वाघाचा आठ वर्षीय बालिकेवर हल्ला

    दिनांक :03-Jul-2019
- केकदाखेडा गावातील घटना
धारणी,
मेळघाट व्याघ्र वनपरिक्षेत्रात येणार्‍या केकदाखेडा गावात वाघाने मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास धुमाकूळ घातला. गावात शिरलेल्या वाघाने तेथील एका 8 वर्षीय बालिकेवर हल्ला चढवला. संगीता राधेश्याम डावर (वय 8) असे गंभीर जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात बालिकेच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

 
 
 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात येणार्‍या ढाकणा वनपरिक्षेत्रातल्या केकदाखेडा गावात रात्री वाघाचे अचानक आगमन झाले. गावात शिरल्यानंतर बिथरलेल्या वाघाने बालिकेवर हल्ला चढवला. घटना लक्षात आल्यानंतर गावकर्‍यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलात पळून गेला. घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीला दूचाकीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तीच्यावर उपचार सुरू आहे. दूसरीकडे वाघ पुन्हा गावातल्या मंदिराजवळ आला होता.
 

 
 
त्याला पुन्हा हुसकावून लावण्यात आले. केकदाखेडा या गावाचे पुनर्वसन झाले आहे. येथील आदिवासींना पुनर्वसनाचा लाभ मिळाल्याने अनेक कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. मात्र, पुनर्वसन प्रक्रियेत त्रुट्या निघाल्याने 20 ते 25 कुटुंबांनी गाव सोडलेच नाही. धारणीपासून 35 ते 40 किमी. अंतरावर डोंगरात वसलेले गाव जंगलाने वेढलेले आहे. सतत हिंस्त्र वन्य प्राण्याची भीती या गावाला असते. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, येथील 20 ते 25 कुटुंब गावातच आहे.