पाऊस पहिला नेमका कुठला?

    दिनांक :03-Jul-2019
यथार्थ  
श्याम पेठकर 
 
वार्‍याचे श्वास ओलसर झाले की, मग पाऊस येतो. शिशिरात झाडं बोडकी होतात. वसंतात झाडं पानंपानं होतात. झाडांच्या काळसर निब्बर खोडांवर फुटलेली ही कोवळी हिरवी लव सावली धरायला लागली की, मग पावसाचे थेंब तोलून धरण्याची ताकद पानांमध्ये येते. पाऊस असा नेमक्या वेळी येतो. अवघ्या सजीवांची पाळंमुळं तहानली की, पाऊस येतो अन्‌ पाणी धरून ठेवायला जिथे मुळं असतील तिथेच टिकून राहतो. पावसाची हळवी, ओली, रौद्र-भीषण रूपं असू शकतात, पण पहिल्या पावसाचं मात्र तसं नसतं.
 
जन्मदात्याबद्दल कृतज्ञतेचीही ओळख नसलेल्या अर्भकासारखा तो निरभ्र-निरागस असतो. हा पाऊस मनी ध्यानी नसताना येतो. येईल, येईल अशी आशा विझत गेल्यावर, चिडचिड्या उन्हाशी परत जमवून घेण्याचा प्रयत्न करताना मग पाऊस येतो. विरहाचे तडे गेलेल्या जमिनीचे उसासलेपण हुंगून पाऊस निघून जातो, परत येण्याचं वचन देऊन. रोडावलेल्या नदीच्या फाटक्या उराला थेंबथेंब टाके देताना, पाऊस नदीच्या ओटीत पाण्याच्या दोन ओंजळी ओतून रेतीत पाय गाडून बसतो. अशा वेळी नदीकाठची समाधिस्त शिलादेखील हलकी होते. पावसाने नदीच्या वाळूत घर केलं की, नदीचा बांधा सुडौल होतो. पण एक होते-पहिल्याच पावसात नदीची वाट निसरडी होते.पहिला पाऊस प्रत्येकाला भेटतोच असे नाही; पण निर्मितीच्या क्षणाशी बांधील असलेल्या प्रत्येक बीजाची ऊरभेट मात्र तो नक्की घेतो. नवनिर्मितीचं हे बीज कुठेही असू शकतं. कसंही ते येऊ शकतं. डोळ्यांतल्या स्वप्नांची लिपी वाचण्याची कला जन्मजात अवगत असणार्‍या पाखरांच्या अस्तित्वाशीच हे बीज सलगी करून असतं. पहिला पाऊस नेमकं ते हुडकून काढतो. परागंदा झालेल्या वारसांनी वाळीत टाकलेल्या गावातल्या वाड्याच्या कौलारू छतावरही मग पिंपळ साकारतो. कौलारू घरांच्या छतांवर हिरवळ दाटून येते. हे निर्मितीचं बीज कुठेही असू शकतं. तुमच्या-आमच्या हृदयातही. म्हणूनच सहनशक्तीची परीक्षा घेऊन आलेला पहिला पाऊस पाऊसबावर्‍या मनात कविता जागवितो. नांगरलेल्या शेतातील तासांमधून हा पाऊस पळत सुटतो.
 
जीवनात अनेक पावसाळे पाहणार्‍या जख्ख जिवांनादेखील पहिला पाऊस भेटतोच, असे नाही. अवघा पावसाळा डोक्यावर घेत मोकळ्या आकाशाखाली फिरत राहिलं, तरी पहिला पाऊस भेटत नाही. हा पाऊस हटखोर असतो. पावसाचे थेंब ओेंजळीत तोलून त्याचे मोती करता आले तरच हा भेटतो. डोळ्यांत ढग साठविण्याचे कसब ज्याला साधले त्यालाच हा पाऊस भेटतो. मग तो कधीकधी पावसाळा सरतानाही भेटतो. चिंबिंचिंब भिजून रिमझिमत राहण्याची शपथ तो देऊन जातो. एखाद्या गंगापुत्रालाही तो समरांगणी शरपंजरी पडला असताना भेटतो. कुणाला भेटायचंच असेल, तर तो ग्रीष्माच्या परसात घुसखोरी करूनही भेटतो.
 
ज्याची नाळ मातीतच गाडली आहे, असे जीव अस्तित्व नांगरून बसतात. ओसाड आभाळाकडे बघत त्यांच्या डोळ्यांमध्ये ग्रीष्म दाटून येतो. डोळे मिटताच मग पावसाच्या आठवणींचे तप्त कढ पापण्यांच्या कनातीमधून बाहेर पडतात. अशा हळव्या वेळी हा पाऊस अनवाणी पायांनी शेत तुडवीत ते कढ झेलून घेतो. असा पाऊस मग आभाळभर होतो. बांधावरच्या बुंध्याला टेकून पावसाची वाट बघणार्‍याच्या आसुसल्या चेहर्‍याला पावसाचे थेंब कुरवाळतात. शेतामध्ये मग गोरा कुंभार नाचू लागतो. जमीन दाणे मागू लागते. अर्थात्‌, हे मागणं भरभरून देण्यासाठी असतं. घरट्यांवर पंख अंथरून पाखरं अंगाई गातात. मातीशी नातं असणार्‍यांची मग धावपळ सुरू होते. बैलांच्या पावलांनी जमीन लेकुरवाळी होते. चंद्रमौळी झोपडीचं छतही मग गोवर्धन होतं. पावसाच्या सार्‍या व्यथा छत झेलून घेतं. अशा पावसाला नावीन्याचा ध्यास असतो. पाऊस मग झोपडीच्या छतातून आत शिरतो. दूधपितं लेकरू आईजवळ सरकतं अन्‌ गोठ्यातल्या गाईच्या निळ्या डोळ्यांत हिरवं रान उगवतं.
 
हा पहिला पाऊस ओसरला की, कुपावर कारल्याचा वेल काट्यांशी बोलू लागतो. रान गारगार होतं. वारा चिंबिंचिंब होतो. अंगावरची धूळ झटकून झाडं, पहिल्या रात्रीनंतर नुकत्याच न्हालेल्या नवपरिणत वधूसारखी संपृक्त टवटवीत दिसतात. कौलारू छतंही आरशासारखी चकचकीत होतात. पहिला पाऊस असा धूळ झटकणारा असतो... शरीरावरची आणि मनावरचीदेखील.
 
पहिला पाऊस भेटण्यासाठी गात्रं ओसरत गेली तरी चालतील, पण मन टवटवीत हवे. पावसाचंच अप्रूप वाटेनासं झालं अन्‌ पाण्याची भीती वाटू लागली की समजावं, वय झालं आहे. पहिला पाऊस गावात येण्याआधी गावाने सुकी लाकडे जमवून ठेवावी. ऐन पावसाळ्यात गावात कुणी मेलेच, तर अडचण नको. मरणाचे स्मरण असे नेणिवेच्या पातळीवर असतेच. वाढत्या वयाबरोबर हे धुके अधिक गडद होऊ लागते. पाऊस नेहमीचाच अनुभवायचा असेल, तर जिवंत माणसांनी जातिवंत डोळे हिरव्या पानांआड दडवून ठेवावे. नाहीतर मग पाऊस जाणिवेच्या पातळीवर येतच नाही. पेशींनी अंकुरण्याचे नाकारले की, जिवांना पावसाची धुंदी चढत नाही. अशांना पहिला पाऊस भेटूच शकत नाही. जाणिवा जिवंत ठेवल्या की, पाऊस पहिला होऊन भेटतो. हा पाऊस असा कधीच भेटला नव्हता. ऐन पावसात इमारतीच्या गच्चीवर उभं राहून तिच्या केसांत फुलं माळतानासुद्धा पहिला पाऊस भेटला नव्हता. पाऊस कळायला लागण्यासाठी त्याची ओळख असावी लागते. ती करून घ्यावी लागते. पावसाचेही संस्कार करावे लागतात.
 
साडेतीन वर्षांची चिमुरडी, ‘‘यंदा पाऊस कधी येणार?’’ हा प्रश्न घेऊन भिरभिरत होती. वार्‍याला सदाफुलीची ओंजळभर फुलं देऊन तिने हा प्रश्न त्यालाही विचारला होता. कोरडा वारा मूकपणे तिच्या बटांमध्ये बोटं फिरवून निघून गेला. प्रश्न कायम होता आणि ढगांकडेही उत्तर नव्हते. शापित गंधर्वानं आपल्या सखीसाठी मेघांना दिलेला निरोपही इतका आर्त नसावा. पाऊस न अनुभवलेली चिमुरडी पावसाची वार्ता विचारीत होती. तिला इवल्याशा मुठीत पाऊस साठवून ठेवायचा होता. अखेर तिच्या डोळ्यांच्या कडांवर हा प्रश्न सुकून गेला. गोबर्‍या गालांवर सुकलेल्या पाण्याची नक्षी तरारली, पण पाऊस आलाच नाही.
 
घराच्या परसदारी तुळशीपाशी, हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून ती बसून राहिली आणि वार्‍यालाही कळू न देता तो आला. एका टपोर्‍या थेंबाने हळूच तिच्या डोक्यावर टपली मारली. ‘काय आहे?’ मग पाण्याच्या थेंबांची गर्दीच झाली. अंगणात एक एक थेंब जमिनीत रुतून बसला. अगदी इतर वेळी तिने ते थेंब रांगोळी काढण्यासाठीच वापरले असते. थेंबांनी तिला गोंजारायला सुरुवात केली अन्‌ ती आनंदाने चीत्कारली-‘‘पाऊस आला!’’ तान्ह्या पावसात चिमुकलीसोबत भिजताना अचानक जाणवलं, हा पहिला पाऊस आहे. पाऊसधारांनी बावरलेली ती, तिने इवल्याशा हातांनी गळ्याभोवती गच्च मिठी मारली. कमरेभोवती पायांचा वेढा घातला अन्‌ पाऊसच कडेवर आल्यागत वाटले.
 
पहिला पाऊस असा अचानक भेटतो. साधना असावी लागते. पाऊस कधी एकट्यालाच गाठतो. आपलं पहिलंपण ओतून जातो. नाहीतर मग एका छत्रीत लज्जेलाही अवघडल्यागत वाटावं, इतकं अंतर राखण्याचा प्रयत्न करीत अर्धे-अर्धे भिजत जाणार्‍या दोघांनाही पाऊस वेगळा भेटतो. कधी तिला पहिला पाऊस भेटतो, तर कधी त्याला. दोघांनाही एकाच वेळी असा पाऊस भेटणं हा दैवदुर्लभ योग आहे. तिच्या मोकळ्या केसांमधून ओघळणारे पावसाचे मोती तो ओंजळीत वेचतो, तेव्हा पाऊस पहिलटकर असतो. तिच्या केसांच्या सरी मग जीवन व्यापून टाकतात. पाऊस मग सरी विंचरून वेणी घालतो. हवंहवंसं बंधन घालणार्‍या शृंखलाच होतात तिच्या बटा. ते बंधन असलं तरी रेशमी असतं. आकाशी असतं. पाऊस असा भेटण्याचा तो एकच क्षण असतो. त्यानंतर त्याने तिचे केस पिळून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस येईल, पण तो पहिला नसेल!
  
पहिला पाऊस भेटतो रानात. मनात. आईच्या स्तनात. पहिला पाऊस मनाच्या चोरकप्प्यात दबा धरून बसलेला असतो. तो भेटण्यासाठी पावसाळाच असावा लागतो, असे नाही. रणरणत्या दुपारी दुसर्‍याचं उजागर सौभाग्य झालेली त्याची ‘ती’ त्याला भेटते, तेव्हा मनात दबा धरून बसलेला पहिला पाऊस अचानक कोसळू लागतो. अशा वेळी सावरणं कठीण असतं. पाऊस धरवत नाही आणि चिंब होता येत नाही, अशी केविलवाणी अवस्था असते. घरासमोरील अंगणात शेवंतीचं रोपटं लावताना पाऊस हातातून वाट काढतो. ओणवं होऊन शेतात कापूस वेचताना हाच पाऊस पाठीवर स्वार होतो. एखाद्या अंधार्‍या रात्री वारा खिडकीच्या तावदानांना धडका देत असतो. या पहिल्या पावसाची फुलं होतात. ती माळून ठेवता यायला हवीत...