इम्रान खानचा कबुलीजबाब!

    दिनांक :29-Jul-2019
दिल्ली दिनांक 
 
रवींद्र दाणी 
 
पाकिस्तानचे शासक- फक्त अल्ला, आर्मी आणि अमेरिका यांच्यासमोरच खरं बोलतात, असे विनोदाने म्हटले जात असे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ते खरे खरून दाखविले. इम्रान खान यांनी अमेरिकेत जाऊन, पाकिस्तानात 40 हजार अतिरेकी सक्रिय असल्याची कबुली दिली, हे फार चांगले झाले. विशेष म्हणजे अमेरिकेतील पाकिस्तानी नागरिकांसमोर बोलताना, इम्रान खान यांनी हे भाष्य केले. आमच्या भूमीवर अतिरेक्यांचे जवळपास 40 गट सक्रिय आहेत. मात्र, आजवरच्या सरकारांनी ही माहिती अमेरिका व जगापासून दडवून ठेवली, हेही इम्रान खान यांनी सांगून टाकले. अतिरेक्यांचे हे गट अफगाणिस्तान व काश्मीर भागात सक्रिय होते, आहेत, असेही इम्रान खान यांनी सांगितले.

 
 
प्रांजळ कबुलीजबाब
पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात आहे. अमेरिका व जगाला हे दाखविण्यासाठी इम्रान खान यांनी आपल्या अमेरिका दौर्‍यासाठी विशेष सरकारी विमानाचा वापर न करता, साध्या प्रवासी विमानाने हा दौरा केला. इ्रम्रान खानांचे भाषण ऐकण्यासाठी, अमेरिकेतील पाक नागरिक मोठ्या संख्येत वॉशिंग्टनमध्ये एकत्र झाले होते. त्यांच्यासमोर इम्रान खान यांनी, आपल्या देशाची वस्तुस्थिती सांगितली हे बरे झाले. इम्रान यांच्या कबुलीजबाबानंतर भारताला पाकिस्तानच्या कारवायांबाबत काहीही सांगण्यासारखे राहिलेले नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना कसा आसरा- आश्रय देत होता व आहे, याचा सर्वात मोठा पुरावा- अल्‌ कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचे अबोटाबाद येथे सापडणे हे होते. अबोटाबाद हे पाकिस्तानी लष्कराचे एक प्रमुख केंद्र आहे. अबोटाबादच्या लष्करी अकादमीला लागून, एका ओसाड हवेलीत ओसामाला आश्रय देण्यात आला होता. हे पाकिस्तानी लष्कराच्या संमतीशिवाय होणे शक्य नव्हते आणि पाकिस्तानी लष्कराला नाही म्हणण्याचे धाडस कोणतेही पाकिस्तानी सरकार करू शकत नव्हते. या सार्‍या बाबी जगासमोर करण्याचे धाडस इम्रान खान करीत आहेत, ही फार चांगली बाब आहे.
 
आर्थिक संकट
पाकिस्तानवर मागील काही वर्षांत दहशतवादाचा जो शिक्का बसला आहे, त्याचे आर्थिक परिणाम त्याला आता जाणवू लागले आहेत. चीन, सौदी अरेबिया आणि आणखी काही देश वगळता पाकिस्तानला मिळणारी अर्थिक मदत बंद झाली आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था पाकिस्तानला कर्ज देण्यास फारशा उत्सुक नाहीत. केवळ चीन व सौदी अरेबियाच्या मदतीवर आपण टिकाव धरू शकत नाही, हे पाकिस्तानच्या लक्षात आले आहे. सध्याच्या स्थितीत जगात, पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी इम्रान खान यांच्यापेक्षा दुसरा चांगला नेता नाही, हे पाकिस्तानी लष्कराच्याही लक्षात आले आहे. कारण, दहशतवादाच्या खेळात पाकिस्तानी लष्कराचे हात पूर्ण अडकले आहेत आणि पोळलेही आहेत. चीन व सौदी अरब सोडून पाकिस्तानी लष्करावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. ही स्थिती पाकिस्तानी लष्कराच्या लक्षात आली असल्याने, पाकिस्तानी लष्कर आजतरी इम्रान खानांच्या पाठीशी उभे आहे. अमेरिकेत जाऊन सत्य सांगण्याचे जे धाडस इम्रान खान करीत आहेत, ते करण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानी लष्कराला विश्वासात घेतले असावे, असे मानले जाते. पाकिस्तानी लष्कराला विश्वासात घेतल्याशिवाय बोलण्याचे धाडस ते करू शकत नाही. पाकिस्तानी लष्कर व इम्रान खान दोघांनाही परस्परांची गरज असल्याने, सध्यातरी पाकिस्तान सरकार व पाकिस्तान लष्कर दहशतवादाच्या मुद्यावर एकत्र असल्याचे दिसून येते.
पाकिस्तानने, दहशतवादाबद्दल जाहीर कबुलीजबाब दिल्याशिवाय कोणताही देश वा नेता आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, याची पूर्ण कल्पना असल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानाने ही भूमिका घेतली, असे मानले जाते. आजवर पाकिस्तानी नेते ही बाब मान्य करण्यास नकार देत होते.
 
समस्या अफगाणिस्तानची
पाकिस्तानात व भारतातील काश्मीरमध्ये आज जे काही सुरू आहे, त्याची मुळे अफगाणिस्तानात असल्याचे मानले जाते. अफगाणिस्तानवर रशियाचा ताबा असतानाच तेथे काही मुजाहिदीन गट सक्रिय होते. 1989 नंतर हे गट भारताच्या काश्मीरमध्ये सक्रिय झाले आणि खोर्‍यात दहशतवाद सुरू झाला. पाकिस्तानी लष्कराने या गटांना प्रशिक्षण दिले, पैसा दिला. नंतर हे गट पाकिस्तानातही सक्रिय झाले. काश्मीर खोर्‍यात दहशतवादाचा वणवा पेटविणार्‍या पाकिस्तानला, नंतर दहशतवादाच्या झळा बसू लागल्या. पाकिस्तानातच मोठे दहशतवादी हल्ले होऊ लागले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराला परिस्थितीचे गांभीर्य समजले व त्याला आपल्या देशात दहशतवादाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाया कराव्या लागल्या.
 
गरज अमेरिकेची
अमेरिकेला आजतरी पाकिस्तानची गरज आहे. अफगाणिस्तानात सध्या अमेरिकेचे सरकार आहे. तेथील सरकार स्थिर व्हावे व शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पाकिस्तानने मदत करावी, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे आणि यात पाकिस्तान एक महत्त्वाची भूमिका बजावीत असल्याने, अमेरिकेला पाकिस्ताबद्दल पुन्हा विश्वास वाटू लागला आहे. पाकिस्तानच्या सहकार्याशिवाय अफगाणिस्तानमधील सत्ता स्थिर होऊ शकत नाही, याची अमेरिकेला कल्पना आहे. त्यामुळे, पाकिस्तानचे काही गुन्हे माफ करून, पुन्हा पाकिस्तानशी जवळीक करण्याचे प्रयत्न अमेरिकेने चालविले आहेत.
 
चीनचा दबदबा
पाकिस्तानला आपण फार दुरावले तर तो पूर्णपणे चीनच्या घशात जाईल, अशी भीती अमेरिकेला वाटते. अमेरिकेने पाकिस्तानबाबत नरमाईचे धोरण घेण्याचे हेही एक कारण असल्याचे म्हटले जाते. इम्रान खानच्या अमेरिकाभेटीवर एका अमेरिकन नेत्याचे भाष्य होते-पाकिस्तानचे लग्न झाले आहे चीनशी, मात्र त्याला जवळीक करावयाची आहे आमच्याशी!
 
ट्रम्प यांचे विधान
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा झाल्यावर राष्ट्रपती ट्रम्प यांनी, काश्मीरप्रश्नावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असे विधान केले. हे विधान त्यांनी पाकिस्तानला सुखावण्यासाठी केले असावे, असे मानले जाते. ट्रम्प यांच्या या विधानाचे इम्रान खानांनी लगेच स्वागत केले, तर भारताने याचा स्वाभाविकच इन्कार केला. काश्मीरप्रश्नावर कोणत्याही तिसर्‍या देशाची मध्यस्थी मान्य नाही, अशी भारताची घोषित भूमिका असल्याने, मोदी यांनी ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची विनंती करण्याची शक्यता नव्हतीच. पण, ट्रम्प यांच्या विधानाने भारतीय गोटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली. पराराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या खुलाशाने ती निवळली.
 
हवाईमार्ग खुला
दरम्यान, पाकिस्तानने मागील काही महिन्यांपासून बंद केलेली आपली हवाई सीमा भारतीय विमानांसाठी खुली केली. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतात जाणार्‍या व भारतातून येणार्‍या विमानांसाठी आपली हवाई सीमा बंद केली होती. त्याचा फटका भारतीय विमान कंपन्यांना बसत होता. कारण, युरोप, अमेरिका देशांकडे जाणार्‍या विमानांना मोठा वळसा घालून जावे लागत होते. याने भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते. पाकिस्तानलाही याचा मोठा फटका बसला. पाकिस्तानने आपली हवाई सीमा खुली केल्याने दोन्ही देशांतील संबंध काहीसे पूर्ववत होत असल्याचा हा संकेत आहे.