फॅशन स्पर्धेत सौंदर्य नव्हे आत्मविश्वासच हवा- मिसेस सेंट्रल इंडिया श्रद्धा जवळकर

    दिनांक :26-Jul-2019
मिसेस सेंट्रल इंडियाची तरुण भारतला सदिच्छा भेट
नागपूर,
फॅशन स्पर्धेत जाण्यासाठी खूप सुंदर दिसणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटते. सौंदर्य असायलाच हवे. पण सौंदर्य हा या स्पर्धेचा केवळ निकष आहे. सौंदर्य सर्वतोपरी नाही. ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपले व्यक्तिमत्त्व सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेले असणे सर्वाधिक महत्वाचे आहे, असे मत मिसेस सेंट्रल इंडिया विजेतेपदाचा खिताब पटकाविलेली नागपूरची श्रद्धा जवळकर हिने व्यक्त केले.
 
 
 
ती मूळ नागपूरची असून तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातच झाले. विवाहानंतर तिचे सासर औरंगाबाद येथे असून सध्या ती बंगळुरू येथे राहते. नागपूर भेटीत तिने शुक्रवारी तरुण भारत कार्यालयाला भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळी चर्चा करताना आपला प्रवासही उलगडून दाखविला. याप्रसंगी शहर संपादक चारुदत्त कहू यांनी तिचे स्वागत केले. महाविद्यालयात असताना नाटकात काम करण्याची आवड होती. काही नाटकात भूमिकाही केल्या पण तेव्हा अभ्यासालाच जास्त महत्व दिल्याने या क्षेत्रात समोर जाता आले नाही. आता पतीच्या सहकार्याने फॅशन स्पर्धेत हा खिताब मिळविता आला. यानंतर फॅशनच्या क्षेत्रात काम करण्यापेक्षाही मालिका आणि मराठी चित्रपटात भूमिका करण्याची माझी इच्छा आहे. तसे काही प्रस्तावही सध्या आहेत. त्यावर माझा विचार सुरु आहे.
 
यापूर्वी बंगळुरू येथेही एका स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती पण कन्नड भाषेच्या अज्ञानामुळे मी विजयी होऊ शकले नाही. अर्थात तो पराभव मी खूप सकारात्मक घेतला कारण यातून मला बरेच काही शिकता आले. माझा फॅशनच्या क्षेत्राशी संबंधच नाही. आवड म्हणून मी या क्षेत्रात आले. प्रारंभी सारे कठिण होते पण मी ते शिकले. फॅशन स्पर्धेसाठी स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्वास असावा लागतो. स्पधेत प्रश्नाचे उत्तर किती आत्मविश्वासाने दिले जाते, हे पाहिले जाते. त्यात मी बाजी मारली. आत्मविश्वास असण्यासाठी आपली निश्चित भूमिका असावी लागते आणि त्या भूमिकेशी प्रामाणिकही असावे लागते. कुणीही कुठल्याही क्षेत्रात करिअर करू शकते. पण इच्छा आणि आवड असेल त्या क्षेत्रात आपण काम केले पाहिजे. याशिवाय स्वतःत त्या क्षेत्रासाठी लागणारे गुण आहेत का, हे तपासले पाहिजे. डॉक्टर, अभियंता होण्यासाठी पैसा लागतोच तसाच या क्षेत्रातही थोडी गुंतवणूक लागतेच. पण या क्षेत्रात स्थिरावल्यावर भरपूर पैसाही मिळतो. लग्न झाल्यावरही मी या क्षेत्रात आहे कारण माझ्या पतीचे आणि सासूचे प्रोत्साहन. त्यामुळेच मला हे यश मिळविता आले, असे श्रद्धा म्हणाली.
फॅशनचे जग कलात्मकतेचे
साधारणतः भारतीय समाजात फॅशन शो म्हटला की केवळ मॉडेलचे शारीर सौंदर्य पाहण्याचाच भाग असतो. त्याकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याचा कल सहसा दिसत नाही त्यामुळे फॅशनबद्दल अनेकांना गैरसमज असतात. पण ही एक कला आहे. स्वतःला योग्य पद्धतीने सादर करणे, ही कलाच आहे. मुलाखतीत आणि दैनंदिन जिवनातही याचे महत्त्व आहे. पण आता कलात्मक दृष्टी आपल्या समाजात तयार होते आहे, याचे समाधान वाटते, असे ती म्हणाली.