वैशिष्ट्यपूर्ण ‘करिझ्मा’ बटाटा

    दिनांक :03-Jul-2019
सामान्य बटाट्यांपेक्षा चांगला आणि कमी जीआय असलेल्या खाद्यपदार्थांच्या तुलनेतही चांगला बटाटा विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे. या बटाट्याला शास्त्रज्ञांनी करिझ्मा हे नाव दिलं आहे. खरं तर बटाट्याचा अधिक जीआययुक्त कर्बोदकं असलेल्या गटात समावेश होतो. 

 
 
त्यामुळे मधुमेह, हृदयरोग आणि तत्सम आजार असलेल्या रूग्णांना बटाटा न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र करिझ्मामध्ये अन्य बटाटा जातीच्या तुलनेत केवळ अर्धेच ग्लुकोज असल्याचे दिसून आलं आहे. करिझ्मा बटाट्याचा जीआय निर्देशांक 55 असून बाजारात उपलब्ध असलेल्या इतर बटाट्यांचा हा निर्देशांक 74 ते 94 पर्यंत असतो. त्यामुळे मधुमेह आणि हृदयरोगी यांना करिझ्मा बटाट्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. कारण कमी जीआय निर्देशांक असलेले पदार्थ शरीरातील अनावश्यक चरबी घटवण्यात मदत करतात आणि टाईप 2 प्रकाराच्या मधुमेहापासून मदत करतात.
 
व्हर्जिनिया येथील शेतकरी फ्रँक मिटोलो आणि ऑस्ट्रेलियन ग्लायसेमिक इंडेक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून करिझ्मा हा वाण नैसर्गिक पैदास प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आला आहे. अशा प्रकारे कमी जीआय (ग्लायसेमिक इंडेक्स) असलेलं बटाट्यावरील हे जगातील पहिलंच यशस्वीपणे करण्यात आलं संशोधन आहे. कमी जीआय निर्देेशांक या गुणाव्यतिरिक्त हा बटाटा शिजवणं आणि भाजणं यासाठी उत्तम आहे. विशेष म्हणजे हा बटाटा नैसर्गिक निवड पद्धतीद्वारे विकसित करण्यात आल्यामुळे यात कुठलेही अपायकारक घटक नाहीत. हा बटाटा त्याच्या स्वादिष्ट विशेष अशा चवीसाठी आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे.