प्रार्थनेतील शक्ती

    दिनांक :27-Jul-2019
प्रार्थनेत शक्ती असते असं म्हणतात. समूह प्रार्थनेने अशक्य गोष्टीही साध्य करता येतात. भक्ताची प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचते. प्रार्थना म्हणजे भगवंताला केलेलं आवाहन. या आवाहनामुळे परमेश्वराने स्वत:कडच्या सकारात्मक शक्तीने भक्ताच्या कार्यात किंवा इच्छित साध्य करण्यात अडथळे दूर करावे, नकारात्मक ऊर्जेचा नायनाट व्हावा, अशी अपेक्षा असते. प्रार्थनेतलं शास्त्र जाणून घेतलं तर त्यावरचा आपला विश्वास अधिक दृढ होईल. 

 
 
प्रत्येक कृतीला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया असतात. त्यामुळे आपली प्रार्थन परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि परमेश्वर ती ऐकतो. आपल्या प्रार्थनेला उत्तरही मिळतं. देवाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो. त्यामुळे प्रार्थनेवर विश्वास ठेवा. आपली प्रार्थना देवाच्या दरबारी पोहोचते.
 
  • प्रार्थनेमुळे भक्तांचा उत्साह वाढतो. त्याच्यात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. प्रार्थना केल्यानंतर तुमची काळजी, चिंता दूर होते. प्रार्थनेच्या मूळ उद्देशामुळे कळत-नकळत केलेल्या चुकांचा भार कमी होतो. प्रार्थनेतल्या सकारात्मक ऊर्जेमुळे पापांचा भार उतरतो आणि आपल्याला शांत वाटतं.
  • आपल्या एखाद्या प्रार्थनेला लवकर उत्तर मिळत नाही. प्रार्थना फलद्रूप होत नाही. असं असलं तरी प्रार्थनेचा सकारात्मक परिणाम होत असतो.
  • प्रार्थना करूनही यश मिळत नसेल किंवा फलप्राप्ती होत नसेल तर प्रार्थनांचा वेग वाढवायला हवा. प्रार्थना फलद्रूप होत नाही याचा अर्थ यातून निर्माण होणार्‍या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या आसपास असणार्‍या नकारात्मक ऊर्जेपेक्षा आणि तुमच्या कर्मांपेक्षा कमी आहे. त्यामुळे इप्सित साध्य होण्यासाठी प्रार्थनेचा वेग वाढवा आणि जास्त काळ प्रार्थना करा.
  • परीक्षा किंवा एखाद्या कार्यातल्या यशासाठी तुम्ही प्रार्थना करता. पण तुम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरता. तुमची प्रार्थना वाया गेली असा याचा अर्थ होत नाही. अध्यात्मिक प्रक्रियेतली कोणतीही कृती कधीच वाया जात नाही. आपल्या बँक खात्यात पैसे जोडले जातात त्याचप्रमाणे या प्रार्थनाही आपल्या पाप-पुण्याच्या खात्यात जोडल्या जातात. या प्रार्थनांचे लाभ या किंवा पुढच्या जन्मात मिळतात.
  • जास्त प्रमाणातली प्रार्थनाही तुमच्या खात्यात साठून राहते. ही प्रार्थना भविष्यात उपयोगी पडते.