ढिंग एक्सप्रेस!

    दिनांक :27-Jul-2019
चौफेर  
 सुनील कुहीकर 
 
सुमारे दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. आसामच्या राजधानीत आंतरजिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ॲथ्लेटिक्सच्या सहभागातून वेगवेगळ्या स्पर्धा एकामागून एक याप्रमाणे पार पडत होत्या. यातील शंभर व दोनशे मीटर दौड स्पर्धेत ‘ती’पण सहभागी झाली होती. वर्णाने सावळी, शरीरयष्टी हाडकुळी. घरच्या अठराविश्वे दारीद्र्याची साक्ष तिच्या अंगावरचे कपडेच देत होते. पायातले बूट तर क्रीडाजगताच्या प्रचलित ऐटीला न शोभणारे. स्वस्त. म्हणून परवडणारे. म्हणून विकत घेतलेले. लौकिकार्थाने चारचौघांचे लक्ष जावे असे काही नव्हतेच तिच्यात. साहजिकच सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेले ते व्यक्तिमत्त्व होते. पण... स्पर्धा सुरू झाली. धावण्याचा इशारा देणारे बिगुल वाजले. एकमेकांना मागे टाकण्याच्या ईर्ष्येने पेटून उठलेले खेळाडू जिवाच्या आकांताने पळत सुटलेत. मोजून अवघ्या काही सेकंदांची स्पर्धा ती, पण निकाल लागला आणि क्षणभरापूर्वी कुणाच्याच दृष्टीने लक्ष देण्याजोगं नसलेलं ‘ते’ व्यक्तिमत्त्व आता मात्र सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र ठरले! कारण या दोन्ही स्पर्धा आसामच्या त्या लेकीनं जिंकल्या होत्या. नुसत्या जिंकल्या नाही, तर नवनवीन विक्रम प्रस्थापित केले तिनं. खरंतर त्या स्पर्धेनंतरच्याही काळात जयपराजयाच्या गर्तेत गटांगळ्या खात तिचा प्रवास सुरू राहिला होता. परिस्थितीवर मात करण्याची
तीच जिद्द. पुन:पुन्हा उठून उभे राहण्यासाठीची तीच धडपड. आकाशाच्या दिशेने झेप घेण्याची तीच ईर्ष्या...
हिमा दास! गेला महिनाभर भारतीय जनतेच्या तोंडी असलेले एक नाव. माणसं यशाच्या शिखरावर पोहोचली, तरच त्याची दखल घेण्याची सवय जडलेल्या भारतीय समूहाने चालवलेल्या हिमाच्या कोडकौतुकाचे आश्चर्य नाहीच इथे कुणाला. सुवर्णपदकांची एकामागून एक अशी आरास मांडत निघालेल्या हिमाच्या यशापेक्षाही, कुठल्याशा आमदाराच्या पोरीने घरून पळून जाण्याची ‘ब्रेिंकग न्यूज’ करण्यात अक्कल पाजळणार्‍या माध्यमजगतातील हुशार मंडळींच्या बुद्धीची कीव करण्यापलीकडे उरते तरी काय सामान्य बापुड्यांच्या हातात? पण, हिमाने यशाची विविधांगी क्षेत्रे पादांक्रांत केली अन्‌ सारेच चित्र बदलले. माध्यमांना त्यांच्या बातम्यांची दिशा बदलावी लागली. जागोजागी तिच्या यशाची चर्चा घडू लागली. दरम्यान, हाती पडलेल्या बक्षिसापैकी अर्धी रक्कम आपल्या राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याच्या तिच्या घोषणेने तर जणू जादू, जादू कसली, क्रांतीच केली! सारा देश तिला डोक्यावर घेऊन नाचू लागला. चाहत्यांनी बहाल केलेल्या लोकप्रियतेच्या भरवशावर कोट्यवधी रुपयांचे घबाड कमावणार्‍यांना सुचू नये ते या 19 वर्षांच्या नवख्या खेळाडूला सुचणे कौतुकास्पदच होते.
 

 
 
पदकांची आरास मांडण्याचा इतिहास तिच्या कर्तबगारीतून घडत गेला, तसतसा तिच्या संघर्षाचा आलेखही जगापुढे येऊ लागला. तरुणाईला तिच्या कर्तृत्वाची भुरळ पडली. एव्हाना लोक नेटवर हिमा दास हे नाव ‘सर्च’ करून तिच्याबद्दल उत्सुकतेने जाणून घेऊ लागले. गरिबीसोबतच विपरीत परिस्थितीशी तिने दिलेली कडवी झुंज जगजाहीर होऊ लागली.
आसामातील नागाव जिल्ह्यातलं ढिंग नावाचं एक छोटंसं गाव. हिमा तिथलीच. रणजीत आणि जोनाली दास यांच्या संसारवेलीवर बहरलेलं शेंडेफळ. तिच्यासह पाच भावंडांच्या संसाराचा गाडा हाकण्याची आई-वडिलांची कसरत आणि ती करताना होणारी त्यांची दमछाक सार्‍या गावाच्या परिचयाची. पदरची ‘दो बिघा’ जमीन जोतून पिकवलेल्या धानातून कुटुंबाचं कसंबसं चाललं असताना हिमाच्या मनात फुलणारी स्वप्नं, खेळाकडे असलेली तिची ओढ कुणाच्या खिजगणतीत असणार होती? सुरुवातीला फुटबॉलचे आकर्षण वाटायचे. पण, मग धावण्याच्या क्षेत्राकडे तिचा कल वाढत गेला. समस्यांचे काय, त्या तर मार्गात सर्वदूर विखुरल्या होत्या. पण, भांडवल करण्यापेक्षा त्या समस्या पायाखाली तुडवत तिचा प्रवास अविरत सुरू राहिला. कधी फुटबॉलच्या मैदानावरील सुकलेल्या मातीवरून, तर कधी शेतातला चिखल तुडवत, धावण्याची जिद्द मार्गक्रमण करीत राहिली. सुरुवातीला तर अनवाणीच धावायची पोर. मग बुटं घालून धावण्याचा सराव सुरू झाला. इथं खायलाच पुरेसे नसताना पायातल्या बुटांसाठी जास्तीचे पैसे असणार कुठून? त्यामुळे, अंगातले कपडे, पायातले बुट यापेक्षा धावण्याकडे अधिक लक्ष दिले जाऊ लागले. त्याचा परिणाम हा होता की, आंतरजिल्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती गोहाटीत दाखल झाली होती. तिथले तिचे बेभान धावणे, स्पर्धेत अजून कोणकोण दिग्गज उतरलेत याची जराशीही चिंता न बाळगता स्वत:च्या यशासाठी झेपावण्याची तिची जगावेगळी तर्‍हा, ती तळमळ, सामाजिक व्याप खूप मोठा राखण्याची इच्छा असली, तरी खेळाच्या मैदानावर मात्र आपला ट्रॅक अन्‌ आपण, एवढा मर्यादित विचार करायलाही ती शिकली. ही पोरगी भविष्यात नाव काढेल, हा विश्वास प्रशिक्षक निपुण दास यांच्या मनाला शिवला. गोहाटीच्या शिबिरात राहून तिने धावण्याचा शास्त्रीय पद्धतीने सराव करावा यासाठीचा त्यांचा अट्‌टहास होता. पण, तिथला खर्च पेलवणार कसा? परिस्थिती तर जणू निष्ठुरतेने क्षणाक्षणाला परीक्षा बघत होती. बरं, याही स्थितीत, संघर्षाचा इरादा इतका बुलंद की, यश हमखास गाठीशी बांधले जायचे. इथेही मार्ग निघालाच. हिमाच्या आर्थिक जबाबदारीचे ओझे निपुण दास यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतले अन्‌ प्रशिक्षणाचा तिचा मार्ग मोकळा केला. निपुण सरांनी दाराशी आणून ठेवलेल्या संधीचे सोने करणे, एवढेच तिच्या हाती होते आणि तिने ते केलेही. धावण्याचा सराव, वेग वाढू लागला. मग सरांनी मर्यादा वाढवली. दोनशे मीटरऐवजी चारशे मीटरच्या स्पर्धेसाठी तिच्याकडून तयारी करवून घेण्याचा प्रयोग एव्हाना सार्थ ठरू लागला. कधीकाळी शेतात धावणारी पोरगी आता आंतराष्ट्रीय स्पर्धेत खर्‍याखुर्‍या मैदानावर धावू लागली. सुरुवातीला अपयशाचा ससेमिरा काही सुटला नाही. तिही समर्थपणे त्याला तोंड देत राहिली- न डगमगता. यश पायाशी खेचून आणण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेच लढण्याचे बळ दिले. त्याच्याच भरवशावर हिमा यशाचा पाठलाग करीत राहिली. इतका, की शेवटी नियतीलाही यशाचे दान तिच्या पदरात टाकावेच लागले!
 
बँकॉंकमधील युथ चॅम्पियनशिप ट्रॉफी असो, की ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेम्स असोत, तिथे वाट्याला आलेल्या अपयशाचा लवलेशही हिमाच्या नंतरच्या सरावादरम्यान दिसत नव्हता कुठेच. त्याचाच परिणाम असावा बहुधा, पण आता तिचे धावणे जणू पदकांसाठीच असल्याचा अलिखित नियम झाला. गेल्या एकवीस दिवसांत अॅथ्लेटिक्स स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण भारतासाठी मिळवून देण्याची किमया हिमा दास हिने केली आहे. लोकांच्या तोंडी आपले नाव यायला इतिहास निर्माण करावा लागतो. हिमाने तो केला आहे. चॅम्पियन्स वेगळेच असतात. त्यांची जिद्द, पेहराव, विचार, वर्तन... सारेच वेगळे असते. ती चॅम्पियन आहे, हे तिने या सर्वच बाबतीत सिद्ध केले आहे. खेळाच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही.
आपला समाज मात्र कोत्या मनाचाच निघाला. एकतर क्रिकेटच्या पलीकडेही खेळ अन्‌ खेळाडू आहेत, हे मान्य करायला त्याला खूप वेळ लागतो आणि दुसरी बाब अशी की, झगमगाटाच्या पलीकडे त्याला बघताच येत नाही. यशापयशाचे एकसारखे मापदंड तो सगळीकडे वापरतो. या पोरीला धड इंग्रजी बोलता, लिहिता येत नाही, यावरूनही तिची टर उडवली गेली. धावण्याच्या स्पर्धेतील यशामुळे ‘ढिंग एक्सप्रेस’ ठरली तरी तिचं शिक्षण कमी असण्याचा मुद्दा लोकांनी चर्चिला. जर कपिल देव, सचिन तेंडुलकरच्या यशाआड त्यांचे शिक्षण येत नाही, तर हिमाच्या यशाच्या आड तरी ते का यावे, या प्रश्नाचे उत्तर काहीकेल्या गवसत नाही. क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांचे महत्त्व कमी जोखण्याच्या भारतीय जनतेच्या सवयीचा तो परिणाम मानावा? एका गुणी खेळाडूचा कालपर्यंतचा संघर्ष मातीमोल ठरवण्यासाठी आणि एकामागून एक अशी पदकं खेचून आणेपर्यंत तिच्या यशाची दखलही न घेतली जाण्यासाठी माध्यमांना जवाबदार ठरवायचे, की समाजभान हरवून बसलेल्या रसिक चाहत्यांना?
9881717833