ऐतिहासिक शकुंतला एक्सप्रेस झाली बंद?

    दिनांक :03-Jul-2019
दर्यापूर, 
ऐतिहासिक व इंग्रज कालीन नॉरोगेज शकुंतला रेल्वे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. कोणत्याही कारणाने शकुंतला बंद करण्याची ही पाचवी वेळ आहे. 

 
 
गोर गरिबांना कमी पैशात मूर्तिजापूर- दर्यापूर -अचलपूर प्रवास घडवून आणणारी व शेतमाल शहरात पोहचविणार्‍या शकुंतलेला अच्छे दिन येणार म्हणून सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र प्रशासनिक उदासीनता व लोकप्रतिनिधीचे वेळकाढू धोरणामुळे अखेरच्या घटका मोजून ती बंद झाली आहे. दररोज ही रेल्वे दोन फेर्‍या मारत असताना व पुर्वी कोळशाचे इंजिन असून सुद्धा प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. आता ही रेल्वे डिझेल इंजिनवर आली आहे. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांचा निष्काळजीपणामुळे तिला अनेक वेळा घरघर लागत होती व ती बंद पडण्याचे मार्गावर राहीली.
 
माजी खासदार अंनतराव गुढे व त्यांनतरचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी शेकुंतलेची बाजू शासनापर्यंत पोहोचवून पुन्हा कार्यरत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजपर्यंत शकुंतला धावत राहिली. मात्र गेल्या 1 मे 2019 पासून रूळ दुरुस्तीच्या नावावर ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीचे कामे पूर्ण झाली असताना हि शकुंतला मूर्तिजापूर स्टेशन वर धावण्याच्या प्रतीक्षेत आहे. या गंभीर बाबी कडे नवनिर्वाचित खासदार नवनीत रवी राणा यांनी जातीने लक्ष घातले तर शकुंतला पुन्हा धावेल. अन्यथा इतिहास जमा होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मूर्तिजापूर - दर्यापूर शकुंतला रेल्वे सध्या तात्पुरती बंद केल्याचे रेल्वे प्रशासना कडून सांगण्यात आले. पण, सुरू केव्हा होणार याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.
 
निवडणुकीच्या व्यस्तते मुळे कोणालाही त्याकडे पाहण्याची गरज वाटली नाही. त्यामुळे भुसावळ -बडनेरा येथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी निष्काळजीपणाने ती बंद करण्याचा घाटच घातला अशी शंका येत आहे. आता नवनिर्वाचित खासदार नवनीत रवी राणा यांनी या बाबी कडे विशेष लक्ष घालून शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू कशी होईल या करिता प्रयत्न करणे अतिशय गरजेचे आहे. खासदारांनी रेल्वे अधिकार्‍यानंवर वचक ठेवून काम करण्याची तयारी दाखवावी व बंद असलेली शकुंतला युद्ध पातळीवर चालू करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.