चीनकडून फोनमध्ये जबरदस्ती टाकला जातोय मालवेअर

    दिनांक :04-Jul-2019
बीजिंग,  
चीनमध्ये बाहेरच्या देशातून येणार्‍या पर्यटकांना नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. चीन या पर्यटकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये जबरदस्तीने अँड्रॉईड मालवेअर इन्स्टॉल करत आहे. या मालवेअरच्या मदतीने चीनसाठी युझर्सच्या मोबाईलमधील मेसेज आणि अन्य फाइलही हाताळणे शक्य झाले आहे आहे. चीनमध्ये होणार्‍या या जबरदस्तीला अनेक वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम समूहांनी दुजोरा दिला आहे. 
 
 
चीनच्या शिनजियांग शहरात येणार्‍या पर्यटकांना स्मार्टफोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्यास सांगितले जात आहे, तसेच शिनजियांग शहरातून परतल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षक पर्यटकांच्या मोबाईलमधील मालवेअर अनइन्स्टॉल करतात. अलीकडेच ‘द गार्डिअन’च्या हाती एक स्मार्टफोन लागला असून, त्या फोनमध्ये हा मालवेअर इन्स्टॉल केलेला आढळून आला. यानंतर न्यू यॉर्क टाइम्स, व्हॉइस आणि एका जर्मन वृत्तपत्राने मिळून मालवेअरच्या केलेल्या तपासणीत ही माहिती उघड झाली आहे.
 
सेलहंटर नामक हा मालवेअर युझर्सच्या वैयक्तिक डेटा चोरीसहित स्मार्टफोनमधील अन्य फाइल्सही पूर्ण स्कॅन करतो. यात ई-मेल, कॉन्टॅक्ट, मेसेज, फोन लॉग, कॅलेंडरसहित अन्य माहितीचाही सामावेश आहे. याबरोबर चिनी एजन्सीना फोनच्या लोकेशनबद्दलही संपूर्ण माहिती मालवेअर ॲपमार्फत मिळते.
 
माहिती गोळा करण्याबरोबर हा ॲप स्मार्टफोनमधील चीन सरकारच्या दृष्टीने संशयित असलेल्या 70 हजारहून अधिक फाइल्स स्कॅन करतो. यात एमपी-3 फाइलसहित दहशतवादी संघटनांचे फोटो आणि व्हिडीओचाही सामावेश आहे. हा डेटा सीमेवरील कार्यालयाच्या लोकल सर्व्हरमध्ये स्टोअर केला जातो. मालवेअर अॅपच्या मदतीने चिनी पर्यटकांची हालचालसुद्धा ट्रॅक केली जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप याचे पुरावे मिळालेले नाहीत.