देण्यासारखे काहीतरी...

    दिनांक :28-Jul-2019
आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा भाजपामध्ये काही मतभेद किंवा बेबनाव झालेला होता आणि त्याची माध्यमातून खूप चर्चा रंगलेली होती. भाजपाचे दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे पक्ष सोडणार असल्याची ती चर्चा होती. अर्थातच, त्याविषयी खुद्द मुंडे यांनी काहीही जाहीर वक्तव्य केलेले नव्हते. पण, त्याचा स्वाद घ्यायलाही राजकीय जाणत्यांनी गर्दी केलेली होती. त्या गर्दीतले एक जाणकार होते- शरद पवार. त्यांनी तेव्हा एका समारंभात बोलताना एक सूचक विधान मोजूनमापून केलेले होते- ‘‘आपल्याकडे सध्या मुंडे यांना देण्यासारखे काहीच नाही.’’ तेव्हा तात्पुरती त्या विधानावर चर्चा होऊन विषय बाजूला पडला. पण, त्यातून खरेतर राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या एकूण राजकारणाचे चरित्र साफ होते.
 
आजवर पवारांनी राजकारण करताना सतत अन्य पक्षातील माणसे फोडून आपला कार्यभाग साधलेला आहे आणि जेव्हा अन्य कुठल्या पक्षात मतभेद वा बेबनाव निर्माण होतात, तेव्हा पवारांनी सातत्याने तिथे गळ टाकण्यातून आपले राजकारण पुढे रेटलेले आहे. त्यामुळेच आज त्यांच्याच पक्षातले कुणी दिग्गज वा इच्छुक अन्य पक्षात आश्रयाला जात असतील, तर त्यावरून गहजब करण्याचे काही कारण नाही. निदान त्यांचे पुतणे अजितदादांनी तरी आदळआपट करायची गरज नाही. कालपरवा राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन अहीर शिवसेनेत दाखल झाले आणि मधुकर पिचड यांच्या सुपुत्राने मुख्यमंत्र्यांची भेटगाठ घेतल्याने अजितदादा खवळले आहेत. त्यांनी पक्ष सोडून जाणार्‍यांवर आगपाखड केलेली आहे, तर त्यांच्या प्रवक्त्यांनी शापवाणीही उच्चारलेली आहे. पण, असे करण्यापूर्वी त्यांनी आपल्या पक्षाध्यक्षांचा राजकीय मंत्र अभ्यासला असता, तर प्रक्षोभ जरा कमी ठेवता आला असता. 
 
 
राजकारणातल्या पक्षांतराला कितीही तात्त्विक मुलामे चढवले किंवा मुखवटे लावले; म्हणून त्यातले सत्य कधीच लपून राहात नाही. त्यामुळे आज सचिन अहीर वा अन्य कुणी राष्ट्रवादीचे नेते शिवसेना किंवा भाजपात जात असतील, तर त्यांनी पवारसाहेबांच्या गुरुमंत्राचाच पाठपुरावा केला, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या कारणास्तव तेव्हा छगन भुजबळ डझनभर आमदार घेऊन शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले, त्यामागे तोच गुरुमंत्र होता. भुजबळांना पितृतुल्य बाळासाहेबांपेक्षा शरद पवार पित्यासमान वगैरे वाटलेले नव्हते, तर पवार मंत्रिपदाची खुर्ची देणार म्हणून भुजबळांनी शिवसेनेला तलाक दिलेला होता. नंतर असे अनेक शिवसैनिक किंवा कार्यकर्ते अन्य पक्षातून पवारांच्या आश्रयाला गेले, तेव्हाही तत्त्वज्ञान किंवा विचारधारेचा विषय नव्हता. पवारांपाशी काहीतरी देण्यासारखे होते.
 
आज देण्यासारखे काहीही राहिले नसेल, तर राष्ट्रवादीत कोण कशाला थांबणार ना? एकामागून एक नेते-कार्यकर्ते अन्य पक्षात किंवा सत्ताधारी पक्षात दाखल व्हायला रांग लावून उभे असतील, तर दोष त्यांचा नाही. दोष गुरुमंत्राचा आहे. म्हणून सचिन अहीर नेमक्या शब्दांत सांगतात, पवारसाहेब हृदयात आहेत! म्हणजे त्यांनी पवारांचा आदेशच पाळलेला आहे. जिथे काही मिळणार आहे, तिथे जाऊन आपले कल्याण करून घ्यावे. ज्याच्यापाशी काही देण्यासारखे असेल, तिथे जाण्यातूनच आपले राजकीय भवितव्य उज्ज्वल करायचे असते. मग त्याचेच पालन अहीर यांनी केलेले नाही काय? वैभव पिचड असोत किंवा जयदत्त क्षीरसागर असोत, त्यांनी अशी कुठली चूक केली आहे? पवारांपाशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्यासारखे काहीही उरलेले नाही, हेच त्यातले एकमेव सत्य आहे. भाजपा किंवा शिवसेनेपाशी देण्यासारखे काही असेल, तर घ्यायला पुढे पाऊल टाकणे, ही पवारसाहेबांचीच शिकवण नाही काय?
 
 विंदा करंदीकरांच्या कवितेच्या छान ओळी आहेत-
‘देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे...’
 
राजकारण त्यापेक्षा वेगळे नाही. नेहमीच फक्त घेऊन चालत नाही. हळूहळू आपली क्षमता वाढली, की देताही आले पाहिजे. सगळेच आपल्या घरात किंवा तिजोरीत बंद करून ठेवले, मग घेणार्‍यांना अन्यत्र जाण्याची पाळी येत असते. एकाच घरातल्या किती जणांना उमेदवारी द्यायची, म्हणून शरद पवारांना माघार घ्यावी लागली. तो अनुभव खूप जुना नाही ना? आधीच देण्यासारखे काही उरलेले नाही आणि तरीही आपल्याकडेच सर्वकाही ठेवण्याच्या अट्‌टहासाने ही पाळी आलेली आहे. पिचड, एकत्रित काँग्रेसमध्ये विधानसभेत विरोधी नेता होते आणि आघाडीचे सरकार आल्यावर त्यांना एकदाही उपमुख्यमंत्रिपद मिळाले नाही. नंतरच्या काळामध्ये साध्या मंत्रिपदालाही ते वंचित राहिले असतील, तर त्यांच्या वारसपुत्राने त्यापासून काय धडा घ्यावा? पार्थ, अजितदादा, सुप्रियाताई आणि खुद्द साहेबच सत्तापदे किती काळ बळकावून बसणार? पक्षापाशी भरपूरच सत्तापदे असतील तर गोष्ट वेगळी असते. पण, जेव्हा अधिकारपदांचा तुटवडा असतो, तेव्हा काटकसर घरातून सुरू करावी लागते, हे अनुभवी पक्षाध्यक्षांना कोण समजावू शकेल? बाकीच्या गोष्टी सोडून द्या! जेव्हा पक्षासाठी त्यागाची व संघर्षाची वेळ असते, तेव्हा तरी हव्यास कमी असायला नको काय? देण्यासारखे काही नाही म्हणणे आणि असलेल्यातला मोठा हिस्सा बळकावून बसण्याला गुरुमंत्र म्हणता येणार नाही. किंबहुना जेव्हा तुमच्या नावाने वा नेतृत्वाने िंजकता येत नसते, तेव्हा लढवय्यांना अधिक प्रोत्साहन म्हणून संधी द्यायची असते. त्याचीच वानवा असेल, तर त्यांना अन्यत्र वाट शोधावी लागते. संधी शोधत इतरत्र मुलुखगिरी करावीच लागते. निदान शरद पवारांना ते समजत नसेल का? अजितदादांची गोष्ट वेगळी आहे.
 
मुंडे घराण्यातील अंतर्गत वादाला खतपाणी घालून धनंजय मुंडे यांना हाताशी धरण्याचा प्रकार कशासाठी होता? सत्ता हातात होती म्हणून विरोधी पक्षातल्या आमदारांना फोडण्याची मस्तीच नव्हती का? शिवाय धनंजय विधान परिषदेतले आमदार होते. त्यामुळे सत्तेत फारसा फरक पडणार नव्हता. पण, विरोधी नेता म्हणून राजकारण करणार्‍या गोपीनाथ मुंडेंना दुखावण्यापलीकडे त्यात अन्य काहीही हेतू नव्हता. पण, असल्या डावपेचातून कुठले बीज आपण राजकारणात रुजवीत आहोत, त्याचे भान शरद पवारांनी कधी ठेवले नाही. मिळेल त्या पक्षातून व मिळेल त्या आमदाराला फोडण्याला ते धूर्तपणा समजत राहिले. आज त्यांचेच डावपेच त्यांचे विरोधक वापरत असतील, तर त्यावर वैचारिक टिप्पणी करण्यात अर्थ नाही. पण विषय गंभीर इतकाच आहे, की त्यांच्याच अनुयायांचा पवारांवर विश्वास उरलेला नाही.
 
पवारांचे नेतृत्व आणि प्रभावाने निवडून येण्याची खात्री, या आजवरच्या निष्ठावंतांना उरलेली नाही, ही बाब गंभीर आहे. किंबहुना पवारांच्या राजकीय जीवनातील तीच सर्वात मोठी त्रुटी राहिलेली आहे. सचिन अहीर वा अन्य दोन-चार आमदार-नेते सोडून गेल्याने राष्ट्रवादी पक्षाचा अंतकाळ जवळ आला, असे होत नाही. पण, मरगळ संपवून पक्ष नव्याने उभा करण्याची प्रक्रियाही सुरू होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी चुका शोधून वा दुरुस्त करूनच पुढली पावले टाकावी लागतील. माध्यमांना सुखावणारी वा विरोधकांना डिवचणारी विधाने करून ही घसरगुंडी संपण्याची शक्यता शून्य आहे. देण्यासारखे आपल्यापाशी काहीही का उरलेले नाही, त्याचा शोध म्हणून महत्त्वाचा आहे!