हाहाकार : चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटून १६ जण ठार

    दिनांक :03-Jul-2019
कच्ची घरे वाहून गेली, काही गावे पाण्याखाली
रत्नागिरी, 
सलग तीन दिवस मुंबई आणि पुण्यात थैमान घालून, अनेकांचे बळी घेतल्यानंतर मुसळधार पावसाने आज कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्याला आपल्या प्रकोपाचे लक्ष्य बनविले. मंगळवारच्या सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला भगदाड पडले. धरणातील पाण्याचा जोरदार प्रवाह भिंत फोडून निघाला आणि पाणलोट क्षेत्रातील सात गावांना विळखा घातला. या घटनेत २३ जण बेपत्ता झाले असून, आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अनेक कच्ची घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. 
 
मंगळवारी रात्री या परिसरात अतिवृष्टी झाली. यामुळे धरणाला मोठी तडा गेली आणि पाण्याचा प्रवाह धरण फोडून गावांच्या दिशेने निघाला. सात गावे पूर्णपणे पाण्याखाली आली. गाढ झोपेत असलेल्या लोकांना, काय झाले काहीच कळले नाही. अचानक त्यांची धावपळ सुरू झाली. 12 कच्ची घरे पुरात वाहून गेली. याच कच्च्या घरांमधील 19 नागरिक बेपत्ता झाले असून, त्यातील 9 जणांचे मृतदेह आतापर्यंत आढळून आले आहेत. उर्वरित लोकांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती रत्नागिरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली. राष्ट्रीय आपात प्रतिसाद दल आणि पोलिसांनी मदत व बचाव मोहीम हाती घेतली आहे, असे ते म्हणाले.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिस व एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने पुढाकार घेऊन अनेक गावकर्‍यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. या गावांमधील अंधार आणि पाण्याचा वाढता प्रवाह यामुळे सुरुवातीला मदत व बचाव कार्यात काही अडचणी गेल्या, पण नंतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून गावकर्‍यांना वाचविले, असे त्यांनी सांगितले.
 

 
दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती
तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येते. 2000 साली या धरणांचे बांधकाम पूर्ण झाले. 20 लाख क्युबिक मीटर पाण्याची या धरणाची क्षमता आहे. मात्र, मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मते, या धरणाच्या दुरुस्तीसाठी लेखी अर्ज देण्यात आला असतानाही, प्रशासनाने त्याने लक्ष दिले नाही. धरणाच्या भिंतील तडा गेली असल्याचेही आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते, पण काहीच करण्यात आले नाही. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही, गावकर्‍यांकडून तक‘ार आली होती, ही बाब मान्य केली आहे.