पाकिस्तानला 300 धावांच्या फरकाने विजय आवश्यक

    दिनांक :04-Jul-2019

नवी दिल्ली,
बुधवारी आयसीसी विश्वचषकात इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय नोंदवून उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले, परंतु या विजयामळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. आता केवळ अशक्यप्राय अशा आकड्यांच्या गणितामुळेच पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, मात्र हे सारे जवळपास अशक्य आहे.

 
 
सर्फराज अहमद आणि त्याच्या संघाला बांगलादेशविरुद्ध अशक्यप्राय विजय नोंदवावा लागेल, तरच पाकचा संघ सरासरी धावगतीच्या बाबतीत न्यूझीलंडला मागे सारू शकतो.
 
इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय नोंदविला, तरीही पाकिस्तान स्पर्धेबाहेर होत आहे. कारण न्यूझीलंडची सरासरी धावगती अधिक 0.175 इतकी आहे. जर पाकिस्तानने बांगलादेशवर विजय नोंदविला तर पाक व न्यूझीलंडचे प्रत्येकी पाच विजयासह 11 गुण होतील. सध्या पाकिस्तान आठ सामन्यातील 9 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या विजयानंतरही पाकिस्तानची सरासरी धावगती उणे 0.792 अशी राहील. अर्थात पाकिस्तान सरासरी धावगतीच्या बाबतीत न्यूझीलंडपेक्षा मागेच राहील. त्यामुळे आता पाकिस्तानला सरस धावगतीच्या आधारावर न्यूझीलंडला मागे सारून उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना बांगलादेशविरुद्ध 300 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने विजय नोंदविणे आवश्यक राहील.
 
पाकिस्तानसमोर बांगलादेशचा 311 धावांनी पराभव करण्याचे आव्हान राहील. त्याकरिता त्यांना 350 ते 400 धावा उभाराव्या लागतील. केवळ विजय म्हणजे पाकिस्तान व न्यूझीलंड प्रत्येकी पाच विजयासह प्रत्येकी अकरा गुण होतील, परंतु सरासरी धावगतीच्या बाबतीत न्यूझीलंड पाकपेक्षा समोर राहील.