सजावट आणि व्यक्तिमत्त्व

    दिनांक :26-Jul-2019
अवंतिका तामस्कर
 
आपल्या घराची सजावट आपल्या आणि आपल्या घरातील लोकांचे व्यक्तिमत्त्व सांगत असते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या विचारसरणीला अनुरूप आहेत, अशाच वस्तूंनी घर सजवा. खूपशा इंटरनेट वेबसाईट्‌सवर घर सजावटीच्या नवनवीन वस्तू पाहायला मिळतात. त्यांच्या किमती प्रत्येक साइटवर निराळ्या असू शकतात. थोडेसे कष्ट घेतल्यास अगदी स्वस्त व उत्तम डील हाती येऊ शकते. फक्त चांगल्या गोष्टींचा खप सर्वात आधी होतो. त्यामुळे नवनवी डील्स समजून घेण्यासाठी या साइट्‌स नियमितपणे पाहणे आवश्यक असते.
 
 
आपण डेकॉर डिटेल्सकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. टेबलवरील कोस्टर्स, फ्लोअर पॉटस्‌, पायपुसण्या, फोटोफ्रेम्स इत्यादी लहान लहान वस्तूंच्या समावेशाने घरात संपूर्णतेचा अनुभव निर्माण करता येतो. कोणाला आधुनिक डेकोर पसंत असेल, तर कोणाला काहीसा पारंपरिक डेकोर पसंत असेल. या दोहोंचे मिश्रण जरी करावयाचे झाले, तरी ते काळजीपूर्वक करायला हवे. फर्निचर आधुनिक ट्रेंडनुसार असले, तरी पारंपरिक पद्धतीने किंवा तशा थिमला अनुसरून असलेली पेंटिंग्ज, गालिचे, शोभेच्या वस्तू यातून जुन्या-नव्याचा उत्तम संगम साधता येऊ शकतो.
 
काही जणांना नकली, प्लॅस्टिकच्या फुलांचा घराच्या सजावटीत वापर करायला फार आवडते. पण हा अतिवापर काटेकोरपणाने टाळा. जर प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करायचाच असेल, तर तो अगदी मोजक्या प्रमाणात करा. तसेच ही फुले दर पंधरा दिवसांनी साबणाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवा आणि त्यांची रचनाही बदला. सध्या गृहसजावटीचे ज्या ट्रेंड्‌स चालू आहेत, त्यापैकी प्रत्येक ट्रेण्डचे अनुसरण करणे टाळावे. अशाने तुमच्या घराचा डेकोर नक्की कसा आहे, हे समजणार नाही. शोभेच्या वस्तूंची उलटपालट केल्यानेही घराचा लुक पालटवता येतो. हे करायचे तर, सर्वात आधी घरातील सर्व शोभेच्या वस्तू एकत्रित एका खोक्यात भरा आणि आता निरनिराळ्या रूममध्ये जाऊन नेमक्या जागेवर सर्वात जास्त शोभणारे शोपीस त्या सर्व वस्तूंमधून निवडा. यामुळे एकाच वेळी सर्व वस्तूंचाव रूम्सचा विचार केला जाईल, सहजपणे योग्य वस्तूला तिची योग्य जागा मिळून घराची शोभा अधिक वाढेल.
 
जर घरात एखाद्याला खरोखर फुलांची हौस असेल, तर दररोज घराच्या हॉलमध्ये ताज्या फुलांनी भरलेली फुलदाणी ठेवा. आकर्षक पद्धतीने, विचारपूर्वक केलेली फुलझाडांची किंवा शोभेच्या झाडांची मांडणी घराचे सौंदर्य अधिक आणि नैसर्गिक पद्धतीने खुलविते. आपल्या घरामध्ये अँटिक वस्तूंचे भरघोस प्रदर्शन टाळावे. जरी आपल्याकडे पारंपरिक, अँटिक वस्तू मोठ्या प्रमाणात असतील, तरी त्या सगळ्या वस्तू एकाच वेळी, एकाच ठिकाणी ठेवायलाच हव्यात, असे नाही. काही वस्तू काही काळाकरिता मांडून ठेवून, त्यानंतर त्या वस्तू आतमध्ये ठेवून देऊन त्या जागी दुसर्‍या वस्तू मांडता येतील.
 
असे केल्याने दर काही काळाने आपला डेकोरही बदलत राहील, आणि आपल्या घरामध्ये खूप वस्तू भरून ठेवल्या आहेत असे पाहणार्‍याला वाटणार नाही. आपल्या घरी जेव्हा कोणीही पाहुणे भेटीसाठी येतात, तेव्हा त्यांनी आपल्या घराचे, सजावटीचे केलेले कौतुक कोणाला नको असते? किंबहुना तसे कौतुक कानी पडले, की आपले घर सुंदर ठेवतानाचे आपले लहान मोठे सर्व प्रयत्न कारणी लागल्याचे समाधान आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्या घराची सजावट करताना अगदी लहान लहान गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा.