सत्यशोधक विवाह उत्साहात

    दिनांक :03-Jul-2019
यवतमाळ,
जिल्ह्यातील पहूरचे छत्रपती वाघ यांची मुलगी मृणाली आणि वर्धा येथील सुधाकर चरडे वर्धा यांचा मुलगा अमोल यांचा महात्मा फुल्यांच्या विचाराने म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पडला. या विवाहात कोणत्याही प्रकारचा मुहूर्त, पंचांग पाहण्यात आले नाही. हे लग्न पुरोहिताविना पार पडले. अर्ंतपाटावर ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात आले. अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव करण्यात आला. महात्मा फुलेंनी लिहिलेली मंगलाष्टकेम्हणण्यात आले. लग्न म्हणजे काय, अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. 
 
 
‘सत्यशोधक विवाह’ हे पुस्तक व महात्मा फुलेंनी लिहिलेली लग्नविधी व मंगलाष्टक असणारी पत्रके वाटण्यात आली. कोणत्याही प्रकारचा हुंडा, कर्मकांड व कुंडलीविना लग्नसोहळा पार पडला. कन्यादानाऐवजी कन्यापुत्र समर्पण कार्य़क‘म पार पडला. महात्मा फुलेंनी लग्नप्रसंगी सांगितलेली वर-वधूंना शपथ देण्यात आली. सत्यशोधक विवाह या पुस्तकाचे प्रकाशन अरिंवद माळी, ज्ञानेश्वर गोरे, माया गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
याप्रसंगी वराचे आईवडील, मोठे भाऊ व मामांचा सत्कार केला. सत्यनारायण करण्याऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेतील एकविसाव्या अध्यायातील ‘वैवाहिक जीवने’ या भागाचे वाचन व अर्थ सांगण्यात आला. मंगलाष्टक गोपाल धोबे व स्नेहल मदनकर यांनी गायले. या सत्यशोधक विवाह सोहळ्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.