आषाढस्पर्श!

    दिनांक :03-Jul-2019
काही शब्द हेच कविता असतात. आषाढाचेही तसेच आहे. ती एक परिपूर्ण कविता आहे आणि स्वयंपूर्ण अशी घटनाही आहे. आषाढ म्हणजे पाऊस, आषाढ म्हणजे हिरवाई, आषाढ म्हणजे पेरलेले उगवण्याची वेळ आणि म्हणूनच श्रमसाफल्याचं स्वप्न साकार होण्याची सर्वांगसुंदर अशी वेळ... पाऊस कितीही उशिराने आला तरीही आषाढात मात्र तो असतोच. पावसाच्या नकारात्मतेला आषाढाचे मंत्र नम्र करतात. आजकाल पाऊस मृग नक्षत्राची रेषा ओलांडतो आहे. गेली काही वर्षे पाऊस मृगाच्या मुहूर्ताला येतच नाही. त्यासाठी मग विज्ञान आणि पर्यावरणाची काय काय कारणे दिली जातात. पावसाची मनधरणी केली जाते. बुद्धी काहीही कारणे देत असली, तरीही पावसाची मनधरणी करण्यासाठी अखेर प्रार्थनाच केल्या जातात. पूजेचा भाव एकच असला तरीही तर्‍हा मात्र वेगळ्या असू शकतात. बेडकाचे लग्न लावण्यापासून कडूनिंबाच्या डहाळ्यांनी देवीमातेची मनधरणी करण्यापर्यंत अनेक उपाय केले जातात. मागे, महाराष्ट्राच्या एका राज्यपालांनी पावसासाठी राज्यभर जनतेला पावसाला साकडे घालण्यासाठी प्रार्थना करायला लावल्या होत्या. शाळांमध्ये त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रार्थना केल्या, प्रभातफेर्‍या काढल्या. पाऊस यायचा तो आषाढातच आला होता.यंदाही अगदी मृग नक्षत्र संपल्यावरही पाऊस आलेला नव्हता. तो आता आलेला आहे. आषाढाचा हा महिना कर्माचा आहे, बुद्धीचा आहे अन्‌ कवितेचाही आहे. विरहाच्या झळा पावसाच्या गारव्यातही याच महिन्यात पोळत असतात. म्हणून मग भाषेला धुमारे फुटतात, आंगीकम्‌ भुवनम्‌ यस्य... अवघ्या अस्तित्वानेच सृजन धारण करण्याचा हा महिना आहे. पाऊस पडू लागलेला असतो. पहिल्या पावसाचा बहर ओसरल्यावर जमिनीत पाणी मुरून गेलेले असते आणि मग पेरणी वर आलेली असते. माती मृदू, मुलायम आणि मार्दवी झालेली असते. ज्ञानेश्वरमाउली म्हणतात त्यानुसार, ‘कोंभाचिये लवलव, दावी मातीचे मार्दव...’ एरवी धरित्रीचे उदर फाडायचे, मातीत खड्‌डा खोदायचा म्हणजे मग पहार लागते, कुदळ लागते आणि कधीकधी तर मग बारूद लावून सुरुंगच फोडावे लागतात तेव्हा कुठे माती बाजूला होते... एखादे बीज पडते झाडावरून. मातीत लोळत राहते. ऊन्हात तापते. वार्‍यावर उडत राहते आणि फळण्यासाठी वाट बघत राहते. मग कधीतरी पाऊस येतो. मातीत बी रुजते. इतकी कठीण असलेली माती त्या बिजासाठी मृदू होते. माउलींनी त्यासाठी ‘मातीचे मार्दव’ हा शब्द वापरला आहे. माती त्या कोवळ्या कोंभासाठी जागा करून देते. बाजूला होते आणि मातीचे उदर फाडून तो कोवळा कोंभ बाहेर पडतो... ती आषाढातली अवस्था असते. अशा कोंभांची काळजी घेण्याचे कर्म शेतकरी करतात. श्रमाचे साफल्य हवे असेल तर घाम गाळावा लागतो. पावसाच्या धारांत स्वेद मिसळतो आणि मग रान फुलून येते. आषाढात घरी बसले तर रान बेवारस होते. म्हणून हा कर्माचा अन्‌ श्रमाचा महिना आहे.
आषाढ मग कविता होतो. पावसाच्या संगतीनं सूर ताल धरू लागतात आणि मग गाव पाऊस-गाणी गाऊ लागते. ही गाणी म्हणजे अभंग असतात. कारण, श्रमाने आणि बुद्धिप्रामाण्यवादाने ते अव्यय झालेले असतात. गावच्या वाटेवर हळदकुंकू दाटून येतं. घराची छपरेही फुलांची होतात. पाऊस आता पुष्ट झालेला. आषाढातले ढग सांगावे आणतात. तिच्या डोळ्यांत तरळणारा चेहरा आषाढाने वाचलेला. अशा वेळी आषाढाने मौन तोडावे. आषाढाचे असे मौन तोडणे सोपे नसते. आषाढाने मौन तोडले की, चंद्रभागेचा बांध ढळतो. गावातले ओहोळही नदीशी स्पर्धा करू बघतात. आषाढाच्या मौनाचे अभंग होतात. राऊळात भावभक्तीची दाटी होते. आळंदी चिंब चिंब होते. वर ढगात जनाबाई जात्यावर ओव्या दळते आणि अबीरदाटी झालेेले शब्द भाबड्या भक्तांच्या मदतीला धावण्यासाठी आभाळाचे गहिवर ढगांमध्ये दाटून येतात आणि ढगांना पाण्याच्या टपोर्‍या थेंबांचे जोंधळे लगडून येतात. म्हणून आषाढ हा भक्तीचाही महिना आहे. भक्त काळ्या आईच्या कुशीत नाचत असतात. जमिनीचा बाप गोरा कुंभार होतो. गेली कित्येक शतके पावले पंढरीची वाट चालताहेत. आषाढीची वारी सुफळ संपूर्ण होते, तेव्हा मग भक्तीचा गंध दरवळू लागलेला असतो. आषाढाचा हा महिमा आहे.
आषाढ जसा कर्माचा, भक्तीचा महिना आहे तसाच तो बुद्धीचाही आहे. ही बुद्धी भावनेशी परकेपणाने वागत नाही. तर्काची कास सोडत नाही, पण भावनेलाही पोरके करत नाही. असे संतुलन साधले जाते, कारण तो आषाढ असतो. पाऊस पडत नाही म्हणून अलीकडे कृत्रिम पाऊस पाडण्याचे सोहळे साजरे केले जातात. तसा प्रयत्न होतो. पाऊस अन्‌ तोही कृत्रिम, असे होऊच शकत नाही. ते आपले वैज्ञानिकसमाधान असू शकते. या जगात निसर्ग हाच धर्म आहे, हा बुद्धियोग आषाढ शिकवितो. म्हणून वारकरी चमत्कारांवर विश्वास ठेवत नाही. आस्थेने लिहिलेल्या गाथा इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगतात, हा चमत्कार नाही. तो बुद्धीचा प्रभाव आहे. कागद पाण्यात बुडू शकतात. त्यावरची शाई वाहून जाऊ शकते; पण असंख्यांच्या बहुसंख्य मनांवर, मेंदूवर कोरल्या गेलेल्या, ‘नाठाळाचे पाठी घालावी काठी’ असे सांगणार्‍या ओव्या मात्र पुसता येत नाही. वंशांच्या पेशींमध्ये त्या पेरल्या गेलेल्या आहेत अन्‌ पिढ्यान्‌पिढ्या त्या प्रवाहित होतात. त्याचा सोहळा आषाढात साजरा होत असतो. देव निद्रिस्त होतात म्हणून माणसांनी जागे राहावे, असे सांगणारा हा महिना आहे.
आषाढ तसा भावनेचा अन्‌ प्रेमाचा महिना आहे. विरहाने वेडे होतानाही विवेक मात्र सुटत नाही. कारण आषाढ बुद्धी, मन आणि भक्तीचा संगम आहे. ढगांमध्येही माणसांच्या भावना कळण्याची कुवत निर्माण होण्याचे कारण हा महिना अन्‌ त्याचा महिमा असतो. म्हणूनच कवींचे अन्‌ निसर्गाचे, पावसाचे नाते दृढ करत हा महिना श्रावणाचे दान पदरात टाकून जात असतो. भक्तीला शुद्ध कर्माची म्हणूनच व्रते आणि अनुष्ठानांची जोड श्रावणात मिळते, त्याची बीजवाही आषाढात होते. म्हणून कालिदासांना त्यांच्या दूरस्थ सखीला सांगावा देण्यासाठी ढग सापडतात. ते त्याचा संदेश घेऊन जातात. नुसतेच घेऊन जात नाहीत, त्या बदल्यात काही मागतही नाहीत, उलट वाटेत काय काय घडते आहे, हेही सांगत असतात. ती सगळीच वर्णने पर्यावरणाची, निसर्गाची नजाकत सांगणारी आहेत. आषाढाच्या पहिल्याच दिवशी कालिदासांनी ढगांना संदेशवाहक बनविले होते. पुराणांपासूनच सृजनजागृत असलेल्या विदर्भाच्या भूमीतच हे घडले, त्यालाही पुराणसंदर्भ आहेतच. आषाढस्पर्श झाला की काय होऊ शकते, हेच मेघदूतात दिसते. अशोक वृक्षाला फुले येत नाहीत, पण चांदण्यारात्री एखाद्या पुरंध्रीने लत्ताप्रहार केला तर शुभ्र अशोकाला फुले येतात किंवा विडा खाऊन त्याची चूळ या वृक्षाच्या मुळाशी केली तिने तर या वृक्षाला फुले येतात, अशा कल्पना सुचण्याचे कारण समजून घ्यायचे असेल तर आषाढ कळायला हवा. दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या ‘ऋतुचक्र’मध्ये तो समजावून सांगितला आहे. शांताबाई शेळक्यांनी मेघदूताचे भाषांतर केले, त्यात काव्य अधिक जवळ आणून ठेवले. आजचा आषाढाचा पहिला दिवस म्हणूनच जास्त पाणीभरला असतो. गहिवरल्या अनावर ढगांनी केव्हाही धीर सोडावा अन्‌ कोसळायला लागावे, असेच वातावरण असते या दिवशी. पृथ्वीचे तापमान कितीही वाढले, तरीही आषाढाचा पहिला दिवस ओलेत्या श्वासांनी जिवंत असतोच...!