी, शूर आम्ही सरदार, रेशमाच्या रेघांनी, मराठी पाऊल पडते पुढे, जरा थांब थांब थांब जरा थांब... अशी कितीतरी लांब जंत्री आहे. काव्यातली सहजता, शब्दप्रभुत्व, ओघवती भाषाशैली आणि विशेष म्हणजे विषय विविधता ही त्यांची लेखन खासियत. असं म्हणतात की, सिनेमासाठी उत्तमोत्तम गाणी लिहिणारे गदिमा गेल्यानंतर काव्यप्रभू म्हणून प्रथम जे नाव डोळ्यांसमोर येत होतं ते म्हणजे शांताबाईंचं!
 
शांताबाईंनी फक्त गीत, काव्य लेखनप्रकार हाताळला नाही, तर कथा, कादंबर्‍या, समीक्षात्मक लेख, आत्मपर लेखन, ललित लेख, व्यक्तिचित्रे, अनुवाद इ. विविध प्रकार हाताळले, परंतु ‘कविता’ हा त्यांचा सर्वात आवडता आणि मनाला जवळचा असणारा साहित्यप्रकार आहे. गेल्या कित्येक वर्षांत वेळोवेळी लिहिलेल्या वाङ्‌मयीन लेखांचा हा संग्रह आहे. काही मासिकांत, नियतकालिकांत छापून आलेले हे लेख असल्याने त्यांचे सलग सूत्र नाही. ते शोधायचेच झाले तर ‘माझे साहित्यप्रेम हेच ते होय,’ असे त्या म्हणतात.
 
भोवतालच्या जगाविषयी अपार कुतूहल असणार्‍या, मनुष्यस्वभावातील बारीक कंगोरे न्याहाळण्याची आणि स्वतःला आलेले सूक्ष्मतिसूक्ष्म अनुभवही इतरांपर्यंत पोहचवण्याची उत्सुकता असणार्‍या शांताबाई पदोपदी त्यांच्या या ललित लेखातून डोकावत असतात.

 
 
बालवयापासून तर आजपावेतो घडत गेलेल्या गोष्टी आपल्याजवळ साठलेल्या असतात. त्या सगळ्याच स्मरणात राहतीलच असे नाही, पण तरीही ढोबळमानाने त्या आठवतात, त्याचे आजूबाजूचे संदर्भही लक्षात राहतात. आपण त्या भूतकाळातील रमणीय किंवा क्लेशकारक गोष्टींमध्ये गढून जातो. काय चूक, काय बरोबर याचा तपशीलही सहजच डोळ्यांसमोर येतो. अशाच स्मरणातील गोष्टींचा लेखाजोखा शांताबाईंनी (शेळके) ‘संस्मरणे’ या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडला आहे. त्यांच्या बालपणापासूनचा हा प्रवास म्हणजे कायम स्मरणात राहणारा अमूल्य ठेवाच आहे. भरपूर वाचनातून येणारी संदर्भसंपन्नता, काव्यात्मवृत्तीतून निर्माण होणारी रसवत्ता आणि उत्कट जीवनप्रेम, आशयसंपन्नता यामुळेच त्यांचे हे ललित लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत.
 
पुस्तकात क्रमशः पाऊलवाटा, जुनी ओळख, न झालेल्या भेटी, गांधीजी माझे माझ्यापुरते, साहित्य आणि नीतिमत्ता, न जमलेला वाङ्‌मयप्रकार, माझा आवडता कवी माधव ज्युलियन, काव्यानुवाद, एक छंद एक आनंद, बेथ, दैवलीला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, चेंजिंग, एक वेगळे आत्मकथन, माझ्या कवितांच्या जन्मकथा, एक गाणे आठवणीतले, जुन्या संस्कृतीचा नवकथाकार, रजतरसाचे चांदणे... असे एकामागून एक वाचनीय लेख आहेत. खरे सांगायचे तर प्रत्येक लेख वाचनीय तर आहेच, पण त्या लेखातून बाईंचे विविधता दर्शन घडत आहे आणि या लेखातून बाई आपल्याशी जणू संवाद साधत आहेत, असंच वाटतं. जुन्या आठवणींच्या रचलेल्या घड्यांमधून एकेक घडी आपल्यासमोर उकलावी आणि त्यातील कलाकुसर नजरेस पडून आपले डोळे तृप्त व्हावेत, असेच काहीसे एक वाचक म्हणून माझे झाले. आठवणींच्या स्मरणात रमलेल्या बाई कधी अवखळ मुलीच्या रूपात येतात, तर कधी पुस्तकाच्या स्वाधीन झालेल्या रूपात येतात, तर कधी जिद्द, चिकाटी, व्यासंग याचा ध्यास असलेल्या बाई पुढ्यात येतात. पण जराशा कोषात रमणार्‍या, हव्यासाच्या प्रसिद्धीच्या पाठी न लागणार्‍या बाई हळूच मनाच्या कोपर्‍यात घर करून राहतात. कधीकधीतर पुस्तक आणि शांताबाई या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात इतकं तादात्म्य पावलेलं रूप वाचकाला शांताबाईंचं दिसतं.
 
चला तर! आपण या पुस्तकातील काही लेखमालेतून फेरफटका मारून रसतृप्तीचा आनंद घेऊ या!
ही बाईंच्या लहानपणीची गोष्ट! वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर असल्याने, बदलीच्या ठिकाणी बहुतेक करून गावाबाहेरच बंगले असत. गावाबाहेर एकाकी वस्तीत राहावे लागत असल्याने त्या वेळी आईला संगतसोबत म्हणून भरपूर पुस्तके, मासिके बाबा आणून ठेवीत. आई पुस्तके वाची म्हणून मीही वाचायचे. असे करतच पुस्तकांच्या जगात पुस्तकांनी मला त्यांचे सदस्य करून घेतले, असं त्या गमतीने सांगतात. घरात सगळ्याच तर्‍हेची पुस्तके असल्याने कुठले वाचावे नि कुठले वाचू नये, असे कुठलेच बंधन नव्हते. म्हणजे मी लहान म्हणून लहानांचीच पुस्तके वाचावी असा आग्रह नसे. पुस्तकं हुडकताना सहजच एखादेवेळेस मोठ्यांचे विषय असणारे पुस्तकेही मला वर्ज्य नसत (आणि बंधनही). सहजच एक उदाहरण म्हणून सांगते. त्या काळी बरेच गाजलेले स्वामी शिवानंद यांचे ‘ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यू’ एकदा वाचत बसले असता, माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या ते लक्षात आणून दिले. माझे वडील मात्र मला त्यातलं काय कळतं म्हणून फक्त हसले. सांगायचा मुद्दा हा की, पुस्तकाच्या बाबत कसलेही बंधन नव्हते. ‘उच्च प्रतीचे जितकं वाचलं तितकंच निम्नदर्जाचेसुद्धा.’ याचा परिणाम असा झाला की, किशोरवयात अमके वाचू नकोस, तमकेच वाच असे कुणी म्हटले नाही. त्यामुळे तसल्या पुस्तकांच्या बाबतीत पुढे एक छान निरोगी वृत्ती माझ्या ठायी जोपासली गेली. माझ्या कोवळ्या वाचनप्रेमाची बाळपावले या अशा चित्रविचित्र मुक्त पाऊलवाटांवरून पडत गेली आणि त्यांना साहित्याच्या राजरस्त्यावर अलगद आणून सोडले.
 
इथून त्यांच्या वाचनप्रवासाला सुरुवात झाली, पण वाचनसंस्कार जसे वाचनाने होतात तसेच ते मौखिक पाठांतरातूनही होतात. बालपणी आजोबांच्या सान्निध्यात असताना वेगवेगळी रामाची पद त्यांच्या तोंडून रात्रीच्या शतपावलीच्या वेळेस ऐकलेली. तेव्हा सहजच राम कोण? सीता कोण? या प्रश्नांच्या उत्तारादाखल मला मिळालेली बालरामायणाची अनोखी भेट आजही स्मरणात जपून ठेवली आहे. वाढत्या वयात त्याचाच परिणाम म्हणून ‘उत्तमरामचरिताशी’ माझं नात जडलं, असे त्या म्हणतात. भवभूतीने या नाटकात राजा ‘राम’ आणि सीता ‘पती’ यांच्या मनातील चमत्कारिक गुंतागुंत आणि मानवी जीवनातील अपरिहार्यता मांडली आहे. राजेपणाच्या आवरणाखाली आर्त वेदनेने तळमळणारा ‘राम’ हा ‘पती’ आहे, ‘प्रियकर’आहे, त्याचे हे रूप उत्कटपणे उभे केले आहे. आजही प्रत्येक आठवणीसरशी ‘उत्तमरामचरित’ नव्याने ओळखीचे होते, नव्याने जवळीक साधते आणि तरीही त्यातले अजून बरेच कळायचे आहे, असंंच त्यांना वाटते.
 
‘गांधीजी माझे माझ्यापुरते’ या लेखात गांधीजी या माणसाबद्दल वाटणार्‍या ओढीविषयी त्या लिहितात की, गांधीजींचा स्वातंत्र्यलढा, उपोषणे, भाषणे, सत्याग्रह या सगळ्याचाच भारत देशभर प्रभाव होताच. पुण्यात बरेचदा शांताबाईंनीदेखील त्याचा प्रत्यय घेतला. साधारणपणे एम. ए . झाल्यावर अत्र्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकात काम करत असतानाची घटना होती गांधीजी गेल्याची. त्या वेळी त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखात त्यांनी ‘माझ्या मनातले गांधी’ यात कुसुमाग्रजांच्या ओळीतून भावना व्यक्त केल्या आहेत. 
मी जिंकलो! मी जिंकलो!
तेजार्णवी नव पोहलो
आकाश व्यापुनी राहिलो
आता तमा कसली तरी?
संजीवनीमधी नाहलो
मी जिंकलो! मी जिंकलो.
त्या रात्री माझ्यातल्या माणसाला त्यांच्यातल्या माणसाच्या निधनाचे दुःख प्रथमच पण तीव्रतेने झाले नि गळा भरून आला.
‘साहित्य आणि नीतिमत्ता’ याबद्दल त्या अतिशय परखडपणे नैतिक- अनैतिकतेची बाजू मांडतात. वाचनाची आवड उपजतच असल्याने साहित्याच्या जवळजवळ सगळ्या प्रकारांमध्ये लेखन केले, परंतु कादंबरी लेखनाने त्यांना मनासारखे समाधान मिळाले नाही. ‘स्वप्नतरंग’ या पहिल्यावहिल्या कादंबरीच्या अनुभवातून त्या बरंच काही शिकल्या आणि आजही ‘कादंबरी’ हा आपल्या आटोक्यातला वाङ्‌मयप्रकार नव्हे, असेच त्यांना वाटते.
 
कॉलेजच्या मुक्त वातावरणात प्रवेश केल्यावर आता सारे रानच मोकळे होते. एकीकडे संत, पंडित, शाहीर यांच्या काव्याच्या निकट सहवासातून वृत्तरचनेचे, भाषाशुद्धतेचे संस्कार लाभत होते; तर दुसरीकडे रविकिरण मंडळाच्या कवींच्या कवितेतून रचनेची शुद्धता, साक्षेप, टापटीप व नेमकेपणा यांचा वस्तुपाठ त्यांच्या कवितेतून मिळत होता. तो माझ्याही कवितेत उतरला, हे त्यांचेच श्रेय, असं त्या म्हणतात. त्यातीलच एक आवडते कवी म्हणजे माधव ज्युलियन! तरुण, भावुक, स्वप्नाळू वयात मी व माझ्यासारख्या अनेकांना वेड लावणारे! त्यांच्या कवितेतील शब्दयोजनेपासून तो शैलीपर्यंतचा स्वतंत्रपणा, वृत्तीची बेहोशी, प्रेमकवितांची धुंदी आणि उत्कट आत्मसमर्पणाची ओढ, धाडसी प्रयोगशीलता याचे महत्त्व त्या काळातसुद्धा जाणवत होते.
 
जीव तुझा लोभला माझ्यावरी रे मोहना
या रुणाची विस्मृती ती न कधी होवो मना
का मुळी कोणी करावे प्रेम एखाद्यावरी?
हे तुझे सौजन्य, पाणी आणिते या लोचना
प्रेम होईना तुझ्याने प्रेम माझे राहु दे
आचरू ये धर्म तुझा तू नि मी माझा मुदे...
 
त्या काळी अशा मुक्त, स्वच्छंद, बेहोश आणि धुंद प्रणयाच्या चित्रणाने तरुण मने वेडावून गेली नसती तरच नवल! आजही त्यांच्या कविता अधूनमधून वाचताना जुन्या धुंदीचा, ध्येयवादाचा, स्वप्नरंजनाचा आनंद अनुभवते आणि पुढीलसारख्या त्यांच्या ओळी वाचल्या म्हणजे त्यांच्या-माझ्यातल्या अतूट नात्याची मला तीव्रतेने जाणीव होते.
 
येथे स्थिरेना चारुता, बांधू कशाला गेह मी
हुडकीत चारु गंभीरता, हिंडेन भूवर नेहमी...
 
स्वतंत्र काव्यरचनेबरोबरच शांताबाईंनी वेगवेगळ्या भाषेतील काव्यानुवादही केला आहे. त्या म्हणतात की, अनुवादांनी फार मोठे निर्मिती-श्रेय दिले नसेल, पण आनंद भरभरून दिला, यात शंकाच नाही.
 
साधारणपणे इंग्रजी पाचवीत असतानाची गोष्ट, शाळेत वर्गशिक्षिकेचे कपाट आवरून देताना एक इंग्रजी पुस्तक हाती लागले ‘लिटल वुईमेन’ नावाचं. ज्यात चार बहिणींपैकी असलेली तिसरी बहीण ‘बेथ’ म्हणजे ‘एलिझाबेथ’ हिच्यावर बेतलेली कथा आहे. ही कथा वाचताना बेथचे आणि बहिणींसोबतचे भावविश्व उलगडताना जिवाची होणारी घालमेल प्रत्यक्ष अनुभवतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. ‘लिटल वुइमेन’चा अनुवाद युसिससाठी ‘चौघी जणी’ या नावाने बाईंनी केलेला आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अलौकिक सौंदर्यकला, कर्तृत्व, कसलाही लाभ न झालेली एक साधी, सरळ, निष्पाप मुलगी पानांच्या दाट गर्दीत फूल उमलावे तसे तिचे जीवन उमलते. चार दिवस वार्‍यावर हलते-डुलते आणि चार दिवसांनी फुलासारखेच मातीत गळून पडते, मागे राहते ती फक्त एक उदासवाणी मंदसुगंधी आठवण!
 
शांताबाईंचे लेखन म्हणजे जणू भावसंवाद... अतिशय एकरूप होऊन खोलवर अभ्यासपूर्ण रीतीने बारीक-सारीक संदर्भांचा लेखाजोखा साध्या, सरळ पण सुबक पद्धतीने घेण्याची सवय मनाला भुरळ पाडते.
 
हा त्यांचा लेखनप्रवाह असाच झुळझुळत वाहात असताना, आम्हा रसिकवाचकाला त्या निर्झरेचे थेंब दोन थेंब पोटात पडावे व रसनातृप्ती व्हावी, हाच खरातर अमृतयोग आहे.
marchana151967gmail.com