गोंदिया,
धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नाल्यात उलटून झालेल्या अपघातात चार मजूर ठार झाले, तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना आज सकाळी घडली.
धान रोवणीच्या कामासाठी काही मजूर एका ट्रॅक्टरमधून निघाले होते. गोंदिया-साकोली महामार्गावरील डव्वा येथे सकाळी दहा वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर एका नाल्यात उलटला. या अपघातात चार मजूर ठार झाले. तर १३ मजूर जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची माहीती मिळताच मा.आमदार राजकुमार बडोले (माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया) यांनी पोलिस अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन तपास यंत्रणा व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले.
अपघाती मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत १ लक्ष रुपये आणि जखमी व्यक्तींना ५०हजार रुपये देण्याची घोषणा मा.आमदार राजकुमार बडोले (माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया) यांनी केली.