भामरागडमधील ३०० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण

    दिनांक :30-Jul-2019
गडचिरोली, 
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड येथील सुमारे ३०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
आलापल्ली-भामरागड मार्ग अजूनही बंद आहे. यामुळै भामरागड व अहेरी तालुक्यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तूटलेलाच आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यात दोन, तर गडचिरोली तालुक्यात एक इसम जखमी झाले. चामोर्शी तालुक्यात चार जनावरांचा मृत्यू झाला.
 

 
 
आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मात्र, काल बंद असलेले आष्टी-आलापल्ली, अहेरी-गडअहेरी, अहेरी-महागाव या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प आहे. आरमोरी तालुक्यातील वनखी येथील दुधराम जांभूळे यांच्या घरावर दुसऱ्या व्यक्तीचे घर कोसळल्याने दुधराम जांभुळे व त्यांचा मुलगा जखमी झाले.
पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरले असून, तेथील दुकानदार व रहिवाश्यांचे नुकसान झाले आहे. तेथील सुमारे तीनशे पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. दरम्यान, अतिवृष्टी झाल्यास त्या भागातील शाळांना सुटी देण्याची सूचना संबंधित तहसीलदारांना देण्यात आली आहे. तसेच गर्भवती महिलांना वेळीच दवाखान्यात भरती करण्यासाठी तातडीने उचित पावले उचलण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.