संथ खेळीवरुन टीका करणाऱ्यांना धोनीचे प्रत्युत्तर

    दिनांक :03-Jul-2019
लंडन,
भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत असला तरी एका खेळाडूला सतत टीकेचा सामना करावा लागत आहे तो म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. आपल्या संथ खेळीमुळे धोनीवर सतत टीका होत असून निवृत्ती घ्यावी अशी मागणी होत आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री धोनीला पाठिंबा देत असताना चाहते मात्र प्रचंड नाराज आहेत.
बांगलादेशविरोधातील सामन्यातही महेंद्रसिंग धोनीने संथ फलंदाजी करत ३३ चेंडूत फक्त ३५ धावा केल्या. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर ३१५ धावांचे आव्हान उभे केले होते. पण जर धोनीने वेगवान खेळी केली असती तर ही धावसंख्या ३५० वर पोहोचली असती असे अनेकांचे म्हणणे आहे.

 
बांगलादेशविरोधात विजय मिळवत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी धोनीची संथ खेळी पुढील सामन्यात धोक्याची ठरु शकते असं अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे धोनीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करावी असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासीर हुसेन आणि सौरभ गांगुलीनेही धोनीच्या धीम्या खेळावर टीका केली होती.
दरम्यान महेंद्रसिंग धोनीने आपल्या मित्रांशी बोलताना निवृत्तीची मागणी करत टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ‘ज्याप्रमाणे फलंदाजी आणि यष्टीरक्षण कसं करायचं हे मला चांगलं कळतं तितकंच निवृत्त कधी व्हायचं हेदेखील मला कळतं’, असं धोनीने म्हटलं आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, धोनीने १४ जूलै म्हणजेच विश्वचषकाचा अंतिम सामन्यादिवशी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी किंवा बीसीसीआयने याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पीटीआयने बीसीसीआयमधील आधिकाऱ्याचे हवाल्याने धोनी विश्वचषकामध्ये आपला अखेरचा सामना खेळणार असल्याचे वृत्त दिले आहे.