माझ्या वयावरून बोलाल तर याद राखा

    दिनांक :03-Jul-2019
मुंबई,
बिग बॉसच्या घरातील कालचा दिवस जरा वेगळाच ठरला. नेहमी हसत, खेळत राहणाऱ्या सदस्यांची अचानक घाबरगुंडी उडाल्याचं पाहायला मिळालं. कारण अचानक घरामध्ये सायरन वाजला आणि घरातील लाइट्स गेल्या. यानंतर सर्वच सदस्यांची एकच तारांबळ उडाली. बिग बॉसने सर्व सदस्यांना एका बंद खोलीत जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार सगळे जमलेही. बिग बॉसने नवा टास्क देऊन घरातील सदस्यांची चांगलीच गोची केली. आपण कोणा एका सदस्यासोबत बंद खोलीत राहू शकतो आणि कोणासोबत राहू शकणार नाही अशा दोन सदस्यांची नावं सांगायची होती. या टास्कदरम्यान नेहा, किशोरी आणि रुपाली यांनी वयाचं कारण देत सुरेखा पुणेकर यांचं नाव पुढं केलं. यावरून सुरेखा पुणेकर चांगल्याच भडकल्या.
 
 
'घरातल्या सगळ्या सदस्यांनी या शंभर वर्षाच्या आहेत. बिग बॉसमध्ये उगीच आल्यात. असं एकदाचं म्हणून टाका असं म्हणत सुरेखा यांनी घरातील सदस्यांवर आगपाखड केली. सर्वांना माझ्या वयाचा प्रॉब्लेम असून उठून सुटून माझ्या वयाचा मुद्दा काढला जात आहे, असंही त्या म्हणाल्या. 'किशोरी आणि माझ्यात केवळ एका वर्षाचं अंतर असून देखील किशोरी मला माझ्यावयावरून बोलते असा आरोप त्यांनी केला. माणसाने जे खरं कारण आहे ते सांगून मोकळं व्हावं ; मी अजून देखील बारा महिने फिरत असते. अजूनही लोकांची चाहती आहे. त्यामुळं यापुढं माझं वय काढाल तर शिव्या दिल्या नाही दिल्यातर माझं पण नाव सुरेखा पुणेकर नाही असं म्हणत घरच्यांना चांगलीच तंबी दिली. सुरेखा यांचा राग पाहून सदस्यांनी शांत राहणचं पसंत केलं.
कॅप्टनसी टास्कमध्ये वीणाला मात देऊन माधवने बाजी मारली आणि कॅप्टन होण्याचा मान मिळवला. यांनतर किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हिना पांचाळ, वैशाली माडे आणि रुपाली भोसले या पाच महिला सदस्य नॉमिनेट झाल्या आहेत. त्यामुळं आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हे उत्सुकतेचं ठरणार आहे.