नाटक बघण्याचे सुबोध-पाठ!

    दिनांक :31-Jul-2019
यथार्थ  
श्याम पेठकर  
 
‘‘अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील, तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची प्रेक्षकांना गरज वाटत नाही.
यावर उपाय एकच. यापुढे नाटकात काम न करणं! म्हणजे त्यांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबूड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय, टीव्हीवरपण बघता येईल!’’
अभिनेता सुबोध भावेने हा वैताग ट्विटरवर व्यक्त केला. हा अगदी त्याच्याच शब्दांतला जसाच्या तसा वैताग इथे मांडला आहे. दररोजच जशा बलात्काराच्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येतात. आजकाल नेत्यांच्या बेडूकउड्यांच्या बातम्यांनी महत्त्वाची जागा पकडली आहे. तसेच अगदी तितक्याच नियमितणे कुठल्यातरी अभिनेत्याचा वैताग किंवा अभिनेत्रीचा संताप बाहेर पडल्याच्याही बातम्या येतात. दर महिन्याला किमान अशी एक बातमी तर असतेच. कधी हा त्रास मोहन गोखलेंना झाला, मग स्पृहा जोशींना झाला, मग असलाच वैताग सुमीत राघवन याने व्यक्त केला. अगदी आता आठच दिवसांपूर्वी नाट्यगृहातील अव्यवस्थेवर भारत जाधव यांनी राग काढला... आता सुबोध भावे.
त्याने ट्विट केल्यावर अनेकांनी त्याला प्रतिसाद देत प्रतिक्रिया दिल्यात. खरेतर त्याला ‘रीॲक्शन’ म्हणावे लागेल. कारण त्या सार्‍याच रीतसर इंग्रजीत होत्या आणि आणखी एक अभिमानास्पद वैशिष्ट्य म्हणजे रीॲक्शणार्‍या (हा मिंग्रजी शब्द, असे खूपसारे शब्द रूढ होत आहेत, विकनेसपणासारखे) सगळ्याच व्यक्ती या मराठी होत्या. किमान अडनावांवरून तरी तसे वाटत होते. अर्थात, सार्‍यांचा एकच सूर होता की, सुबोधने असा वैताग करून प्रामाणिक प्रेक्षकांचा विरस करू नये. चार-दोन मोबाईल्यांसाठी बाकीच्या प्रेक्षकांवर हा अन्यायच करण्यासारखे आहे. काहींनी फारच अतिरेकी सूचना केल्या आहेत. अशा मोबायली रसभंग करणार्‍या प्रेक्षकांना आत विंगेत नेऊन त्यांची धुलाई करावी किंवा नाटक थांबवून अशा प्रेक्षकांचा सत्कारच करावा जाहीर अन्‌ मग पुन्हा नाटक सुरू करावे... असे सुरू केले की मग लोक मुद्दाम रसभंग करतील अन्‌ रंगमंचावर जाऊन आपल्या आवडत्या नटाच्या हातून सत्कार करवून घेतील. तो तातडीने फेसबूकवरही टाकतील... ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुवा’ अशी बेशरमी तर अभिजात आहे आपल्यात.
 
 
 
थोडा शांत झाल्यावर मग सुबोधने आता एकदम नाटकच बंद करण्याचा उपाय (तो काय पर्याय किंवा उपाय असूच शकत नाही.) बाजूला ठेवला आहे आणि आता तो नाटक सुरू होण्याच्या आधी द्वारपाल होणार आहे. तो आणि त्याचे सहकारी नाटक सुरू होण्याच्या आधी दारावर उभे राहून सभागृहात प्रवेश करणार्‍या प्रेक्षकांचे मोबाईल तपासणार आहेत. ते बंद किंवा आवाज बंद अशा अवस्थेत आहेत की नाहीत, ते तपासून मगच ते नाटकाला सुरुवात करणार आहेत. आता सुबोधकडून असा मोबाईल तपासला जाणार असेल, तर प्रेक्षक त्याच्यासोबत एक सायलेंट सेल्फी काढूनच घेतील आणि मग नाटक सुरू असताना बेआवाज हा कल्ला सुरू असेल. म्हणजे सुबोधसोबतचा सेल्फी फेसबुकवर टाक, व्हॉटस्‌ॲपवर अनेक ग्रुप्सवर टाक आणि मग आलेल्या प्रतिक्रिया बघत बैस... अशात अश्रूंची फुले होण्याचे काही कारणच नाहीत. नाटक सादर करणार्‍या कलावंतांच्या डोळ्यांत अश्रूच येणार. पुन्हा प्रश्न हाच की, सुबोध कुठल्या तिकिटाच्या दारावर मोबाईल तपासनीस असणार आहे, हे बघून ते तिकीट काढले जाईल.
 
मुळात हे काही उपायच नाहीत. सुबोध म्हणाला तसे, नाटक हा नटाच्या आनंदाचा विषय असतो, हे मात्र खरे आहे. नाहीतर मालिका, चित्रपटांत बक्कळ कामे मिळत असताना अन्‌ एका नाटकाच्या प्रयोगाचे मानधन आणि मालिका, चित्रपटांच्या दैनिक मानधनात भाजपा-कॉंग्रेसइतका फरक असताना, कुणी वेळ काढून अन्‌ वेळी चित्रीकरण फाट्यावर मारून नाटकाचा प्रयोग करत असेल, तर त्याला नाटकाविषयी प्रेम नाही, तो केवळ व्यवसाय म्हणून नाटक करतो, असे म्हणणे चुकीचे आहे. ‘‘सैनिकांना पगार आणि भत्ते मिळतात म्हणून ते सीमेवर लढतात.’’ असे म्हणण्याइतकेच ते कृतघ्नपणाचे आहे. व्यावसायिक यशाच्या शिखरावर असलेली ही नटमंडळी, नाटकात पैसा मिळवायला नक्कीच काम करत नाहीत. बरे, आजकाल मोबाईलवर सारे जगच उपलब्ध असतानाही नाटकाला जाऊन बसणारी मंडळी नाटकाची दर्दी नाहीत, असे कसे मानायचे? म्हणजे अगदी 500 ते 1000 रुपयांचे तिकीट काढून नाट्यगृहातील गैरसोयी सहन करीत नाटक बघायला जाणार्‍यांना ‘रसिक प्रेक्षक’ असे आदरानेच म्हणावे लागेल ना? अगदी असेही मानले की विक्रम गोखले, सुमीत राघवन, सुबोध भावे यांच्यासारख्या नटांना ‘याचि देही याचि डोळा’ रंगमंचावर बघण्याची हौस भागवून घ्यायला आलेली मंडळीही नाटक या कलेशी काहीतरी नातं ठेवणारीच असतात. मग इतके पैसे खर्चून नाट्यगृहात आल्यावर मोबाईलशी काही काळ फारकत नाही का घेऊ शकत ही मंडळी? हो ना, नाटकाची तिकिटं काय महाग झालीत ना हल्ली! असं म्हणत नाटकाला जाऊन बसणार्‍यांना तिथे मोबाईलवर बोलण्याची मस्ती किंवा चैन कशीकाय परवडते कळत नाही.
आता यावरून सुबोधला ट्रोलही करणे सुरू आहे. समाजमाध्यमे ही नसलेली अक्कल पाजळण्याची महत्त्वाची ठिकाणे झाली आहेत. त्यामुळे सुबोधला ट्रोल करताना नाट्यगृहात मोबाईल वापरणे, हा आता जन्मसिद्ध अधिकारच आहे, असेही ठामपणे सांगण्यात येत आहे. ‘‘कुणी वक्ता भाषण देत असताना श्रोत्यांचे मोबाईल सुरू असतात आणि वाजतातही, तरीही तो वक्ता त्याची एकतानता बिघडू न देता लय कायम ठेवतो भाषणाची, मग तुम्हा नटांनाच काय होते तसे करायला?’’ असा प्रश्न एका व्हॉटस्‌ॲपी विदुषीने विचारला आहे. म्हणजे मोबाईल वाजतच राहणार, तुम्ही त्याची सवय करून घ्यायची आहे, असेच तिचे आता सांगणे आहे. आता नाट्यतंत्र शिकविताना प्रेक्षागृहात मोबाईल वाजत असतानाही आपली एकतानता टिकवून कशी ठेवायची, याचाही वेगळा अभ्यासक्रम असणे अत्यंत गरजेचे आहे.
 
आता इतका त्रागा करून सुबोध, सुमीत किंवा विक्रम गोखले यांच्यासारख्या अभिनेत्यांनी नाटक करण्याचे काय कारण? त्यांनी नाटक केले नाही तर काय जगबुडी येणार आहे का? मोबाईलवर आजकाल सगळे पाहता येते. अगदी जगभरातील काहीही बघता येते. नको बघायला कुठल्याच वयात असेही अगदी खुलेआम पाहता येते. नेटफ्लिक्सवर तर विविध मालिका आणि जगभरातील सिनेमे बघता येतात. त्याचा दरही कमी आहे. बरं, ते तुम्हाला हवं तेव्हा थांबविता येतं. पॉझ करता येतं. नंतर कधीही पाहता येतं, मध्येच कॉल आला तर तो अटेंड करता येतो. तुमच्या नाटकाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन या, नाट्यगृहातील गैरसोयी सहन करा आणि मग वरून तुमची ही मिजासही. आमच्या मोबाईलवर कॉल वाजला (ही आजची भाषा आहे) तर तुम्हीच तेवढा वेळ नाटक पॉज करायला हवं. नाटक आमच्यासाठी आहे, आम्ही काही नाटकासाठी नाही... आता कुणी काय काय सुचवीत आहेत. प्रेक्षकांनीच म्हणे आपली आचारसंहिता ठरवून घ्यावी. कुणाचा मोबाईल वाजत असेल, तर त्याला बजावावं आणि बजावूनही वाजतच असेल, तर मग प्रेक्षकांनीच त्याला वाजवावं... आता प्रामाणिक रसिकांची काळजी रंगमंचावर नाटक करणार्‍या नटांनीच कशी घ्यावी? त्यांची काळजी त्यांनीच घ्यावी. अशा एखाद्या मोबाईलवीराला इतर प्रेक्षकांनी समज द्यावी... एकतर नाटकाला जाऊच नये किंवा मग गेलेच तर मोबाईल आठवणीने घरी विसरून जावे (त्यात खूपच स्फोटक असे खासगी काही असेल तर लॉकरमध्ये ठेवून यावा).
नाटकाला यायचं, हजाराचं तिकीट काढायचं अन्‌ समोरच्या रांगेत बसून नाटक ऐन रंगात आलं असताना मस्तपैकी मोबाईलवर बोलायचं अन्‌ नटांना वैताग आणायचा म्हणजे नाटकाचे पैसे वसूल, असंच आजकाल गणित आहे. त्यामुळे यांना ‘सुबोध-धडे’ पचणार नाहीत!