मोबाईल कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा; व्यापारी महासंघाची मागणी

    दिनांक :03-Jul-2019
 
रिसोड,
हिंगोली नाका ते कालू शा बाबा दर्गा रस्ता एका मोबाइल कंपनीने ऐन पावसाळ्यात खोदून आधीच खराब झालेला रस्ता आणखी खराब केल्याने कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी व्यापारी महासंघ रिसोड तर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 
 
जिल्हाधिकारी वाशिम यांना मुख्याधिकारी न. प. रिसोड मार्फत दिलेल्या निवेदनानुसार हिंगोली नाका ते कालुशा बाबा दर्गा पर्यंतचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून, या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यातच १ जुलै २०१९ च्या रात्री एका मोबाईल कंपनीचे केबल टाकण्यासाठी कंपनीने हा रस्ता खोदून केबल टाकले. पावसामुळे या रस्त्यावर आधीच चिखल व पाण्याचे डबके साचले होते व याचा जनतेस त्रास सहन करावा लागत होता. त्यातच दिवसभर पाऊस झाल्याने व हा रस्ता खोदल्याने अनेक ठिकाणी चिखल होऊन वाहने फसली तर व्यापाऱ्यांच्या दुकानात जाण्यासाठी रस्ता नव्हता.
 
तसेच अनेक जण या चिखलात घसरून पडले. त्यामुळे व्यापारी महासंघाने पुढाकार घेऊन जनतेची गैरसोय झाल्याने सर्व व्यापारी मंगळवारी नगरपरिषद मध्ये गेले व त्यांनी मुख्याधिकारी न प री रिसोड यांना निवेदन देऊन ज्या कंपनीने हा रस्ता खोदला त्या कंपनीवर व रस्त्याला खोदकामाची परवानगी देणाऱ्या अधिकारी व खोदकाम करणार्‍या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी एकमुखी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
 
विशेष म्हणजे या सिविल लाइन असल्याने याचा सर्वांनाच फटका बसला आहे फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास व कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती संबंधित मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
 
याबाबत मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, याबाबत पोलिस काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून नगरपालिकेने हा हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. मात्र अद्यापही या रस्त्याचे भिजत घोंगडे कायम असून या रस्त्यावर दुरुस्ती कोणी करायची हा चर्चेचा विषय असून मात्र यामुळे जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे.