लडाख : रोमांचकारी अनुभव!

    दिनांक :30-Jul-2019
 
•मुक्ता राम महाजन
 
भाग १
 
काश्मीर झालं, दार्जिलिंग झालं, तिकडे दक्षिणेकडील भागही पाहून झाला. मग राहिलं कायं? तर राहिलं 43 डिग्रीतून 10 डिग्रीत असणारं शहर, आठ लाख लोकसंख्येतून अगदी तीस हजार एवढ्या विरळ लोकसंख्येत आणणारं शहर, आणि एवढंच काय तर खरोखरंच उंच शिखर गाठण्यास सक्ती करणार, 11,562 फुटांवर वसलेलं, जम्मू कश्मीरचा भाग असूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारा प्रदेश लडाख, शहर लेह! अकराशे फुटांवरून आम्ही अकरा हजार फुटांची स्वप्ने पाहू लागलो. बॅग भरल्या आणि नेत्रसुख मिळविण्याची धडपड सुरू झाली. 

 
 
25 मे रोजी आम्ही दोन परिवार मिळून एकूण आठ जणांनी प्रवासाला सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजता सुखरूपपणे प्रवास सुरू करून लेहला साडे आठच्या दरम्यान पोहोचलो. मध्यंतरी विमानात बसले असताना बर्फाच्छादित उंच पहाडांकडे पाहून मनाला ‘ऑल इज वेल’म्हटले! कारण आता सुखकारक आणि आश्यर्चदायक धक्क्यांना सुरुवात झाली होती. विमानात सहाजिकच एसी सुरू असल्यामुळे थंड होतेचं पण विमानातून उतरल्यावर थंडीची तीव्रता आणखीच जाणवली. खरोखरंच आम्ही आठ डिग्री तापमानात होतो. लेहचे विमानतळ म्हणजे विमानतळाच्या संकल्पनेला आक्षेप! अगदीच साधंसं विमानतळ होतं आणि त्यावरूनच लडाखमधील साध्याशाा जीवनशैलीची जरा संकल्पना आली. हिमाने स्वत:ला पांघरून घेतलेली सर्व पहाडे आम्हाला त्यांच्याकडे बोलवत होती.
 
प्राणवायूच्या कमी दाबाने आम्हाला लडाख प्रदेशाच्या उंचीची पडताळणी करून खात्रीच करून दिली. 45 डिग्रीतून आलेल्या पाहुण्यांची हॉटेलवाल्यांनी उत्कृष्ट सोय करून दिली व त्यांच्या प्रदेशात राहणाच्या सुचनांनी आमचा थोडाफार वर्ग घेतला. आराम करून स्वेटर व टोप्या घालून आम्ही लेहमधील मेन रोड येथे फिरायला निघालो. सुर्याच्या लख्ख प्रकाशाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की वेळेचा अंदाज लावण्याची चूक विदर्भातील लोकांनी करूच नये. थोडीफार खरेदी आणि तेथील लोकांशी वार्तालाप करून आम्ही हॉटेलला परतलो. 31 मे रोजी आमचा प्रवास सकाळी 10 वाजता सुरू झाला. सुमारे 51 किमी चा प्रवास करून आम्ही सिंधू-झंस्कार संगमची सुंदरता आमच्या नेत्रात सामावून घेण्यासाठी सज्ज झालो. पहाडांमध्ये वाहणार्‍या या दोन नद्या लडाखची सुंदरता दुप्पट करीत होत्या. या ठिकाणी देवाच्या रमणीय कलाकृती शिवाय कौतुकास्पद अजून एक मानवनिर्मित गोष्ट होती आणि ती म्हणजे ‘ब्रोे’ची कलाकृती! काय मेहनत केली आहे हो! ही सर्व नेत्रदीपक निसर्गसौंदर्य पाहून आम्ही पुन्हा लेहकडे परतलो व परतताना सर्वप्रथम पत्थर साहीब गुरुव्दाराला भेट दिली.
 
कुडकुडत्या थंडीत सैनिकांना जिवंत राहण्यासाठीची आशेची व भक्तीची ऊब त्या गुरुव्दारातून मिळत होती. त्यानंतर आम्ही नैसर्गिकरीत्या चुंबकीय शक्ती असणारं मॅगनेटिक हिल पाहिले. तसेच ‘हॉल ऑफ फेम’ पाहिले. ‘हॉल ऑफ फेम’मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानी सैनिकांकडून जप्त केलेले दस्तऐवज जमा आहेत तसेच भारतीय व पाकिस्तानी तोफा, रनगाडे, भारतीय सैनिकांची विविध छायाचित्रे, लेह-लडाख प्रदेशाबद्दलची माहिती तसेच सैनिकांच्या जीवनशैलीसाठी उपयुक्त असणार्‍या अनेक गोष्टींची प्रदर्शनी पाहिली किती कठीण परिस्थितीत भारतीय सैनिक आपले आयुष्य काढतात, त्याची तीव्र जाणीव झाली. सैनिकाच्या सियाचीन प्रदेशातील जीवनशैलीचे फोटो व साधने पाहून अंग शहराले. मनात देशभक्ती भरून आली. सायंकाळी हॉटेलला पोहोचून आराम केला. दुसर्‍या दिवशीचा प्रवास थकवा देणारा होता.