आजम खान यांच्या पापाचा घडा भरला!

    दिनांक :29-Jul-2019
आपल्या वागण्या-बोलण्याने नेहमीच वादग्रस्त ठरणारे समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. वादग्रस्त विधाने करण्याची सवय म्हणण्यापेक्षा हौस आजम खान यांना असल्याचे त्यांच्या जुन्या इतिहासावरून दिसून येते. लोकसभेत तीन तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना, आजम खान यांनी तालिका सभापती रमादेवी यांच्यावर केलेल्या ‘शेरे’बाजीमुळे वातावरण तापले आहे. आजम खान यांनी भाषण करताना अध्यक्षांच्या आसनावर कोण बसले आहे, याचेही भान ठेवले नाही. तालिका सभापती रमादेवी यांनी त्यांना अध्यक्षांच्या आसनाकडे पाहात भाषण करायला सांगितले. जे संसदीय प्रथा आणि परंपरांना धरून होते.
 
सभागृहातील सर्वांनीच अध्यक्षांकडे पाहात त्यांना उद्देशून बोलायचे असते. मात्र, आजम खान यांनी सत्ताधारी बाकांकडे पाहात आपले भाषण सुरू केले. त्यामुळे रमादेवी यांनी त्यांना टोकले, तर आजम खान यांनी त्यांच्यावरच अश्लीलतेकडे झुकणारी ‘शेरे’बाजी केली. असे करत त्यांनी रमादेवी यांचाच नाही, तर लोकसभेच्या अध्यक्षांचा, सभागृहातील संपूर्ण महिला सदस्यांचा आणि देशातील महिलांचा अपमान केला. आजम खान यांच्याबद्दल सभागृहातील सर्वपक्षीय महिला सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. सर्वच पक्षांनी त्यांची तीव्र शब्दांत निंदा करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा सर्वाधिकार अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिला आहे. त्यामुळे आता अध्यक्ष त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. आजम खान यांनी आपल्या ताज्या विधानातून आपली लायकी आणि संस्कृतीही दाखवून दिली आहे. आजम खान यांनी आपल्या शाब्दिक हल्ल्यापासून आजपर्यंत एकाही मोठ्या नेत्याला सोडले नाही. नोटबंदीच्या काळात पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवताना, जो मुलगा पैशासाठी आपल्या आईला रांगेत उभा करतो, त्याने ओंजळभर पाण्यात डुबून जावे, अशी मुक्ताफळे आजम खान यांनी उधळली होती. एवढ्यावरच ते थांबले नाही. चहा विकणार्‍याने 2 वर्षांत 80 कोटींचे ड्रेस बदलवले, असे ते मोदींबद्दल बरळले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 302 चा कुख्यात गुंड क्रमांक एक उत्तरप्रदेशात दहशत पसरवण्यासाठी आला, असे विधान अमित शाह यांच्याबद्दल केले होते. उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी कल्याणिंसह यांची नियुक्ती झाल्यावर घटनात्मक पदांवर शिक्षा झालेल्याला बसवले अशी, तर मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची नियुक्ती झाल्यावर, उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर मोदी यांनी 302 च्या गुन्ह्यातील अशा आरोपीला बसवले ज्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांत उभी फूट पडली, अशी मुक्ताफळे आजम खान यांनी उधळली होती. ज्या समाजवादी पक्षात राहून आजम खान एवढी दादागिरी करत होते, ज्यांना आपला गॉडफादर समजत होते, ते मुलायमिंसह यादव आपल्या धोतराखाली खाकी पॅण्ट घालतात, असे विधान करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, चित्रपट अभिनेत्री आणि सपाच्या माजी खासदार जयाप्रदा यांच्याबद्दल त्यांनी असेच विधान करून आपली लायकी दाखवून दिली. मुळात खाकी निकरबद्दल आजम खान यांच्या मनात एवढा द्वेष का, ते प्रत्येक वेळी दुसर्‍यांच्या खाकी निकरला हात घालून आपल्या विकृततेचे प्रदर्शन का करतात, हा प्रश्न आहे. जयाप्रदा यांच्याबद्दल केलेल्या अश्लील विधानाबद्दल आजम खान यांच्यावर न्यायालयात नुकतेच आरोपपत्रही दाखल झाले आहे. बुलंदशहर येथील बलात्काराच्या घटनेच्या वेळी, हे कोणा राजकीय पक्षाचे कृत्य वाटते, सत्तेसाठी आजचे पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे ते म्हणाले होते. आजम खान यांच्या या बेजबाबदार विधानाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कानउघाडणीही केली होती. पण, यापासून आजम खान यांनी कोणताही धडा घेतल्याचे कधी दिसले नाही.
 
वरील सर्व विधाने राजकीय स्वरूपाची समजून त्याकडे एकवेळ दुर्लक्षही करता येईल. पण, आजम खान यांचे सर्वात आक्षेपार्ह विधान म्हणजे त्यांनी भारतीय लष्करात धर्माच्या आधारावर फूट पाडण्याचा केलेला प्रयत्न. कारगिलमध्ये भारताला विजय मिळवून देणारे जवान हिंदू नाही तर मुस्लिम होते, असे आजम खान बरळले होते. भारतीय लष्कराच्या जवानांबद्दल दुसरे असेच वादग्रस्त आणि असेच अतिशय आक्षेपार्ह विधान त्यांनी केले होते. आजम खान यांचे दुसरे सर्वात संतापजनक विधान म्हणजे त्यांनी बदायूं येथील एका सभेत भारतमातेचा उल्लेख डायन असा केला होता. या विधानांबद्दल आजम खान यांना कधीच माफ करता येणार नाही. या विधानांबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबायला पाहिजे. आजच्या काळात रामशास्त्री प्रभुणेंसारखे न्यायाधीश असते, तर त्यांनी आजम खान यांच्या गुन्ह्यांसाठी त्यांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली असती. जो माणूस भारतमातेला डायन म्हणतो, त्याला भारतात राहण्याचाच अधिकार नाही. तसेही आपले पाकिस्तानबाबतचे प्रेम आजम खान यांनी नुकतेच दाखवूनही दिले आहे. आमचे पूर्वज तेव्हाच पाकिस्तानात गेले असते, तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती, या शब्दांत आजम खान भुंकले होते. आजम खान यांची एवढी आक्षेपार्ह विधाने खपवूनच कशी घेतली जातात, त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई का केली गेली नाही, असा प्रश्न देशातील सर्वसामान्य जनतेला नेहमीच पडतो. जी व्यक्ती तुरुंगात हवी ती लोकसभेत दिसते आहे. बरं, लोकसभेत तरी सभ्यपणे वागावे, तसेही नाही. आपल्या मोठ्या बहिणीसारख्या असलेल्या रमादेवी यांच्याबद्दल नवे विधान करून आजम खान यांनी लोकसभेची अप्रतिष्ठा केली आहे. त्यामुळे याची कठोरातील कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे.
 
रमादेवी यांच्याबाबत केलेल्या विधानाबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी आजम खान यांचा निषेध करत त्यांच्या माफीची मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांना माफी मागायला सांगितले. पण, माफी मागण्याचे नाकारत आणि सभागृहातून निघून जात त्यांनी आपल्या उद्दामपणाचे जे प्रदर्शन केले, ते जास्त संतापजनक होते. विशेष म्हणजे, माझे काही चुकले असेल तर मीच राजीनामा देतो, असे ते म्हणाले. हे म्हणजे चोरच्या चोर वर शिरजोर यासारखे झाले.
आजम खान यांनी त्याच वेळी माफी मागितली असती, तर हे प्रकरण वाढले नसते. पण, आपल्या चुकीबद्दल आजम खान यांनी कोणतीही खंत व्यक्त केली नाही वा माफीही मागितली नाही. त्यामुळे आता आजम खान यांनी लोकसभेत येऊन माफी मागितली तरीही त्यांची माफी मान्य केली जाऊ नये. आजम खान यांनी रमादेवींबाबतचे विधान अनावधानाने नाही, तर जाणीवपूर्वक केले, असे त्यांच्या सवयीवरून दिसते आहे. त्यामुळे आजम खान यांनी राजीनामा देऊनच टाकावा. ते राजीनामा द्यायला तयार नसतील, तर या गुन्ह्यासाठी त्यांचे सदस्यत्व काही काळासाठी निलंबित करून चालणार नाही, तर त्यांचे सदस्यत्व बरखास्तच केले पाहिजे. यापेक्षा कमी अशी कोणतीच शिक्षा सभागृहाने मान्य करू नये. आजम खान यांचा हा पहिला गुन्हा असता तर त्यांनी माफी मागितल्यावर त्यांना माफ करणेही योग्य ठरले असते. पण, आजम खान यांनी तर एकामागे एक अशा गुन्ह्यांची मालिकाच उभी केली आहे. त्यामुळे त्यांच्या शंभर पापांचा घडा भरला आहे. म्हणून शिशुपालाला केली तशीच शिक्षा त्यांना केली पाहिजे. त्यांना लोकसभेने अशी शिक्षा करावी, जेणेकरून देशात दुसरा आजम खान तयार होणार नाही!