धक्कादायक ! १४ दिवसांत ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    दिनांक :04-Jul-2019
 
औरंगाबाद : सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी ऐन पावसाळ्यातही आत्महत्या करत असून गेल्या १४ दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 
दुष्काळाची होरपळ आणि पावसाला झालेला उशीर यामुळे ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. पूर्वमोसमी पावसाची हुलकावणी व मान्सून आल्यानंतरही पावसाच्या किरकोळ हजेरीमुळे बळीराजाला पेरण्यांची चिंता सतावत आहे. 
 
 
 
१६ ते ३० जून या कालावधीत मराठवाड्यातील ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक नऊ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून त्या खालोखाल औरंगाबाद सात, नांदेड सहा आणि जालना जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. परभणी, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात प्रत्येकी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारी ते ३० जून २०१९ या सहा महिन्यांत ४३४ शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनाकडे करण्यात आली आहे.