संकरित गायींची ओळख

    दिनांक :03-Jul-2019
अलिकडच्या काळात दूग्ध व्यवसायासाठी संकरित गायींचा वापर वाढू लागला आहे. त्यादृष्टीने निवड करताना संकरित गायींची योग्य ओळख लक्षात घेणं गरजेचं ठरतं. सर्वसाधारणपणे देशी, विदेशी आणि संकरित गायी असे तीन प्रकार शेतकर्‍यांना परिचित आहेत. यातील प्रत्येक प्रकाराचे काही फायदे तर काही मर्यादा आहेत. म्हणून या व्यवसायाविषयी अधिक माहिती गरजेची आहे. 

 
  1. करणस्विस : ही गाय राष्ट्रीय दूध संशोधन केंद्र, कर्नाल, हरियाणा इथं साहिवाल गाय आणि ब्राऊन स्विस वळू यांच्या संयोगातून तयार करण्यात आली आहे. या जातीचे वळू मजबूत, कणखर असून त्यांचा उपयोग शेतात मशागतीसाठी करण्यात येतो. यांचा रंग फिक्कट करडा ते तपकिरी असतो. कधी पांढर्‍या रंगाचे ठिपके माथ्यावर आढळून येतात. पूर्ण वाढ झालेल्या गायीचं वजन सुमारे 400 ते 500 किलो तर वळूचं 600 ते 750 किलो असतं. कान छोटे आणि मान मध्यम आकाराची असते. यांना खांदा नसतो. मात्र शेपटीची लांबी खूप असते. या गायींचं एका वेतातील दूध उत्पादन सरासरी 3350 किलो असते.
  2. सुनंदिनी : ही गाय गावठी जनावरं आणि जर्सी, ब्राऊनस्वीस, होलस्टीन फ्रिजीयन यांच्या संयोगातून तयार करण्यात आली. यांची शरीरयष्टी भक्कम असते. त्यांचे एका वेतातील सरासरी दूध उत्पादन 2500 लिटर इतकं असतं.
  3. करनफ्रिज : ही गाय राष्ट्रीय दूध संशोधन केंद्र, कर्नाल (हरियाणा) इथं तयार करण्यात आली आहे. या गायीची कास काळ्या रंगाची आणि त्यावर पांढर पट्टे आढळून येतात. या गायींचं एका वेताचं सरासरी दुध उत्पादन 3700 किलो असतं.
  4. फुले त्रिवेणी : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गो संशोधन व विकास प्रकल्पावर ही गाय विकसित करण्यात आली आहे. या संकरित गायीमध्ये होलस्टीन फ्रिजीयन (50 टक्के), जर्सी (25 टक्के) आणि गीर (25 टक्के) या जातीच्या रक्ताचा समावेश आहे. त्यामुळे अधिक दूध उत्पादन, अधिक स्निग्धांश आणि उत्तम रोग प्रतिकारक क्षमता यांचा त्रिवेणी संगम यात साधला आहे. या जातीचं एका वेताचं सरासरी दुध उत्पादन 3000 ते 3500 लिटर असून दुधातील फॅटचं प्रमाण 3.8 ते 4.2 टक्के असतं.