संघमित्रा एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला

    दिनांक :27-Jul-2019
वरोडा, 
मध्य रेल्वेच्या नागपूर-चंद्रपूर ग्रँड ट्रंक मार्गावरील चिकणी रोड-वरोडा रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक 824 च्याजवळ दानापूरहून केएसआर बेंगळूरुकडे जात असलेल्या संघमित्रा एक्सप्रेस (12296 ) चे कपलींग तुटले. त्यामुळे वेगाने धावणार्‍या एक्सप्रेसचे 21 डब्बे इंजिनपासून वेगळे होऊन काही अंतरावर थांबले. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना जवळपास 3 तास त्रास सहन करावा लागला. ही घटना शुक्रवारी रात्री 7.50 च्या सुमारास घडली.
 
 
 
संघमित्रा एक्स्प्रेस गुरुवारी रात्री 8.10 वाजता दानापूरहून केएसआर बेंगळूरुकडे निघाली. दानापूरहून गाडी सुटली तेव्हा गाडीला 24 कोच जोडले होते व पूर्ण गाडी प्रवाशांनी भरली होती. शुक्रवारी रात्री सेवाग्राम स्टेशनहून सायंकाळी 7.2 वाजताच्या सुमारास गाडी सुटल्यानंतर 9.5 वाजता तिचा चंद्रपूरला थांबा होता. परंतु, हिंगणघाट, नागरी व चिकणी रोड स्टेशन पार केल्यानंतर वरोड्यापासून जवळपास 6 किलोमीटर दूर असतानाच पोल क्रमांक 824 च्याजवळ रात्री 7.50 ते 8.5 वाजताच्या सुमारास इंजीनपासून तिसरा असलेल्या स्लीपर कोच एस- 1 (क्रमांक 191707) या डब्ब्याची कपलींग अचानक तुटली. त्यावेळी गाडीचा वेग जवळपास ताशी 100 ते 120 प्रति किलोमीटर असल्याचे सांगण्यात येते. तुटलेला कपलींग बोगी क्रमांक एस- 2 डब्ब्यासह इतर डब्ब्ययांना जोडणारा होता. कपलींग तुटल्याने चालक आणि गार्डचे कोच वेगवेगळे झाले. इंजिनसोबत एस- 1, जनरल कोच क्रमांक 182118 व सामान ब्रेक आणि जेनरेटर कार बोगी क्रमांक 24852/ सी हे कोच राहिले व अन्य 21 कोच इंजिनपासून वेगळे झाले. त्यामुळे इंजिनपासून त्यांचा संपर्क तुटला व संघामित्रा एक्स्प्रेसचे इंजिन थोड्या दूर अंतरावर येऊन अचानक थांबले. प्रथमदर्शनी ‘चैन पुलिंग’मुळे गाडी थांबली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर मात्र इंजिन चालक व गार्डच्या लक्षात सर्व प्रकार आला. चालक आणि गार्ड यांनी वॉकीटाकीवर आपसात बोलणी केल्यानंतर गाडीचे कपलींग तुटल्याची सूचना तात्काळ वरोडा स्टेशन मास्तर बी. आर. पाल यांना देण्यात आली.
 
अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्व रेल्वे विभाग तात्काळ सक्रीय झाला व त्यांची एक चमू घटनास्थळी रवाना झाली. तत्पूर्वी यादरम्यान अचानक कोच वेगळा झाल्याने कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांना सौम्य झटके बसले. परंतु, त्यांना इजा न झाल्याने कोणालाही वैद्यकीय उपचाराची गरज पडली नाही. प्रथमतः इंजिनद्वारा गाडीचे ते तीन डब्बे गाडीची गती 7 ते 8 किलोमीटर प्रती तास वेगाने सामान्य करण्यात करून वरोडा येथे आणून 4 नंबर प्लॅटफॉर्मवर लावण्यात आले. त्यानंतर पुन्हा इंजिनचे उर्वरित 21 डब्बे घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान वरोडा रेल्वे स्थानकावर कपलींग दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र कपलींग पूर्णतः तुटल्याने ते बसणे शक्य नव्हते. वेळेवर नवीन कपलींग लावणे ही शक्य नव्हते. त्यावेळी अन्य कोणताही पर्याय नसल्याने कपलींग तुटलेला डब्बा शेवटी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळानंतर इंजिनने 21 बोगी परत आणल्यानंतर ती प्लॅटफॉर्म क्रमांक 4 च्या बाकी 3 डब्ब्यांना जोडण्यात आली. या सर्व प्रकारात प्रवाशांना तीन तास ताटकळत बसावे लागले. अखेर तीन तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कपलींग जोडून रात्री 11.16 वाजता गाडी वरोरा स्थानकाहून पुढील प्रवासासाठी रवाना झाली.