भारताची गगनयान मोहीम

    दिनांक :30-Jul-2019
प्रासंगिक
डॉ. मधुकर आपटे
 
चंद्र हा अंतरिक्षातील पृथ्वीला सर्वात जवळचा स्वर्गीय पिंड. त्यामुळे अंतराळात दूरवर प्रवास करण्याच्या योजनांसाठी ते एक सोयिस्कर स्थानक ठरू शकते. त्यामुळे या पिंडावर सुखरूपपणे पोहोचण्याचे कार्य करणे अंतराळात दूर दूर जाण्याच्या सर्व मोहिमांचे प्रथम उद्दिष्ट असणे स्वाभाविकच आहे. 1957 साली रशियाच्या स्पुटनिकने सर्वप्रथम अंतराळात पृथ्वी प्रदक्षिणा यशस्वीपणे घातल्याने अंतराळयुगाची सुरुवात झाली. विविध प्रगत राष्ट्रांनी त्यानंतर अंतराळप्रवासकार्यात वेगवेगळे यशाचे टप्पे गाठणे सुरू केले. स्वतंत्र भारताने या क्षेत्रात 1961 साली प्रवेश करून क्रमाक्रमाने विविध यशाचे टप्पे गाठले आणि या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे प्रयत्न सुरू झाले. या कार्यात हळूहळू यशस्वी होत गेल्याने पुढील मोठे कार्य करण्याचे स्वप्न आपण रंगवू लागलो आणि त्यातूनच ‘चंद्रावर भारतीय अवकाशवीर आपल्या स्वतंत्र प्रयत्नांनी पाठवून त्याला सुखरूपपणे परत आणण्याचे कार्य’ करण्याच्या उपक्रमाची आता सुरुवात झाली आहे. ‘गगनयान मोहीम’ ही या उपक्रमातील पहिली मोहीम. तिची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. 15 ऑगस्ट 2018 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून भारताच्या अंतराळक्षेत्रातील कार्याबद्दल वैज्ञानिकांचे कौतुक केले. त्या संदर्भात त्यांनी या क्षेत्रातील कार्याबद्दल एका अत्यंत महत्त्वाच्या, भविष्यकाळातील योजनेचे विधान केले- ‘‘भारत 2022 साली भारतीय बनावटीच्या अग्निबाणाचे भारतीय भूमीवरून उड्डाण करून भारतीय बनावटीच्या उपग्रहातून भारतीय अवकाशवीर अंतराळात पाठवून त्यांना सुखरूपपणे परत आणेल.’’ हे ते विधान. हीच ती ‘गगनयान योजना.’ 

 
 
पंतप्रधानांच्या उत्तेजनपर विधानाने इस्रोच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांमध्ये उत्साह संचारला आणि कार्याचा लगेच प्रारंभ झाला. या महत्त्वाच्या कामाचे योग्य नियोजन करून कार्य यशस्वी करण्याची जबाबदारी तेथील एका तडफदार महिला वैज्ञानिकाला देण्याचे ठरले. व्ही. आर. ललिथांबिका ही ती कर्तबगार महिला. तिने ही जबाबदारी अत्यंत आनंदाने स्वीकारून लगेच कामाची सुरुवात केली. सर्वप्रथम ललिथांबिकांनी, इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांच्या मार्गदर्शनात योजनेचा प्रमुख आराखडा तयार केला आहे. त्यानुसार योजनेचा एकूण खर्च 10,000 कोटी रुपये येणार असल्याचे कळते. या योजनेच्या कामात जवळजवळ 15,000 नवे रोजगार भारतीय तरुणांना उपलब्ध होतील. देशातील काही खाजगी उद्योगसमूहांचादेखील सहभाग घेतला जाणार आहे. याशिवाय इस्रोमध्ये जवळजवळ 900 जास्त कर्मचार्‍यांची नियुक्ती होणार आहे. योजनेतील अनेक आव्हानात्मक कामे साधण्यासाठी योग्य अशा तंत्रज्ञानाची निवड करून त्यांची वारंवार तपासणी करणे आवश्यक असल्याने त्यांचा सखोल विचार करण्यात आला आहे.
 
या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या जोखमीच्या कार्याचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. त्यात पूर्वानुभव असणार्‍यांचे सहकार्य घेणे खरे शहाणपणाचे ठरणार, हे निश्चित! म्हणूनच आपल्या विचारी पंतप्रधानांनी या क्षेत्रातील अनुभवी राष्ट्राचे सहकार्य मिळविण्याचे कार्य केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन गतवर्षी भारतात आले असता, त्यांच्यासोबत दोन राष्ट्रांमधील सहकार्याबद्दल एक महत्त्वपूर्ण करार झाला. त्यानुसार रशियाची रॉसकॉस्मॉस ही कंपनी आणि इस्रो मिळून ‘भारतीय मानवसहित अंतराळभ्रमण कार्यक्रम’ आखणार असल्याचे ठरले आहे. योग्य अशा अवकाशवीरांची प्रथम निवड करण्याचे काम इस्रो आणि भारतीय वायुदल मिळून करणार आहे. या भारतीय वीरांना शून्य गुरुत्वाकर्षणात राहून योग्य शारीरिक कार्य करू शकण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे फार महत्त्वाचे आहे. ते साधण्यासाठी रॉसकॉस्मॉस रशियाच्या सोयूझ या अवकाशस्थानकात भारतीय अवकाशवीरांना काही दिवस राहून काम करण्याचा सराव करविणार आहे.
 
अंतरिक्षयान निर्माण करण्यासाठी आवश्यक काम इस्रोच्या कार्यशाळेत सुरू झाले आहे. या प्रमुख यानाचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. ‘सर्विस मोड्यूल’ आणि क्र्यू मोड्यूल’ या नावांनी ते संबोधिले जातात. दोन्ही मिळून झालेल्या यानाला ‘ऑर्बायटल मोड्यूल’ (पृथ्वीला अंतराळातून प्रदक्षिणा घालणारे यान) असे म्हणतात. सामान्यपणे हेच ते आपले ‘गगनयान,’ जे 2022 साली भारतीय अवकाशवीरांना घेऊन पृथ्वीपासून साधारण 300-400 किलोमीटर उंचीवरून भ्रमण करणार आहे. तीन अथवा चार भारतीय अवकाशवीर या यानातून साधारणपणे सात दिवस पृथ्वीप्रदक्षिणा घालतील.
 
अवकाशयात्री (मानव) ज्या क्र्यू मोड्यूलमध्ये बसून अंतराळात पाठविले जाणार, ती एक साधारणपणे राहाण्याच्या खोलीएवढी मोठी असणार आहे. त्याचा व्यास 3.7 मीटर आणि उंची 3.57 मीटर असेल. सर्विस मोड्यूलसह अवकाशात 300-400 किलोमीटर उंच उचलले जाणारे हे यान एकूण 7,800 किलोग्रॅम वजनाचे असणार आहे. ते अवकाशातील त्याच्या योग्य उंचीवर नेण्याचे कार्य इस्रोच्या बनावटीच्या जी. एस. एल. व्ही. मार्क-3 या अग्निबाणाने श्रीहरीकोटा येथून होण्याचे पक्के झाले आहे. साधारणपणे 16 मिनिटांत यान त्याच्या भ्रमणकक्षेत पोहोचण्याचा अंदाज आहे. प्रथम मानवरहित यान योग्य कक्षेपर्यंत पाठवून ते सुखरूपपणे पृथ्वीवर परत येण्याचे 2-3 प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, 2022 साली निवडक तीन भारतीय अवकाशयात्री नियोजित भ्रमणकक्षेत पाठविले जाणार आहेत. ते अंतराळात साधारणपणे सात दिवस राहणार आहेत. या काळात त्यांचे यान पृथ्वीभोवती 300 किलोमीटर उंचीवरून प्रदक्षिणा घालेल. साधारणपणे प्रत्येक प्रदक्षिणेला 90 मिनिटे लागतील. या प्रदक्षिणा, यान घालत असताना अवकाशवीर त्या अतिअल्प गुरुत्वाकर्षणात (मायक्रो ग्रॅव्हिटी) काही वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.
 
त्या अतिशय वेगळ्या वातावरणात वास्तव्य करताना अवकाशयात्री भगव्या रंगाचा खास पोशाख परिधान करणार आहेत. तो खास पोशाख आपल्या थिरुअनंतपुरम्‌ येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’मध्येच तयार केला जात आहे. अंतराळातील विविध धोक्यांपासून अवकाशवीर, जेव्हा यानाच्या बाहेर पडून निरनिराळे प्रयोग करतात तेव्हा त्यांचे संरक्षण होण्यासाठी हा खास तयार केलेला पोशाख परिधान करणे आवश्यक असते. निरनिराळ्या कामांची अवकाशवीरांना सुविधा व्हावी यासाठी या पोशाखात अनेक आवरणं असतात. सर्वात बाहेरील आवरणात पाणी आणि प्राणवायू साठविलेली नळकांडी असतात. अवकाशवीर यानाच्या बाहेर पडून ‘स्पेस वॉक’ करताना यांचा उपयोग होतो. शिवाय काही इतर वायू भरलेली नळकांडीदेखील असून तो वायू निरनिराळ्या दिशांना आवश्यकतेनुसार सोडून आपल्या अंतराळात पोहोण्याच्या दिशा बदलता येतात. अशी खास व्यवस्था असणारे पोशाखातील सर्वात बाहेरच्या आवरणाचे वजन भूतलावर 115 किलोग्रॅम जरी असले, तरी अंतराळात मात्र ते जवळजवळ शून्य भरत असल्याने अवकाशवीराला ते सहज पेलता येते. ही सर्व कामे आपल्या येथे सर्व भारतीय बनावटीच्या वस्तू आणि उपकरणांच्याच साहाय्याने करण्यात येत आहेत.
 
अवकाशात प्रवेश करणे आणि काही काळ वास्तव्य करणे प्रमाणात सोपे आहे. परंतु, अवकाशातून परत पृथ्वीकडे सुखरूप परतणे बरेच अवघड आहे. या कार्यातच अनेक अपघात झाले आहेत. योग्य पद्धतीचा त्यासाठी वापर करावा लागतो. बरेच आव्हानात्मक असे हे काम आहे आणि भारताने मात्र आता ते स्वीकारले आहे. त्यासाठी मानवरहित भारतीय बनावटीची यानं अवकाशात पाठवून ती सुखरूपपणे पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयोग आपण हातात घेतले आहेत. 10 जानेवारी 2007 रोजी इस्रोने एक प्रयोग यशस्वीपणे पार पाडला आहे. विविध उपकरणं आणि एक कुपी घेऊन एक अग्निबाण अंतराळात झेपावला. काही काळ या कुपी आणि उपकरणांनी पृथ्वीप्रदक्षिणा केल्यानंतर कुपी यानापासून अलग करून ती पृथ्वीवर सुखरूपपणे या प्रयोगात आणली गेली. या पद्धतीने भविष्यकाळात मानवसहित कुपी सुखरूपपणे पृथ्वीवर परत आणता येईल, याची खात्री वाटू लागली.
 
पुढे असेच काही प्रयोग केल्यानंतर नुकताच 5 जुलै 2018 रोजी एक प्रयोग यशस्वी झाला आहे. मानवाला बसण्यासाठी असणारा यानातील भाग (क्र्यु मोड्युल) यानापासून वेगळा करणे आणि तो हवाईछत्रीच्या साहाय्याने सावकाशपणे खाली येऊन समुद्रात पाडण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेत हे तंत्र वापरता येऊ शकेल, असा अंदाज आहे. 10,000 कोटी रु. खर्चाची ही गगनयान योजना 2022 साली यशस्वी होणार, अशी आता खात्री वाटू लागली आहे. या यशप्राप्तीने भारत अवकाश संशोधनकार्यात जगातील चौथा क्रमांक मिळविणार आहेच. याशिवाय योजनेच्या कार्याने भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती मोठ्या प्रमाणाने वाढत जात असल्याचे पाहून मोठ्या खर्चीक योजनेची ही एक मोठी उपलब्धी आहे, हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे.
 
9922402465