माहिती-तंत्रज्ञान आणि स्त्रीविकास...

    दिनांक :26-Jul-2019
डॉ. वर्षा गंगणे
 
शिक्षण ही विकासप्रक्रियेतील पहिली आणि महत्त्वपूर्ण पायरी आहे. शिक्षणाने सभ्यता, सुसंस्कृतपणा आणि प्रगतीचे टप्पे गाठता येतात. आदिमअवस्थेपासून ते माहिती-तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगापर्यंत मानवाला आणण्याचे कार्य शिक्षणानेच साध्य केले आहे. म्हणूनच कोणत्याही देशाच्या विकासाचे निकष ठरविताना शिक्षण हा महत्त्वपूर्ण निकष ठरविला गेला आहे. कोणत्याही देशाच्या विकासाचे मूळ त्या देशाच्या शिक्षित मनुष्यबळातच असते. ज्या देशात सुशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असेल, तो देश येणार्‍या काळात झपाट्याने विकास साधेल, हे सर्वमान्य झाले आहे. वर्तमान शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे व ज्ञानाधारित संपत्तीचे शतक आहे. ज्ञानातून संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणच करू शकते. याचे उदाहरण म्हणजे विकसित देशात दर्जेदार, उच्च प्रतीचे शिक्षण व संशोधनात्मक शिक्षणामुळेच हे देश नवीन ज्ञानाची निर्मिती करतात व त्यातून मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती करून आर्थिक विकास साधतात; तर गरीब देशात याउलट चित्र दिसून येते. त्यांच्याकडे शिक्षित मनुष्यबळ व संशोधक कमी असतात, परिणामी विकासाच्या प्रक्रियेत ते मागे पडतात.
 
महासत्तेच्या वाटेवरील भारतातदेखील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत, होत आहेत. आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. कागदी पसार्‍यांपेक्षा तांत्रिक शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच ई-शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. संगणक, संदेश दळणवळण, संप्रेक्षण, विज्ञान व त्यांच्याशी असलेल्या घटकांत क्रांती होत आहे. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची प्रगती व संशोधनाला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे देशाच्या भौगोलिक सीमा नष्ट होऊन शिक्षणाचे जागतिकीकरण झाले आहे. इतर देशातील शिक्षण सहज सुलभ पद्धतीने आत्मसात करणे सोपे झाले आहे. त्यामुळे शिक्षण अधिक लवचीक आणि परिणामकारक ठरले आहे. शिक्षणाची उपयुक्तता व परिणामकारकता वाढली आहे. 

 
 
शिक्षणाच्या जागतिकीकरणामुळे उत्तमोत्तम संकल्पना व अभ्यासविषय, पद्धती सर्वपरिचित होऊ लागल्या आहेत. लेखन, वाचन, व्याख्याने इत्यादी शिक्षणाचे स्वरूप व पद्धती कालबाह्य होऊन माहिती व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणास महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. कदाचित म्हणूनच शिक्षकाची भूमिका जागतिकीकरणाच्या काळात बदलत चालली आहे. शिक्षक म्हणजे शिकविणारा, या संकुचित अर्थातून शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, हा अर्थ रूढ झाला आहे. थोडक्यात, वर्तमानात शिक्षणाची व्याप्ती, स्वरूप आणि मापदंड बदलले आहेत. शिक्षणाचे जागतिकीकरण झाल्याचे अनेक फायदे समोर येऊ लागले आहेत. शिक्षण, ज्ञान, ज्ञानातून संपत्तीची निर्मिती आणि त्यातून निर्माण होणार्‍या अर्थकारणाचे जागतिकीकरण व त्यामुळे होणारा विकास, अशी एक नवीन लहर निर्माण झाली आहे, जी सुदृढ-सक्षम भारत बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
 
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात देशाचा विकास साधायचा असेल, तर स्त्रियांचा विकास, त्याचे प्रमाण, स्त्रीशिक्षण आणि स्वरूप, स्त्रीसाक्षरतेचे महत्त्व, माहिती व तंत्रज्ञानक्षेत्रातील स्त्रियांची प्रगती, जागतिकीकरणात स्त्रियांचे स्थान इत्यादी सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. कारण ज्या देशातील स्त्री विकसित तो देश विकसित, हे समीकरण सर्वत्र लागू झाले आहे.
विषय निवडीची उद्दिष्टे-
 1. माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षणातील महत्त्व जाणून घेणे.
 2. जागतिकीकरणाचे शैक्षणिक क्षेत्रावरील परिणाम अभ्यासणे.
 3. माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षणावरील परिणाम जाणून घेणे.
 4. शैक्षणिक विकासाचे स्त्रीसक्षमीकरणावरील परिणाम विचारात घेणे.
 5. माहिती-तंत्रज्ञान, शैक्षणिकक्षेत्रातील बदल व त्याचा स्त्रीविकासातील सहभाग यावर दृष्टिक्षेप टाकणे.
गृहीतके-
 1. जागतिकीकरणाचा शिक्षणावर परिणाम झाला आहे.
 2. माहिती-तंत्रज्ञानामुळे शैक्षणिकक्षेत्रात परिवर्तन होत आहे.
 3. शैक्षणिक विकास आणि स्त्रीसक्षमीकरण यांचा जवळचा संबंध आहे.
 4. ग्रामीण क्षेत्रात माहिती-तंत्रज्ञानात अनेक अडचणी आहेत.
 5. जागतिकीकरणामुळे शैक्षणिक विकासाला चालना मिळते.
शिक्षण आणि शिक्षणप्रणाली समाजाचा आरसा आहे. काळानुरूप शिक्षणाच्या पद्धती आणि स्वरूप बदलत चालले आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ ही ज्ञानेश्वरांची जुनीच संकल्पना आज जागतिकीकरणाच्या स्वरूपात पुढे आली आहे. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या सुविधेमुळे सर्वत्र सर्व प्रकारचे ज्ञान व शिक्षण सहजपणे उपलब्ध आहे. भारतीय उच्च शिक्षणाला आता परदेशी विद्यापीठांचे पर्याय उपलब्ध होत आहेत. 1991 च्या खुल्या आर्थिक धोरणामुळे परकीय शिक्षणाच्या संधी व चलन सहजपणे उपलब्ध होत आहे. भारतातील काही विद्यापीठांनी इतर विद्यापीठांशी करार केल्यामुळे त्यांचे शिक्षण आता भारतातही मिळू लागले आहे. तसेच भारतातील शिक्षण त्यांना घेता येऊ लागले आहे.
 
पूर्वीचे गुरू आणि शिष्य हे स्वरूप बदलून ते सार्वत्रिक व व्यापक झाले आहे. आर्थिक धोरणांचे उदारीकरण आणि उद्योेगांना मिळणारी जागतिक बाजारपेठ तसेच आय.टी. संगणक प्रणाली अशा नवीन तंत्रज्ञानाशी जोडलेल्या क्षेत्रात भारतीय तरुण-तरुणींनी घेतलेली आघाडी यामुळे सरकारी नोकरीचे सीमित क्षेत्र संपुष्टात येऊन खाजगी क्षेत्रात रोजगाराची अनेक दालने खुली झाली आहेत. म्हणूनच संगणकप्रणाली, माहिती व तंत्रज्ञानाच्या सोयी, शास्त्र आणि त्यांच्याशी निगडित तंत्रज्ञान, हे या शतकात भारताच्या दृष्टीने वरदानच ठरले आहेत. अमेरिकेतील उच्च दजार्र्च्या ज्ञानावर आधारित उद्योगात 40 टक्के भारतीय आहेत. ज्यांचे वेतन दरसाल 70 ते 90 हजार यूएस डॉलर्स आहे, तर मध्यम व कनिष्ठ दर्जाच्या ज्ञानाधिष्ठित उद्योगात 20 टक्के तंत्रज्ञ भारतीय आहेत, ज्यांचे वार्षिक वेतन 40 ते 70 हजार डॉलर्स आहे. थोडक्यात, माहिती व तंत्रज्ञानामुळे तसेच जागतिकीकरणामुळे भारतीय ज्ञानावर आधारित अर्थरचनेत अधिक संधी मिळत आहे. आता अनेक प्रगत आणि विकसित देशांनी ‘बिझनेस प्रोसेस आऊटसोसिर्र्ंग’ (बीपीओ), इंजिनीअरिंग सर्विसेस आऊटसोसिर्र्ंग (ईसीओ) आणि नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग (केपीओ) या क्षेत्रांची कामे भारतात करावयास सुरुवात केली आहेत. माहिती व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीमुळे ते सहजशक्य झाले आहे.
 
वर्तमानकाळ हा सर्वसमावेशक व शाश्वत विकासाची संकल्पना राबविणारा काळ आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाल्यासच शाश्वत विकासाचे ध्येय गाठता येईल, हे सर्वमान्य झाले आहे व ते गाठण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण निर्देशक आहे. माहिती व तंत्रज्ञान विस्तारित झालेल्या शिक्षणपद्धतीचा लाभ मुलीदेखील घेत आहेत. परदेशात शिक्षण घेणार्‍या मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पूर्वी केवळ पदवी, नर्सिंग, शिक्षिका, आहारशास्त्र, बालसंगोपन यासारखे मर्यादित क्षेत्र निवडणार्‍या मुलींचे प्रमाण कमी होत चालले असून, मुलीदेखील मुलांप्रमाणे सर्व प्रकारच्या शिक्षणात अग्रेसर होत आहेत. वैद्यकशास्त्र ते सैन्यभरती या सर्वच क्षेत्रात मुलींचे प्रमाण वाढले आहे. माहिती व तंत्रज्ञानामुळे मुलींच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंंदावल्या आहेत.
 
स्त्रीसक्षमीकरण हा आज विकासाच्या प्रक्रियेतील एक प्रमुख मुद्दा आहे. मुलींना मुलांच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणल्याशिवाय त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकणार नाहीत व खर्‍या अर्थाने सक्षमदेखील होणार नाहीत. हे काही अपवाद सोडल्यास, अनेक क्षेत्रात मान्य करण्यात आल्यामुळे मुलींनाही बरोबरीने शैक्षणिक संधी व माहिती-तंत्रज्ञानाचे लाभ मिळत आहेत. शासनाच्या स्त्रीसक्षमीकरणाच्या अनेक योजनांचा लाभ घेत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. स्त्रीशिक्षणातून स्त्रीविकास हे तत्त्व हळूहळू आकारास येत आहे. सवार्र्ंगीण पुर्नरचनेचा पाया हा वैज्ञानिकतेतच अंतर्भूत असतो, यासाठीच शिक्षणातून पुर्नरचनेतही विज्ञानाभिमुखतेवर भर देणे अपरिहार्य ठरते व हाच भर स्त्रीशक्ती पुर्नरचनेबाबतही लागू होतो. कारण स्त्रियांचे दुय्यमत्व नष्ट व्हायचे असेल, तर कृषी समाजशास्त्रज्ञ श्री. अ. दाभोळकर यांच्या ओळी लक्षात घेणे आवश्यक आहे :
 
विज्ञाने प्रयोगमती आली
प्रयोगे तंत्रनीती लाभली
तंत्रनीतीने प्रगती साधली
प्रगतीने वित्त आले
वित्ते सर्व शूद्रत्व गेले
हे सर्व विज्ञान विद्येने केले...
 
स्त्रियांनी शिकावे की शिकू नये, हा प्रश्न आता कालबाह्य झाला आहे. शिक्षणातून स्त्रियाही व्यक्तिविकास साधत आहेत. अधिक स्वावलंबनातून प्रगत होत आहेत. आधुनिक जीवनाशी सुसंवाद साधण्यासाठी स्त्रीशिक्षणातील नवीन बदल आत्मसात करीत आहेत. माहिती-तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीत तिच्या शिक्षणाचा वाटाही उल्लेखनीय आहे.
माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षण व विकासातील महत्त्व/फायदे-
 1. माहिती-तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती प्रभावी व सर्वसमावेशक आहे.
 2. माहिती-तंत्रज्ञानामुळे शिक्षणाच्या संधी सर्वत्र उपलब्ध होतात.
 3. शाश्वत विकासासाठी माहिती व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती उपयुक्त आहे.
 4. जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञानाचे फायदे सर्वत्र उपलब्ध होऊ लागले आहेत.
 5. स्त्रीसक्षमीकरणासाठी माहिती व तंत्रज्ञानाची भूमिका सकारात्मक व महत्त्वपूर्ण आहे.
माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षणव्यवस्थेत अत्याधिक महत्त्व असले तरी त्याचे काही दोषदेखील आहेत. 
माहिती तंत्रज्ञानाचे दोष-
 1. विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व मर्यादित होत चालले आहे.
 2. पुस्तकांचे महत्त्व व वाचनाचे प्रमाण कमी होत आहे.
 3. संगणकाच्या अतिवापराचा डोळे तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
 4. आर्थिकदृष्ट्या महागडे तंत्रज्ञान गरिबांना न परवडणारे आहे.
 5. विद्यार्थिवर्ग एकलकोंडा व नैराश्याने ग्रस्त होत चालला आहे.
 6. अनेक गैरकार्यांसाठीदेखील माहिती-तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
निष्कर्ष-
 1. माहिती-तंत्रज्ञानामुळे विषयांचे अध्ययन सोपे झाले आहे.
 2. जागतिकीकरण व माहिती-तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाची दालने आहेत.
 3. स्त्रीविकास व सबलीकरणासाठी माहिती-तंत्रज्ञान एक वरदान आहे.
 4. माहिती-तंत्रज्ञान हे महागडे तंत्र आहे.
 5. इंटरनेटचा अभाव, भारनियमन यामुळे ग्रामीण तसेच अशिक्षित लोकांना याचा उपयोग होत नाही.
 6. तोकडी व मार्यादित माहिती उपलब्ध असल्याने मर्यादा पडते.
 7. स्वमग्नतेची समस्या व अनेक शारीरिक व्याथी निर्माण होत आहेत.
शिफारशी-
 1. माहिती-तंत्रज्ञानाद्वारे दिले जाणारे शिक्षण सर्वत्र उपलब्ध करून देण्यात यावे.
 2. शाळा-महाविद्यालयात इंटरनेट, संगणकसेवा केवळ शोभेपुरत्या नसाव्या.
 3. जागतिकीकरणामुळे विदेशीयांचे केवळ अंधानुकरण केले जाऊ नये, तर वास्तव व देशोपयोगी शिक्षण व पद्धतींचे अनुकरण करावे.
 4. स्त्रियांना माहिती-तंत्रज्ञान व शिक्षणाचे धडे देण्यासाठी काही पथके तयार केली जावीत.
 5. शाळा व महाविद्यालयांमधून प्रोजेक्टर, संगणकाद्वारे शिकविण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जावे.
 6. रेडिओ, दूरदर्शन आणि यूट्युबवरील तसेच विविध शैक्षणिक अॅपद्वारे आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.
 7. माहिती-तंत्रज्ञानाद्वारे हसत-खेळत शिक्षणाचे तंत्र विकसित केले जावे.
 8. माहिती-तंत्रज्ञान काळाची गरज आहे, हे ओळखून शिक्षणाचे धोरण आखण्यात यावे.
 9. शिक्षणपद्धतीत सुलभता व आवड निर्माण करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर शालेय स्तरापासून केला जावा.
130 कोटींच्या घरात असलेल्या, महासत्तेेच्या वाटेवर वाटचाल करणार्‍या भारत देशात माहिती-तंत्रज्ञान व जागतिकीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणणे शक्य आहे. फक्त त्याचा उपयोग सार्वत्रिक करण्यासाठी तळागाळापर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात व माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे स्त्रीविकासाच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात, माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे स्त्रीसक्षमीकरण करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय सर्वांगीण व शाश्वत विकासाचे ध्येय गाठता येणार नाही. स्वयंरोजगाराची माहिती, कौशल्य विकासाचे धडे, विविध क्षेत्रातील प्रयोग, संशोधन व आकडेवारीविषयक अद्ययावत माहिती नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडियाचे स्वप्न साकार करता येईल व भारत औद्योगिक क्षेत्राप्रमाणे शिक्षणक्षेत्रातही वरच्या क्रमांकावरील देश म्हणविला जाईल.
 
सारांश-
 
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी देशात 1980 च्या दशकात सर्वप्रथम संगणकीय क्रांती घडवून आणली. त्यानंतर माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची वाटचाल जोमाने सुरू झाली. माहिती-तंत्रज्ञानात सर्वाधिक महत्त्वाचे जाळे इंटरनेटचे आहे. त्या माध्यमाने माहिती आणि शिक्षण या क्षेत्रांत क्रांती झालेली आहे. शाळा-महाविद्याल्यातील विद्यार्थ्यांना अल्पदरात मिनी लॅपटॉप दिले जात आहेत.
 
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाच्या दजार्र्त उल्लेखनीय आणि सकारात्मक बदल घडवून आणता येत आहेत. रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, संगणक, स्मार्ट फोन, टॅबलेट इत्यादी माध्यमातून स्त्रियांसाठीदेखील शिक्षण घेणे सोपे झाले आहे. स्त्रीविकासाच्या अनेक योजना, शिक्षणपद्धती, सवलती, अनुदान आणि कायद्यांबाबतची माहिती मोठ्या प्रमाणात माहिती व तंत्रज्ञानामुळे घरबसल्या प्राप्त होते. एकूण लोकसंख्येचा 50 टक्के भाग असणार्‍या स्त्रियांचा विकास हा मुद्दा माहिती तंत्रज्ञानाच्या व जागतिकीकरणाच्या युगात, शैक्षणिकक्षेत्रातेदखील दुर्लक्षित करून चालणार नाही. महिलांचे प्रश्न, मुलींचे शिक्षण व प्रमाण, त्यांचे सबलीकरण, निर्भयता, सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन इत्यादीची माहिती आजच्या संगणकीकरणाच्या युगात सहज उपलब्ध आहे. केवळ त्याची माहिती स्त्रियांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
 
जागतिकीकरणामुळे प्रगत देशातील स्त्रिया आणि भारतीय स्त्रिया, त्यांचे शिक्षण, समस्या, प्रश्न, संधी, यश-अपयश यांचे तुलनात्मक अध्ययन करणे सोपे झाले आहे. आम्ही प्रगतीच्या वाटेवर कुठे आहोत? याची जाणीव माहिती-तंत्रज्ञानाद्वारे काही क्षणातच करून दिली जाते. म्हणून आजच्या स्पर्धेच्या युगात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
संदर्भग्रंथ सूची-
 1. मालेगावकर शांता/परांजपे ‘शिक्षणवेध’ विद्यार्थी साहाय्यक समिती, शिवाजीनगर पुणे, 2003.
 2. मालेगावकर शंाता, ‘आजचे शिक्षण एक वास्तव’, विद्यार्थी साहाय्यक समिती, शिवाजीनगर, पुणे, डिसेंबर 2008.
 3. Sharma Shashi, ‘Education & Human Development, Kanishka Publishers, Distributors, New Delhi, 2005.
 4. Internet.