अपमान झाल्यास...

    दिनांक :27-Jul-2019
अपमान झाल्यानंतर कोणालाही प्रचंड चीड येते. अपमान करणार्‍या व्यक्तीवर सूड उगवण्याचा किंवा अपमानाचा वचपा काढण्याचा विचार मनात डोकावतो. अपमानित झाल्याने दु:ख होणंं स्वाभाविक असलं तरी आततायीपणे निर्णय घेऊ नये. एका गुरुवर्याच्या या कथेतून आपण धडा घेऊ शकतो. सायंकाळच्या वेळी हे गुरु आश्रमात आपल्या स्थानी शांत बसले होते. अस्ताला जाणार्‍या सूर्याकडे ते एकटक बघत होते. त्याचवेळी एक शिष्य आला आणि म्हणू लागला, रामजी नावाच्या जमीनदाराने माझा अपमान केला आहे. तुम्ही माझ्यासोबत चला आणि त्याला त्याची जागा दाखवून द्या. त्यावेळी गुरु म्हणाले, वत्सा तू सच्चा आहेस. कोणीही अशा व्यक्तीचा अपमान करू शकत नाही. झाली घटना विसरण्याचा प्रयत्न कर. यामुळे अपमानही विस्मरणात जाईल.
 
 
 
पण तो शिष्य काहीही ऐकायला तयार नव्हता. त्याने तुमच्याबद्दलही अपशब्द काढले आहेत, असं तो म्हणाला. तुम्हाला यावंच लागेल, तुम्हाला बघितल्यावर त्याला लाज वाटेल, तो तुमची क्षमा मागेल आणि यामुळे माझं मन शांत होईल... असं शिष्य म्हणाला. शिष्याची सूडबुद्धी अत्यंत तीव्र झाल्याचं गुरुंच्या लक्षात आलं. त्याच्यावर सदुपदेशाचा काही परिणाम होणार नसल्याचंही त्यांना जाणवलं. मग ते म्हणाले, आपण रामजीकडे जाऊ. मी त्याला समजावेन. आता संध्याकाळ झाली आहे. आपण सकाळी बाहेर पडू.
 
सकाळ झाल्यानंतर सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू झालं. शिष्यानेही गुरुजींना अपमान करणार्‍या व्यक्तीकडे जाण्याचा आग्रह केला नाही. तो दिवस संपला. शिष्याकडून कोणताही प्रतिसाद नव्हता. मग दुसर्‍या दिवसाची दुपार उजाडली. शिष्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने गुरुजींनीच त्याला रामजीकडे जाण्याबाबत विचारलं. पण शिष्याला उपरती झाली होती. तो म्हणाला की, गुरूवर, आता त्याच्याकडे जाण्याची गरज नाही. मी झाल्या घटनेचा बराच विचार केला. पण यात रामजीची नाही तर माझी चूक होती. मला चुकीचा पश्चाताप होत आहे. यावर गुरुजी हसले आणि म्हणाले, असं असेल तर रामजीकडे जायलाच हवं. तू आपल्या चुकीची क्षमा मागितली पाहिजे. समोरच्या व्यक्तीची चूक माफ करून आपल्या चुकीची माफी मागायला हवी, असा धडा या कथेतून घेता येईल.