'जजमेंटल ..'च्या निर्मात्यांवर पोस्टर चोरीचा आरोप

    दिनांक :30-Jul-2019
मुंबई,
कंगना रनौत आणि राजकुमार राव यांचा 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटासंदर्भातील वाद काही केल्या संपत नाहीएत. चित्रपटाचं नाव असो किंवा कंगनाचं पत्रकारासोबत झालेलं भांडण. वादाची मालिका सुरू असून चित्रपटाच्या पोस्टरवरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
 
 
हंगेरीची फोटोग्राफर आणि विज्युअल आर्टिस्ट 'फ्लोरा बोरसी' हिनं 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या निर्मात्यांवर चित्रपटाचं पोस्टर चोरी केल्याचा आरोप केला आहे. 'जजमेंटल है क्या'च्या पोस्टरवर कंगनाच्या अर्ध्या चेहऱ्यासमोर एक काळी मांजर दाखवण्यात आली आहे. एक डोळा कंगनाचा दिसतोय तर एक डोळा काळ्या मांजरीचा. असंच एक पोस्टर फ्लोरानं शेअर करत चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझ्या पोस्टरची चोरी केल्याचं म्हटलं आहे.
याशिवाय फ्लोरानं राजकुमारचं एक ट्विट रिट्विट करत 'ओहह..हे पाहून मला काही तरी आठवतंय.. असं वाटतय की हे माझचं काम आहे' असं म्हटलं आहे. तसंच फेसबुकवरही एक पोस्ट शेअर करत दोन्ही पोस्टरवरील फरक ओळखून दाखवा असं आवाहानही केलं आहे.