भिजायचं की थिजायचं? तुम्हीच ठरवा!

    दिनांक :28-Jul-2019
आता वर पाऊस आलाच नव्हता. आता आला आहे. आला आहे, असं म्हणतोय्‌ कारण तो नागपुरात येतो आहे गेले दोन दिवस. किमान त्याचा हँगओव्हर तरी असतोच. जिकडे पाऊस येतो ना त्यांना वाटत असतं की सार्‍या दुनियेत लोक भिजताहेत. आजकाल मात्र तुमच्या घराच्या समोरच्या भागात पाऊस पडत असतो आणि मागे असेल अंगण तर ते कोरडं असतं... तरीही आता पाऊस विदर्भात पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यावर कसं धो धो बोलता येतं. उन्हाळ्यावर किंवा हिवाळ्यावर तसं काही बोलता येत नाही. कारण उन्हाळ्यात सगळी कोरड असते अन्‌ हिवाळ्यात गोठलं असतं सगळं... जमला ना? एकदम झक्कास पीजे आहे की नाही? आपणही असे पंच मारत असतो. टिव्हीवरच्या कॉमेडी शोपेक्षाही फालतू पीजे आपण मारू शकतो, असा सॉलिड कॉन्फीडन्स आपल्याला आहेच...
 
 
तर पावसाळ्यावर बोलत होतो. पावसाळ्यात असे खूप प्रकार होतात. शेजारच्याच्या घराच्या सार्‍याच भिंतीमध्ये ओल आली होती. त्या दिवशी पाऊस कसा धो धो कोसळत होता. त्यामुळे त्याच्या घराच्या भिंतींनाही झरे फुटले होते. त्यामुळे तो अर्थातच माझ्याकडे आला. आल्या आल्या म्हणाला, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा... ओलं झालं घर तरी मोडला नाही कणा...
असं म्हणत मग तो कणा, फणा, म्हणा, ताणा, बाणा, रहाना, खाना, पिना... असं ‘न’ ला ‘ण’ जोडत काहीबाही म्हणत राहिला. लक्षांत आलं की याला पावसाळा लागला आहे. पाऊसही लागत असतो. जसं ऊन लागतं तसा पाऊसही लागत असतो... हा आपणच लावलेला शोध आहे. पाऊस लागला की माणूस कविता वगैरे करू लागतो. काही जणांच्या घरात पाऊस असा पाहुणा म्हणून आलेला असतो. या वर्षी तर राज्यात नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण या शहरांमध्ये इतका पाऊस पडला की काही लोकांनी घरातच पाणी साठवले अन्‌ त्यात मासळ्यांचे बीज सोडून मासळ्यांचा व्यवसायच सुरू केला. जूनच्या सुरुवातीलाच शहरात घरोघरी तळी ही योजना पावसानंच दिली अन्‌ तीही फुकटात.
 
या दिवसांत म्हणजे आषाढात पाऊसच पाऊस आलेला असतो. आमच्या शेजारच्या सारखीच अनेकांच्या घराच्या भिंतींना ओल आलेली असते. मध्यमवर्गियांची यात गोची होत असते. काय आहे की श्रीमंतांचा प्रश्न नसतो अन्‌ गरिबांचा प्रश्न असतो, हे कुणालाच मान्य नसते. श्रीमंताने जे काय केले ते फॅशन असते. त्यामुळे अंबानीने त्याचा बंगला ताडपत्रीने झाकला तर त्याचं कौतुक होतं. मग अशी ताडपत्री झाकली नाही असे बंगले झोपडी वाटू लागतात. समस्या केवळ मध्यमवर्गियांची असते. त्यामुळे त्यांच्या घरात अशी पावसाळ्यानं एंट्री घेतली की त्यांची अडचण होते. त्यांना झोपडीतल्या अडचणी सहन होत नाही अन्‌ बंगल्यातल्या सोयी झेपत नाही म्हणून खुपतात. त्यामुळे पावसाळ्यात ओल आल्याने सर्दावलेल्या भिंतींचे पोपडे पडतात अन्‌ या दिवाळीत काहीही झालं तरीही आपण घराला नवा रंग देऊ, असा ठराव घरचा कर्ता पुरुष कुटुंबीयांसमोर जाहीर करत असतो...
 
आता मध्यमवर्गियांच्या घरचा कर्ता पुरुष हा करविता नसतो. त्यामुळे त्याची अवस्था, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे...’अशीच असते. त्यांच्या घराच्या भिंती पावसाळ्यात शेवाळतात. त्याचे पोपडे पडतात अन्‌ त्यांच्या घराला नेमका रंग कुठला होता, त्याचा शोध लावण्याचे काम सीबीआयलाच द्यायला हवे, अशी अवस्था असते. त्यात मग, यंदा काहीही झाले तरी दिवाळीत घर रंगवायचे, असे ठरविले जाते. गणपतीच्या किंवा महालक्ष्म्यांच्या दिवसात जिथे त्यांची स्थापना होते तेवढा कोपरा डिस्टेंपरने रंगविला जात असतो. तिथेही कुणी भिंतीला टेकून बसला की तो रंगून जातो.
पावसाळा सरत असताना थोडी कोरड पडते. भिंती आपल्या वाळतात अन्‌ मग एक नवाच रंग भिंतींना चढलेला दिसतो. बरं ओघळांचे एक नवेच डिझाईन भिंतींना आलेले असते. शेजारच्याच्या घरच्या भिंती पाहून त्याच्या बॉसची बायको तिच्या नवर्‍याला म्हणजे बंड्याच्या बॉसला म्हणाली होती, ‘‘बडी, अपने घरमे ऐसा डिझाईन नही बना सकते क्या हम?’’
सामान्य घरात पावसाळ्यात आणखी एक गोष्ट हमखास होते. त्यांचे ठेवणीतले कपडे, पांघरुणं सर्दावतात. आलमारीत ठेवलेल्या कपड्यांवर अन्‌ पांघरुणांवर असे जिंलबदू कसे येतात, हा संशोधनाचा विषय आहे. घरात एक प्रकारचा ओला वास पसरला असतो. कुब्बट असा; पण त्या वासालाही एकप्रकारचे घरपण असते. ठेवणीतले कपडे सहसा घरातल्या एकमेव ब्रँडेड सुटकेसमध्ये ठेवलेले असतात. अर्थात ही सुटकेस अन्‌ त्यातले कपडेही लग्नातलेच असतात. म्हणजे लग्नाचा सुट, शालू अन्‌ साड्या. मग कधीतरी कुठल्यातरी कार्यप्रसंगाच्या निमित्ताने आलेले कपडे असतात. एखादी गोदरेजची आलमारी असते अन्‌ जुन्या घरात लाकडाच्या नाहीतर भिंतीतच असलेल्या आलमार्‍या असतात. त्यात डांबराच्या गोळ्या टाकून हे कपडे ठेवलेले असतात. हिवाळ्यात वापरायची पांघरूणही सर्दावतात पावसाळ्यात अन्‌ ती वाळत टाकून कोरडी करण्याचीही संधी नसते.
त्यातच मग कागदपत्रांची पेटी नामक एक प्रकारही असतो. ती खूप जुनी असते. जुन्या काळी ट्रंका असायच्या. त्या आता खालून जंगल्या असतात अन्‌ त्यात आई-वडिलांचे ओळखू न येणारे रंग उडालेले फोटो अन्‌ कागदपत्र असतात. पावसाळ्यात त्यांची रया गेलेली असते. ती अडगळीतली समृद्धी असते भिंवा समृद्ध हळवी अडगळ असते. फेकवत नाही अन्‌ वागवतही नाही...
पावसाळा थोडा रुळला अन्‌ उघाड पडली, थोडी थोडी उन्हंही दिसू लागली की एक आयटम होतो, डास वाढतात.
 
कुंद वातावरणामुळे अन्‌ कुबट माहोलमुळे ढेकणंही वाढतात अन्‌ घरातल्या माणसांचे रक्त ते पाण्यासारखे पितात. त्यांना कुठल्याही गटाचं रक्त चालतं. डासांचा अन्‌ ढेकणांचा रक्तगट कुठला, हा प्रश्न खूप लहानपणी पडला होता. एरवी रक्तदान न करणारेही या दोन जिवांना मात्र रक्त देतात. मग पावसाळ्यात डासनिधी वाढतो. डास मारण्यासाठी खूपसारे प्रयोग आपण करतो. मच्छरछाप अगरबत्ती असते, आजकाल ते लिक्विड आले आहे. मलम असतो अंगाला फासण्याचा, फवारे असतात, त्या चिपा असतात... कशानेच डास वगैरे मरत नाहीत अन्‌ पळूनही जात नाहीत. केवळ समाधान असते आपण डासांची काळजी घेत असल्याचे. आता त्या इलेक्ट्रिकच्या बॅट आल्या आहेत. त्यानेही डासांना मारल्याचा आनंद मिळत असतो. ही बॅट खराब होण्यासाठीच असते. साधारण महिनाभरच ती टिकते अन्‌ मग त्याचा वापर मच्छरच मच्छरदाणी सारखा करतात. मच्छरदाण्याही या काळात दिवाणातून काढल्या जातात अन्‌ त्यांनाही ओला- ओला वास असतो. त्यावर थोडा बुरसाही आलेला असतो. त्यामुळे त्यांचा स्पर्श त्वचेला झाला की खाज सुटते. ही फारच खाज-गी बाब आहे; पण ती सुटत असतेच. तर पावसाळा हा असा असतो अन्‌ तसाही असतो. तो असाही सहन करायचा असतो अन्‌ तसाही एन्जॉय करायचा असतो. सहन करायचा की एन्जॉय तुम्हीच ठरवा... भिजायचं कसं शिंका देत की चिंब होत ते तुम्हीच ठरवा...
कारण आला नाही पाऊस तेव्हा आमच्या तोंडचं पाणी पळालं होतं. आता तो अजूनही पुरेसा आलेला नाही. तेव्हा एकदमच पावसाळी कविसंमेलनं घेण्याचाही उत्साह दाखवू नका; पण मुर्दाडांसारखी पावसाकडे पाठही करू नका!