ट्रम्पनामा...

    दिनांक :26-Jul-2019
न मम 
श्रीनिवास वैद्य  
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करायची विनंती केली होती, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिली. आता यावर भारतात गोंधळ सुरू आहे. आता कालच, रॉबर्ट मुलर यांचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत विजयासाठी रशियाची मदत घेतल्याचे सिद्ध झाले आहे. तसेही ट्रम्प हे वादळी व्यक्तिमत्त्व आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासूनच ते सतत वादात राहिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मुळात यशस्वी उद्योगपती आहेत. इतके श्रीमंत आहेत की, त्यांचे स्वत:चे विमान आतून सोन्याचे आहे! अशी व्यक्ती अचानक राजकारणात येते आणि रिपब्लिकन पक्षाची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवार बनते. निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिटंन निवडून येणार, असेच सर्वांचे भाकीत असताना, सर्वांना धक्का देत ट्रम्प निवडून येतात. सगळे कसे अतर्क्य. पण हा माणूस बिनधास्त आहे. बोलण्यात फटकळ आहे. परंतु, कामात एकदम चोख. राष्ट्राध्यक्ष बनल्यावर लगेच त्यांनी आपले धोरण ठरविले- अमेरिका फर्स्ट. म्हणजे आधी अमेरिका, नंतर जगाची काळजी. जगाला हे नवीनच होते. आतापर्यंत अमेरिका म्हणजे जगात कुठेही काही झाले, तरी जगाचा पालक म्हणून अमेरिकेने तिथे नाक खुपसलेच म्हणून समजा. ट्रम्प यांनी हळूहळू अमेरिकेला या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणातून, अमेरिकेतील बेरोजगारीची समस्या त्यांनी बरीच कमी केली. अमेरिकेची अर्थव्यवस्था वर आणली. चीन अमेरिकेच्या व्यापारी हिताच्या आड येत आहे असे लक्षात येताच, चीनशी व्यापारयुद्ध पुकारले. आतापर्यंतचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष चीनला हात लावायलाही घाबरत होते. परंतु, ट्रम्प बेधडक आहेत. आता जगातील चीनची दादागिरी आटोक्यात आलेली दिसत आहे, त्यात ट्रम्प यांचे योगदान निश्चितच भरीव आहे.

 
 
जगाच्या कल्याणाचा ठेका अमेरिकेने घेतलेला नाही. आधी त्याला आपले घर नीट करायचे आहे, ही ट्रम्प यांची ‘राष्ट्रवादी’ भूमिका मीडियाला पसंत नाही. परंतु, ट्रम्प आपल्या मार्गाने बेदरकार चालत आहेत. एकेकाळी अमेरिकेच्या मांडीवरील लाडावलेल्या पाकिस्तानला जेरीस आणण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पाकिस्तानची बहुतांशी मदतीची रसद त्यांनी थांबविली आहे. भारतासोबत मात्र त्यांनी चांगले जुळवून घेतले. याला कारण, चीनची भीती. चीनला आटोक्यात आणायला भारत उपयोगी आहे, म्हणून ते भारतासोबत आहेत. ट्रम्प यांच्याच काळात भारताचे अमेरिकेसोबतच संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. असे असताना, ट्रम्प यांनी परवा काश्मीरप्रश्नी नाक खुपसून, भारताला गोत्यात का आणले? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आतापर्यंत ट्रम्प यांना पाण्यात पाहणारा भारतीय मीडिया लगेच ट्रम्प यांचा समर्थक झाला आहे. ट्रम्प यांच्या या खेळी आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे.
पहिले म्हणजे पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रम्पच उमेदवार राहतील, असे आजतरी दिसत आहे. ट्रम्प यांना निवडणूक जिंकायची आहे आणि निवडणुकीपूर्वी त्यांना अमेरिकन जनतेला दिलेले एक आश्वासन पूर्ण करायचे आहे व ते म्हणजे अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य माघारी बोलावणे. याची त्यांना आता घाई झाली आहे.
 
17-18 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे 7-8 हजार सैनिक आहेत. अफगाणिस्तानमधील हक्कानी नेटवर्क, तालिबान आदी लष्करी संघटनांसोबत त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि या गटांना पाकिस्तानची मदत व फूस आहे. तिथल्या या गटांसोबत अमेरिका तिथे शांतिवार्ता सुरू करू इच्छित आहे. यात पाकिस्तानची मदत होऊ शकते. हा विचार करूनच, ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेटीची वेळ दिली. परंतु, हे करताना पाकिस्तान आपल्याशी हरामखोर झाला आहे, हे ते विसरले नाहीत. वॉिंशग्टन विमानतळावर इम्रान खान यांच्या स्वागताला ट्रम्प यांनी अगदी चपराशीदेखील पाठविला नाही. तसेही पाकिस्तानला आता मानापमानाचे काही राहिले नाही. भिकेचा कटोरा घेऊन जगभर फिरणार्‍या देशाने मानापमान बाजूला ठेवलाच पाहिजे. इम्रान खान यांचा एवढा अपमान करूनही ट्रम्प यांचे समाधान झाले नाही. इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रपरिषदेतही ट्रम्प यांनी पाकिस्तानला चांगलेच झापले. ‘‘आम्ही तुम्हाला अनेक वर्षांपासून एवढी मदत देत होतो, परंतु तुम्ही त्याच्या बदल्यात अमेरिकेला काहीच दिले नाही,’’ असे इम्रान खानला त्यांनी सर्वांसमक्ष सुनावून दिले. मग अमेरिकेच्या लेखी पाकिस्तानची कवडीचीही किंमत नसताना, त्यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची इम्रान खानची विनंती मान्य का केली असावी? कारण सोपे आहे. ट्रम्प यांना अफगाणिस्तानातून आपले सैन्य काढायचे आहे आणि त्यासाठी त्यांना पाकिस्तान हवा आहे. पाकिस्तानने म्हटले तरच, अफगाणिस्तानातील हक्कानी व तालिबान चर्चेसाठी टेबलवर येतील आणि म्हणूनच ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा व आयएसआय प्रमुख यांना येण्याचे फर्मान काढले होते. कारण या लष्करी प्रमुखांच्या संमतीशिवाय हक्कानी व तालिबान ऐकणार नाही, हे ट्रम्प यांना माहीत आहे. आता या मदतीच्या मोबदल्यात पाकिस्तान अमेरिकेकडून किती भीक उकळतो, ते बघायचे.
 
अमेरिकेला पाकिस्तान हाताशी असण्याला दुसरे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे, अमेरिकेने इराणशी पंगा घेतला आहे. अमेरिकेसोबत सौदी अरब व इस्रायलही आहे. हे तीनही देश इराणशी युद्ध होऊ देणार नाहीत. परंतु, इराणला घायाळ मात्र जरूर करणार. त्यासाठी त्यांना पाकिस्तान हवा आहे. पाकिस्तानची 960 किमी सीमा इराणला लागून आहे. या सीमेचा वापर करून इराणमध्ये उपद्रवी तत्त्वे घुसवायची आणि इराणला सळो की पळो करून सोडायचे, अशी ही रणनीती आहे. असे झाले, तर अमेरिका व इराण यांचे जे व्हायचे ते होईल, परंतु पाकिस्तान मात्र चांगलाच होरपळून निघणार आहे. अमेरिका-रशिया यांच्या टकरीत अफगाणिस्तानची आज काय दशा झाली आहे, हे आपण बघत आहोतच. तसे पाकिस्तानचेही होईल. आणि याबाबतीत पाकिस्तान आपल्याला साथ देईल याची अमेरिकेला खात्री आहे. कारण, इराण हा शियाबहुल देश आहे आणि पाकिस्तान सुन्नीबहुल. शिया व सुन्नी यांचे खुनी वैर जगजाहीर आहे.
 
परंतु, पाकिस्तानची यात थोडी पंचाईत आहे. पाकिस्तानचा जो भाग इराणला लागून आहे, तो बलुचिस्तान आहे. या प्रदेशात बलुच स्वातंत्र्य सैनिक पाकिस्तानी लष्कराविरुद्ध गनिमी काव्याने लढत आहेत. त्यांना बलुचिस्तान स्वतंत्र हवा आहे. त्यामुळे स्थानिक लोक अमेरिकेचे म्हणणे ऐकतीलच असे नाही. परंतु, जर अमेरिकेने बलुच लोकांना, स्वातंत्र्याचे आश्वासन दिले, तर हे स्थानिक लोक अमेरिकेला मदत करू शकतात. तसे झाले तर पाकिस्तानची आणखी एक फाळणी होणे शक्य आहे.
तर, असे हे जागतिक राजकारण आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी येणे सुरू झाले, तर निवडणुकीच्या दृष्टीने ट्रम्प यांची ही फार मोठी जमेची बाजू ठरणार आहे. त्या दृष्टीने ट्रम्प यांच्या या खेळी आहेत आणि आपणही त्याकडे तसे पाहिले पाहिजे.
9881717838