बाक्टी येथून बिबट्याची कातडी जप्त; तिघांना अटक

    दिनांक :31-Jul-2019
नवेगावबांध,
अर्जुनी मोर तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या बाक्टी (चान्ना) येथे प्रादेशिक वनविभागाने एका घरावर धाड टाकून बिबट्याचे काडते जप्त करुन तीन आरोपींना अटक केली आहे. रविवारी (३० जुलै) रात्री ९ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मंगेश नंदलाल बडोले रा.बाक्टी, विनोद जयगोपाल रुखमोडे रा.कटंगधरा व रविंद्र खुशाल वालदे रा. केसलवाडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 
 
 
नवेगावबांध प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिविक्षाधिन वनाधिकारी डी. एम. पाटील यांना बाक्टी येथील मंगेश बडोले याच्या घरी बिबट्याचे कातडे असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पाटील व त्यांच्या चमुने मंगेशच्या घरावर धाड टाकली. घराची झडती घेतली असता घरात अवैधरित्या बिबट्याचे कातडे आढळून आले. दरम्यान तीनही आरोपींना अटक करुन कातडे जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी बिबट्याच्या कातड्यावर काळी जादू करुन पैशाचा पाऊस पाडण्यासाठी व गुप्त संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने बिबट्याचे कातडे मिळविल्याची कबुली दिली. आरोपींवर वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.