संजय दत्त झळकणार अधीराच्या भूमिकेत

    दिनांक :29-Jul-2019
सध्या बॉलिवूडसहित इतर चित्रपट इंडस्ट्रीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची चलती पहायला मिळते. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘केजीएफ: चॅप्टर वन’. या चित्रपटाने दक्षिणेकडेच नव्हे तर संपूर्ण देशभरात अक्षरश: धुमाकूळच घातला होता. त्यातच आता या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘केजीएफ: चॅप्टर टू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असून या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर प्रदर्शित करुन संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
२५० कोटींचा गल्ला जमविणाऱ्या केजीएफ : चॅप्टर वनच्या या आगामी भागामध्ये अभिनेता संजय दत्त खलनायकाची व्यक्तीरेखा साकारत असून ‘अधीरा’ असं त्याच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. विशेष म्हणजे सोमवारी (२९ जुलै) संजय दत्तचा वाढदिवस असतो. त्यामुळे या दिवसाचं निमित्त साधत चित्रपटातील त्याच्या लूकचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये संजय दत्तच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा राग स्पष्टपणे दिसून येत आहे. हे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर संजयने ते शेअर करत चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत. ‘धन्यवाद. आणि केजीएफचा एक भाग होण्याची संधी मिळाल्यामुळे प्रचंड खुश आणि उत्साही आहे’, असं संजयने म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी ‘केजीएफ २’चं एक टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये अधीराची लहानशी झलक पाहायला मिळाली होती. मात्र नक्की ही व्यक्तीरेखा कोण साकारणार हे स्पष्ट दिसून आलं नव्हतं. मात्र आता संजयच्या नव्या लूकमधील पोस्टर शेअर करत या व्यक्तीरेखेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.
‘केजीएफ: चॅप्टर वन’ हा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे. अप्रतिम अभिनय, सुंदर दृश्ये आणि मनोरंजक कथेच्या संगमामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून दक्षिणात्य सुपरस्टार यश प्रमुख भूमिकेमध्ये होता. श्रीनिधी शेट्टी, रामचंद्र राजू यांच्यासह मौनी रॉयनेही या चित्रपटातून उत्‍तम परफॉर्मन्स दिला आहे.