'सुपर ३०'ला राज्यात जीएसटी माफ

    दिनांक :30-Jul-2019
मुंबई,
अभिनेता हृतिक रोशनच्या दमदार भूमिकेने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'सुपर ३०' या सिनेमाला राज्य सरकारने जीएसटी माफ केला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात आणि नवी दिल्लीत हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे.
 

 
 
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'सुपर ३०' या हिंदी चित्रपटास जीएसटी कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा करातून परतावा देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या सिनेमाने गेल्या १७ दिवसांत १२५ कोटींची घसघशीत कमाई केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे.
बिहारचे गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. यातील नायक 'सुपर ३०' नावाचा कोचिंग क्लास चालवतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना आयआयटी परीक्षेसाठी हा नायक झटत असतो. त्यातील नायकाचा संघर्ष आणि विद्यार्थी या भोवती हा सिनेमा फिरतो. या सिनेमात हृतिक रोशनने आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली असून हृतिकच्या अभिनयाचंही सिने समीक्षकांनी कौतुक केलं आहे.